महापुरूषांचा अपमान नक्की होतो तरी कशाने ?

  54

  आज आपण नेमके कोणत्या दिशेने वाटचाल करत आहोत याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. आपण ज्या ठिकाणी संवेदनशील व्हायला हवं तिथे असंवेदनशील आणि बोथट होतो. जिथे प्रकट व्हायला,बोलायला हवे तिथे मूकदर्शक होतो.जिथे बोलायची आवश्यकता नसते,जिथं शांत बसायला हवे तिथे मात्र खुप बोलत असतो.एखादा वादाचा विषय असेल तिथे अलिप्त राहण्याऐवजी मलाच या विषयाचं अगाध ज्ञान आहे म्हणून तो पाजळत बसतो.

  एवढे बोलण्याचे कारण म्हणजे आपले महापुरुष आणि त्यांचा होणारा अपमान, त्यांच्या नावावरून होणारे वाद.असो.आज प्रथमतः पडलेला प्रश्न असा आहे की महापुरुषांचा अपमान नक्की होतो तरी कशाने?या प्रश्नाचे उत्तर आपण नक्की शोधण्याचा प्रयत्न करुच.पण त्या अगोदर महापुरुषांविषयी थोडी चर्चा करु.

  आपल्या देशाला अनेक महापुरुषांचा अन् त्यांच्या विचारांचा वारसा लाभला आहे. नव्हे तर त्यांच्या विचारामुळे, आचारामुळे अन् अलौकिक अशा कार्यामुळे ते महापुरुष म्हणून आपल्या पुढे उभे आहेत. त्यांच्या कार्याची, विचारांची प्रेरणा घेऊन आपण जीवन जगू लागलो तर आपले जीवन एक माणूस म्हणून यशस्वी तर होईलच आणि त्या महापुरुषांच्या विचारांचा गौरव होईल. असे घडले तरच आपण महापुरुषांच्या विचाराचे खरे वारसदार ठरू.

  पण आज विचारांचा वारसा जपण्यात कोणाला स्वारस्य आहे. जो तो उठतो. महापुरुषांचे नाव जरी कुठे काढले की तलवार काढून लढायलाच तयार होतो.अरे महापुरुष कोणाची खाजगी मालमत्ता आहे का?आणि आपण स्वतः तेवढ्या उंचीचे आहोत का ?हे तरी प्रथमतः आत्मपरीक्षण करायला हवे.

  छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू, पेरियार,टिळक,गांधी असे अनेक महापुरुष या देशात होऊन गेले आहेत. प्रथम हे लक्षात घ्यायला हवे तेपण आपल्या सारखीच सामान्य माणसं होती. पण त्यांच्या असामान्य कार्यामुळे, अलौकिक कार्यामुळे ते महापुरुष झाले. पण हे ही सत्य आहे की त्यांच्या काळात,त्यांच्या हयातीत त्यांच्याकडून पण माणूस म्हणून काहीतरी चुका झाल्या असतीलच.आपल्या सारख्या मनभर नाही तर कणभर तर झाल्या असतील. तो भाग इथे चर्चेचा नाही. चर्चेचा विषय आहे तो असा की,महापुरुषांचा अपमान नेमका होतो कसा?तो अपमान नेमकं करतं कोण?

  छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, यांचे कोणी एकेरी नाव घेतले, कोणी घोषणा दिल्या नाही, डॉबाबासाहेब आंबेडकर यांना अपशब्द वापरले, कुठे पुतळा, स्मारके, किल्ले यांची छेडछाड केली तर आपण महापुरुषांचा अपमान झाला म्हणून पेटून उठतो(मान्य आहे महापुरुषां विषयी आपल्या मनात श्रद्धा आहे आणि ती असायलाच हवी. पण चक्क महापुरुषांचा अपमान झाला .असे म्हणण्याचा नैतिक अधिकार आपल्याला तरी आहे का? ) खरंच असल्या शुद्र गोष्टींनी महापुरुषांचा अपमान होतो? हे जे महापुरुष होऊन गेले आहेत ,आपण विचार करू शकत नाही एवढा संघर्ष, यातना, पदोपदीचा अपमान पचवून ते एवढ्या उच्चकोटीच्या स्थानावर पोहचले आहेत. त्यामुळे एखाद्या वैचारिक दिवाळखोराने जर आगळिक केली तर महापुरुषांचा अपमान नसून तसे करणाऱ्यांच्या संस्काराचे प्रदर्शन आहे.त्यामुळे अशा वैगुण्याकडे दुर्लक्षच केलेले बरे.

