आदर्श शिक्षक पुरस्कार अन् वास्तवता

25

 

गुरुर्ब्रह्मा, गुरुर विष्णू
गुरुर्देवो महेश्वरा!
गुरु साक्षात परब्रम्ह
तस्मै श्री गुरुवे :नमः

आज 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. हा दिवस आपल्या भारतात “शिक्षक दिन” म्हणून साजरा केला जातो. 5 सप्टेंबर 1888 रोजी डॉक्टर राधाकृष्णन यांचा जन्म झाला. डॉक्टर राधाकृष्णन हे एक शिक्षक होते, तसेच ते भारताचे दुसरे राष्ट्रपती हि होते. त्यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. नीतिशास्त्र या विषयाचे प्राध्यापक होते. शिक्षक हा सामाजाचा निर्माण कर्ता आहे, तो राष्ट्राचा आधारस्तंभ आहे.
आजच्या दिवशी शिक्षकांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला जातो. शिक्षकांचा सन्मान करण्याची ही परंपरा जुनी आहे. शिक्षक म्हणजे तरी काय?
शि:-म्हणजे शील
क्ष:-म्हणजे क्षमा
क:-म्हणजे कला

ज्यांच्याकडे शील, क्षमा आणि कला यांचा त्रिवेणी संगम आहे तो म्हणजे शिक्षक. डीएड किंवा बीएड ची डिग्री घेऊन आपण आपल्या नावापुढे शिक्षक हे लेबल.पण प्रत्येकाने विचार केला पाहिजे की खरंच झालो का मी शिक्षक?
खरं तर शिक्षक हा लाखो-करोडो मन घडविणारा शिल्पकारच! कुंभार जसा फिरत्या चाकावर मातीला आकार देऊन मडकं घडवत असतो तेच काम शिक्षकाच आहे. काही लोक बोलताना “माझे विद्यार्थी” असा उल्लेख करतात, त्यात चुकीचं काहीच नाही पण “माझी मुलं” कानाला ऐकायला जास्त बरं वाटतं. माझी मुलं म्हणण्यात जो गोडवा आहे तो विद्यार्थी म्हणण्यात नक्कीच नाहीये.
शाळा आहेत म्हणून आपण आहोत, हे सूत्र आहे, मग आपलं काम तेवढेच आत्मीयतेने प्रामाणिकपणे करायला हवे.
फक्त पुरस्कार प्राप्त करण्यासाठी आपण आदर्श नको बनूयात. आपण आपल्यालाच आदर्श घालून घेतला तर पुरस्कार काय हो? लाखो सत्कार मूर्ती तयार करू शकतो. कधीतरी आपल्या शाळेतला एखादा जुना मुलगा भेटतो आपल्याला बर्‍याच वर्षांनी आणि त्याचे यश ऐकत असताना आपसूकच ऊर भरून येत असतो आपला. अहो मग हाच तर सर्वोत्कृष्ट पुरस्कार असतो आपल्या आयुष्यातला. असे अनेक पुरस्कार मिळविण्यासाठी आणि आपलं काम प्रामाणिकपणे करण्यासाठी सर्व शिक्षक मित्रांना खुप खुप शुभेच्छा.
आजकाल मात्र पुरस्कार मिळविण्यासाठी ओळख, वशिला, पार्टी वगैरे चालतात.ज्याची लायकी नाही त्यांना ही भ्रष्टाचार वशिल्याने पुरस्कार मिळतो.?म्हणून आपल्या विद्यार्थ्यांनी दिलेली शिक्षणाची पावती हाच आपला खरा पुरस्कार आहे.
काही आदर्श शिक्षकांमध्ये आदर्श गुणवैशिष्ट्ये असतात का? हा प्रश्नच निर्माण होतो.
शिक्षक हा व्यसनमुक्त असावा. शिक्षकांचे चारित्र्य निष्कलंक असावे. अध्यापन कौशल्ये प्रभावी असावी. स्वभाव मनमिळाऊ असावा. शिक्षकाचे वाचन भरपूर असावे. शिक्षक पोशाख साजेसा असावा. शिक्षकाने समाजातील प्रत्येक वर्गाशी आपुलकीने ,सहकार्याने वागायला पाहिजे. विद्यार्थ्यांचे मन जाणून घेणारा सचेतन अध्यापन करणारा असावा. शिक्षक उपक्रमशील असावा. शिक्षकात व्यवहारचातुर्य असावे. विविध अध्ययन अनुभव,विविध प्रकारे विद्यार्थ्यांपर्यंत देणारा असावा.
