भ्रष्टाचार :-एक भयानक राक्षस

33

आज स्वतंत्र भारतात, खेड्यापाड्यात, गावोगावी, शहराशहरात, सरकारी कार्यालयात, दवाखान्यात, कंपन्यात सर्व ठिकाणी भ्रष्टाचाराने धुमाकूळ घातला आहे. सभोवताल पाहिले असता भ्रष्टाचारी देशाचे भयानक रूप आपल्याला दिसून येते. सर्व ठिकाणी गुन्हेगारी, गुंडागर्दी, लाचखोरी, चुकीची शिक्षा इत्यादी अनेक वाईट प्रवृत्तीचे वातावरण पसरलेले आहे. सरकारी, खाजगी कार्यालय कोणत्याही विभागाची असो, तेथे तर खालच्या चपराशी, बाबू पासून तर वरच्या अधिकाऱ्यांपर्यंत फाईलवर वजन द्यावे लागते. पैसे नसेल तर काम पूर्ण होत नाही. आज मानव मानव राहिला नाही तर तो क्रूर राक्षस याप्रमाणे झाला आहे. सर्वच ठिकाणी भ्रष्टाचार आपले घट्ट पाय रोवून बसत आहे. म्हणून भ्रष्टाचार एक भयानक राक्षस आहे.
आपल्या विकास कार्याला अपेक्षित आणि भरीव फळे येत नाहीत, याची एक अत्यंत महत्त्वाचे कारण म्हणजे सर्व स्तरावर बोकाळलेला भयानक राक्षस भ्रष्टाचार.! ज्याप्रमाणे covid-19 ची लागण देशात वाढत आहे त्याचप्रमाणे या भ्रष्टाचाराने देखील एकही क्षेत्र अस्पर्शित ठेवले नाही. जेव्हा समाजाच्या नीतीचा पगडा सैल होतो तेव्हा समाजात भ्रष्टाचार बोकाळतो. माणुसकी हरवते. त्यामुळे सामाजिक जीवन विस्कळीत बनले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे समाजातील भ्रष्टाचार. भ्रष्टाचाराची रूपे अनेक आहेत, आणि जीवनाच्या सर्व अंगात की वाळवी सारखी पसरलेली आहे.
या भ्रष्टाचाराची आवडते ठिकाण म्हणजे शासकीय व्यवहार. तिथे सत्ता असते, अधिकार असतो. भ्रष्टाचाराची कीड समाजांचे मुळानाच लागलेली आहे.बदली किंवा बढती पाहिजे असेल तर ती जबाबदारी भ्रष्टाचाराकडे सोपवीणे फार सोयीचे होते.
वशिलेबाजी हे भ्रष्टाचाराचे आणखी एक रूप. ओळखीचा किंवा आप्तसंबंध याचा फायदा घेऊन काम साधने हे वशिलेबाजी चे काम. विशेषतः नोकरी मिळविण्याच्या क्षेत्रात वशिलेबाजी ची कर्तबगारी फार प्रसिद्ध आहे. काळाबाजार हे भ्रष्टाचाराची आणखी व्यापारी दर्शन. उपयुक्त व दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा तुटवडा ही काळया बाजाराची जननी आणि अधिक किंमत देऊन वस्तू प्राप्त करणे हा आपला सोस असतो. उपयुक्त व दैनंदिन जीवनाच्या गरजेच्या वस्तूंचा तुटवडा काही अपरिहार्य कारणाने होतो. या परिस्थितीमुळे काळया बाजाराला बहार येतो आणि व्यापारांचा खिसा भरतो.
भेसळ आणि नक्कल हे काळ्याबाजाराचा चुलत किंवा मावस भाऊ, पण विशेष जवळचे सगेसोयरे. दुधामध्ये पाणी मिसळवीणे ही तर सर्वांच्या परिचयाची बाब झाली आहे. रोज नित्यनियमाने गवळी दुधात पाणी मिक्स करतो. फल्लीच्या तेलात पामोलिन तेलाची भेसळ केली जाते. त्यातच हळद मिरच्या पावडर मधील भेसळ समजत देखील नाही.
अफरातफर हे भ्रष्टाचाराची आणखी एक वारसदार. खोटे दस्तऐवज हे त्याचे शस्त्र. हुंडा हा समाजाधिषठीत भ्रष्टाचाराचा एक लोकप्रिय नमुना आहे. वैयक्तिक स्वार्थासाठी याचा उपयोग होतो. हा वैचारिक भ्रष्टाचाराचा आधुनिक अवतार. आणि अलीकडे या अवताराला फार भाव आलेला आहे. खुर्चीचे दर्शन व्हावे म्हणून नेता जनतेला लाच देतो. तर बालाजीचे दर्शन लवकर व्हावे म्हणून भक्त पुजाऱ्याला लाच देतो.
असे का घडते ?याचा विचार केला असता श्रम न करता सगळ्यांना झटपट श्रीमंत बनायचे असते. या श्रीमंतीत माणुसकी विकल्या गेली तरी परवा नाही किंवा आपल्या चारित्र्याचा विचार नाही. आजचा समाज अतिशय शुदद्र भावनेच्या आहारी गेलेला आहे. या भ्रष्टाचाराची बीज समाजामध्ये गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत, शिक्षिता पासून अशिक्षिता पर्यंत, कलावंत, राजकारणी, डॉक्टर ,वकील इत्यादी प्रतिष्ठित व्यक्ती, धर्मरक्षक मंडळी या सर्वांच्या मनात भ्रष्टाचार विषयक विचारांचे थैमान सुरू आहे.
महात्मा गांधीची, नेहरू जींची, ज्योतिबा फुले यांची, लोकमान्य टिळकांची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची परंपरा काळाच्या पडद्याआड गेली. निस्वार्थ देशभक्ती लोपली आणि उरला फक्त भ्रष्टाचाराचा तमाचा