  पण अशा घटनांचे राजकारण अथवा स्वहित साधण्यासाठी कोणी उपयोग करून घेत असेल तर तिथे मात्र नक्कीच महापुरुषांच्या विचारधारेचा पराभव झालेला असतो.

  ज्यावेळेस महापुरुषांना,संतांना जातीच्या, धर्माच्या बंधनात अडकवता तिथुनच खऱ्या अर्थाने महापुरुषांच्या अपमानाला सुरुवात होत नाही का?

  ज्यांनी आपलं आयुष्य समाजासाठी वेचलं,ज्यांनी त्यासाठी अनेक यातना भोगल्या,आयुष्यभर संघर्ष केला.त्यांचं आयुष्य हे विशेष अशा जातसमुहासाठीच होतं असं म्हणणं म्हणजे महापुरुषांचा अपमान नव्हे का?

  आता बरीच मंडळी अशी आहेत की महापुरुषांचा सारखा उदोउदो करतात. फेसबुक, व्हाट्सएपच्या डिपी,रिंगटोन सगळी महापुरुषांची.काही महाभाग तर देवासारखी पुजाअर्चा करतात.काहीजण तर आमचा बाप म्हणून मोकळे होतात. हे सगळं ठिक आहे. पण आचरणाचं काय?आचरणाच्या नावाने शिमगा.

  महाराजांच्या नावाने शंख फुकणारे महाराजांसारखे वागतील का?परस्त्रीशी ,समाजातील इतर अन्य घटकांशी महाराजांप्रमाणे वागतात का? स्वराज्यात अनेक जातधर्माचे लोक राहत होते. तिथे कधी अन्याय वा परकेपणाची वागणूक दिल्याचे वाचनात आले नाही. मग तुम्ही या तत्वावर चालता का? तसे वागत असाल तर ते नक्कीच गौरवास्पद आहे. पण याची शक्यता पुसटशी आहे.जर तुम्ही महाराजांच्या विचारधारेला हरताळ फासून स्वहित साधण्यासाठी, स्वार्थ जोपासण्यासाठी, जातीचं वर्चस्व गाजवण्यासाठी करत असाल तर तो महाराजांचा अपमान नव्हे का?महाराजांच्या गौरवास्पद कार्यावर पाणी फिरवण्याचा हा प्रकार नव्हे का?

  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना डोक्यावर घेऊन मिरवणारे प्रत्यक्ष आंबेडकरी विचारधारेवर चालत आहेत का? शिका संघटीत व्हा संघर्ष करा कोणी कोणी आत्मसात केलं आहे. बुद्ध विचार, आंबेडकरी विचार कोण आचरणात आणतं? संविधानाच्या नियमानुसार कोण वर्तन करतं?जे करत असतील त्यांचं कौतूकच.पण अशी मंडळी बोटावर मोजण्या इतपत असेल.स्वत:चे आचरण आंबेडकरी विचारधारेशी विसंगत असेल, घटनेला आपल्याच वर्तनातून कोणी पायदळी तुडवत असेल तर तो आंबेडकरांचा अपमान नव्हे का?त्यांच्या विचारधारेशी फारकत नव्हे का?

  असे जवळपास प्रत्येक महापुरुषांच्या बाबतीत घडून येते. त्यांचे विचार बाजूला राहतात. त्यांचे नाव, स्मारक,पुतळे,घोषणा,जयंत्या यांच्यावरुन होणारा जो वाद यावरून महापुरुषांचा अपमान होतो असे म्हणणाऱ्यांनो तो महापुरुषांचा अपमान नसून तुमच्या संकुचित बुद्धीचा,शुद्र विचारांचा परिपाक आहे. त्यातून होणारे घाणेरडे राजकारण जे असते त्यातून मात्र महापुरुषांचा अपमान होत असतो.हे खरे नाही का?

  महापुरुषांचा गौरव ,मान सन्मान वाढवायचा असेल तर महापुरुष डोक्यावर घेण्यापेक्षा आपल्या आचरणात आणायला हवे.त्यांचे दैवतीकरण करण्यापेक्षा त्यांची विचारधारा आत्मसात करून तसे आचरण करु लागलो तर नक्कीच महापुरुषांचा गौरव होईल. अन्यथा आपल्याला अधोगतीकडे जाण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही.

  ✒️लेखक:-सतिश यानभुरे सर
  शिक्षक,खेड तालुका जिल्हा पुणे, महाराष्ट्र राज्य
  मो-86054 52272

  ▪️संकलन:-नवनाथ पौळ
  केज तालुका प्रतिनिधी
  मो:-8080942185