उपरोक्त विचार माझ्या मनात सतत घोळत राहिले. ज्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला त्यातील काही खरोखरच आदर्श आहेत का? प्रत्यक्षात मात्र वेगळेच चित्र दिसते. शिक्षक व्यसनमुक्त असावा असे आपण म्हणतो, पण हाच शिक्षक भर शाळेत सर्व विद्यार्थ्यांसमोर खऱ्याची पुडी काढतो व खातो. प्लास्टिक इतरत्र फेकून पर्यावरणाचे रक्षण करण्याऐवजी भक्षण करताना दिसतो. काही शिक्षक तर भर वर्गात तंबाखू घोटतात, आणि सायंकाळ झाली की बारमध्ये शिरतात. . काही शिक्षक नुसते इकडे तिकडे कारकुनाचे काम करताना दिसतात. वर्गात खडू धरतात की नाही याबाबत शंकाच येते. शासनाच्या विविध योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावे अशी रास्त अपेक्षा आहे. पण काही योजना केवळ कागदावरच दिसतात. पुरस्काराबाबत शिक्षकांची उदासीनता ची भावना पाहायला मिळत आहे. ज्यांचे पद, वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याच नातेवाईकांना व ओळखीच्या लोकांना पहिले पुरस्कार दिला जातो. अशी कितीतरी कारणे सांगता येतील. नुसती वरिष्ठांशी ओळख, वशिलेबाजी, पार्ट्या, इत्यादीमुळे पुरस्कार प्राप्त केला जातो. त्यामुळे शिक्षकाकडे आदर्श भावनेने पहायला आज तरी कोणतेही शिक्षक तयार नाही हे कटू सत्य आहे.
आणि ते चांगले गुण वैशिष्ट्ये असलेले कार्यक्षम शिक्षक असतात ते शिक्षण विभागातील वरिष्ठ पदाधिकारी यांच्या भीतीमुळे या पुरस्कारांमध्ये रुची घेत नाही, कारण पदाधिकारी त्यांना घाबरवितात,व त्यांच्यातून हेतुपुरस्पर उणिवा काढून आपल्या परिचयाच्या व्यक्तीला आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यासाठी प्राधान्य देतात.माझ्या मते जिल्हास्तरावर तर पुरस्कार फाईल तयार कशी करावी याची मार्गदर्शक तत्वे प्रथम सांगायला हवीत. पदाधिकारी वेळेवर तोंडी मुलाखतीस बोलावून आपल्या मनमर्जी ने पुरस्कारांची तत्वे,निकष तयार करतात. निवड समिती ही पदाधिकाऱ्यांची असायला हवी. परंतु काही जिल्हा पातळीवर पुरस्कारासाठी तसे आढळून येत नाही.शिक्षण विभागातील राजनीति मुळे जिल्ह्यातील गुणवत्तापूर्ण शिक्षकही अर्ज करत नाही. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करू शकतो, अशी गुणवैशिष्ट्ये असलेले चांगले शिक्षकही अर्ज टाकत नाही. ही एक शोकांतिका आहे!.
यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळतो अशा काही शिक्षकांना पाहून शिक्षण पेशातीलच शिक्षक व समाज हसत राहतो की खरंच याला आदर्श म्हणतात का?
म्हणून मला असे वाटते की!आदर्श शिक्षक पुरस्कार घेण्यासाठी वशिलेबाजी आवश्यक आहे!!!
शासनाने निश्चित केलेल्या निवड समितीतील सदस्यांना न नियुक्त करता अयोग्य व्यक्तीची निवड समितीत निवड करून त्यांच्यावर कार्य सोपवून महत्त्वपूर्ण आदर्श शिक्षक पुरस्कारला गालबोट लावले जाते.
21 व्या शतकातील महा प्रभुत्व निर्माण करण्याचे आपण स्वप्न पाहात आहे,परंतु तिथेच जर हि आदर्श शिक्षकांच्या गुणवैशिष्ट्यांचा ची विटंबना होत असेल तर समाज व देशापुढे फार मोठा प्रश्न उभा आहे?
डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जर हा पुरस्कार देण्यात येत आहेआणि अशा प्रकारची सत्य परिस्थिती असेल तर तर डॉक्टर राधाकृष्णन यांचा फार मोठा अपमान आहे असे मला वाटते…

✒️लेखिका:-सौ.भारती दिनेश तिडके
रामनगर, गोंदिया.
मो:-8007664039