करोनाग्रस्त देहाचे अंत्यदर्शन शक्य

35

✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नागपूर(दि.4सप्टेंबर):-करोनाग्रस्त व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे अंत्यदर्शन घेणे आप्तेष्टांना कठीण होऊन बसले आहे. आयुष्यभर नातेसंबंध जोपासले, समाजाचे ऋण फेडले अशांनासुद्धा त्यांच्या अंत्यसमयी कुणीच पाहूच शकत नाहीत. इच्छा असूनही देहावर फुले अर्पण करून हात जोडण्याचे दिवस राहिलेले नाहीत. या समस्येवर तोडगा म्हणून शहरातील तीन संशोधकांनी अतिनील किरणावर (अल्ट्रा व्हायलेट रेंज) आधारित उपकरण तयार केले आहे. याद्वारे संक्रमणाच्या भीतीमुळे देहाभोवती गुंडाळलेले प्लास्टिक निर्जंतुक होऊन अंत्यदर्शन घेणे सहजशक्य होणार आहे.

ओळखीतली, नात्यातील व्यक्ती करोना पॉझिटिव्ह येऊन मृत्यू पावल्यास कुणीही त्या कुटुंबाकडे इच्छा असूनही जाऊ शकत नाही. गेल्या पाच महिन्यांत ही बाब अत्यंत प्रकर्षाने निदर्शनास आली. त्यावर उपाय शोधण्याच्या दिशेने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. संजय ढोबळे, दादासाहेब बालपांडे फार्मसी कॉलेजचे प्रा. डॉ. नीलेश महाजन आणि सेवादल महिला महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाच्या डॉ. निरुपमा ढोबळे यांनी प्रयत्न सुरू केले. तिघांनी मिळून अतिनील किरणावर आधारित उपकरण तयार केले आहे. यामध्ये करोनाबाधित मृत व्यक्तीला ठेवण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या आवरणाचे निर्जंतुकीकरण होते. परिणामत: पूर्णपणे करोना विषाणूमुक्त झालेल्या देहाचे एक मीटर अंतरावरून कुणीही दर्शन घेऊ शकतो. मुख्य म्हणजे या उपकरणामुळे अंत्यसंस्कार करणाऱ्याचासुद्धा करोनापासून बचाव होतो.

असे आहे तंत्रज्ञान:-

अल्ट्रा व्हायलेट तंत्रज्ञानामुळे मृतदेहाभोवती गुंडाळलेल्या प्लास्टिकवरील करोनाचे विषाणू पाच मिनिटात नष्ट करतात. प्लास्टिक आवरणावर अतिनील किरणे पडल्यामुळे कुठल्याही प्रकारची हानी होत नाही. मृत शरीर उपकरणातून बाहेर काढल्यानंतर अतिनील किरणाद्वारे उपकरणदेखील निर्जंतुक करण्यात येते.

मेडिकलला दिले उपकरण:-

करोनामुळे निर्माण झालेले परस्परातील अंतर दूर करणाऱ्या उपकरणाचे पेटंट मिळाले आहे. अमरावती येथील निशाद इंडस्ट्रीने उपकरणाच्या निर्मितीमध्ये सहकार्य केले. नुकतेच हे उपकरण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेडिकल) प्रदान करण्यात आले. याप्रसंगी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे उपस्थित होते.