अंधकार!
ही भूमी संतांची आहे. राम कृष्ण या भूमीत जन्माला आले. ज्ञानेश्वर तुकाराम यांनी सत्य आचरणाचा मंत्र दिला. अनेक देशभक्त याच भूमीने जन्माला घातले. अशा या पावन मंगल सात्विक भूमीवर या भ्रष्टाचार नामक राक्षसाने उघड-उघड आकांत-तांडव करावे हेच समाजाला काळीमा फासणारी आहे. भ्रष्टाचार ही समाजाला लागलेली कीड आहे. लाच घेणारा आणि देणारा ही तेवढाच दोषी असतो. भ्रष्टाचार ही गोष्ट मुळापासून नष्ट करायला हवी तर त्याची सुरुवात प्रत्येकाने स्वतः पासुनच करायला हवी. स्वतः पण भ्रष्ट आणि लाचखाऊ लोकांना समाजापुढे आणायला हवं. स्वतः प्रामाणिकपणे काम करायला हवे. सरकारने भ्रष्ट अधिकारी सेच भ्रष्टाचाराला प्राध्यान्य देणार्‍यांवर कडक कारवाई करायला हवी. भ्रष्ट लोकांमुळे देशाची अर्थव्यवस्था डळमळीत होते. देशात असुविधा आणि विषमता निर्माण होते.
प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या कामाला वाव दयायला हवा. आपण आपल्या कामात तसेच सरकारी कामात सुद्धा पारदर्शकता आणायला हवी. आपल्या भारत देशात अण्णा हजारे सारख्या व्यक्तीने भ्रष्टाचार विरोधी आंदोलन पुकारले होते.
भ्रष्टाचार हा क्रूर राक्षस आहे. योग्य नियंत्रण राबवून या भ्रष्टाचारी रुपी राक्षसाला वेळीच आटोक्यात आणणे आवश्यक आहे. यासाठीच हिंदीतील एक उक्ती मला आठवते.
“गुरु जनो की मेहनत न जाने देंगे बेकार, सच्चाई से अपने करेंगे जीवन जीवन गुलजार.”

✒️लेखिका:-सौ. भारती दिनेश तिडके
रामनगर गोंदिया
मो:-8007664039

▪️संकलन:-अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620