
🔹काळ्या फिती लावून शासनाचा निषेध : जिल्हा संघटनेचे सचिव :-प्रा एन टी निकम
✒️नितीन राजे(खटाव,जिल्हा सातारा – विशेष प्रतिनिधी)मो:-9822800812
खटाव(दि.3सप्टेंबर):-महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटने ने केलेल्या मागण्या शासन जाणीवपूर्वक मान्य करत नसून शिक्षकां मध्ये फूट पडण्याचा सरकार कडून प्रयत्न केले जात आहेत.महासंघाच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी यावर्षी शिक्षक दिन हा काळा दिन म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा महासंघाचे सचिव प्रा एन टी निकम यांनी दिली.
राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना महासंघाने विविध प्रलंबित मागण्यांचे पत्रे देऊन चर्चेसाठी वारंवार विनंती केली होती. दि २६ ऑगस्ट रोजीच्या पत्रानुसार दोन दिवसात बैठकीचे आमंत्रण न दिल्यास महासंघ आंदोलन करेल, अशी सूचना दिली होती. त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्या बाबत राज्य महासंघाला न बोलवता शासनाने बैठक घेतली.महासंघाच्या निवेदनानंतर ना.गायकवाड यांनी स्वतः प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासंबंधी दि १८ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत आश्वासन दिले. परंतु या संदर्भात अद्यापही कुठलाही निर्णय शासनाने घेतला नाही. या उलट शिक्षकांचे मोठे संघटन असलेल्या राज्य महासंघाला विश्वासात न घेता चिंटूरपुटूर शिक्षकांचा गट किंवा हातांच्या बोटावर मोजता येतील ऐवढे सभासद असलेल्या नवीन संघटनाशी ना.गायकवाड चर्चा करून महासंघाला डावलत आहेत, आणि असा प्रकार राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक व त्यांचा राज्य महासंघ कदापिही सहन करून घेणार नाही. शिक्षकांच्या समस्या ,प्रश्न यांचे निराकरण न करता शिक्षक वर्गात फूट पाडून शासन राजकारण करत आहे. याबद्दल शिक्षक वर्गात सरकार विषयी प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.याचा निषेध करून यंदाचा शिक्षक दिन हा काळा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्धार राज्यासह जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकानी घेतला आहे.