स्वातंत्र्याची 74 वर्षे आणि विकसनशील भारत..!

48

भारतीय स्वातंत्र्याचा सूर्य गेली 74 वर्ष डौलात अन् दिमाखात चालतोय…
गेली 74 वर्ष भारतीय भाषा पर्वकाळाचा इतिहास सांगताहेत…

हुतात्मा वीरांच्या आहुतीवर…आणि हुतात्म्यांच्या बालिदानावर उभारलेला हा देश…गेली 74 वर्ष लोकशाहीचे आभाळ शिरावर घेऊन साऱ्या जगाला ग्वाही देतोय .. आणि साऱ्या जगाला ओरडून सांगतोय की ह्या उगवलेल्या भारतीय स्वतंत्र सूर्यकिरणांना मावळणं कधी ठाऊक नव्हतंच…आणि ती कधी मावळणारही नाहीत…!
गेली 74 वर्ष माझ्या भारतीय स्वातंत्र्याचा सूर्य डौलात चालतोय..!

काय आहे हा भारत..?
नेहरू म्हणतात भारत एक मिथक.. एक विचार आहे..!
आणि गांधीजी म्हणतात ज्या देशातून साऱ्या जगात हवा वाहते असा हा भारत देश आहे..!
माझ्या मते भारत हा संस्कृतीचा ठेवा आणि मूल्यांच अधिष्ठान आहे.. स्वप्न आणि विशिष्ट दृष्टिकोन असणारा देश आहे…!
अमेरिका जर वितळते भांडे असेल तर भारत हे जेवणाचं ताट आहे..!
भारत असा देश आहे जिथे 51% निरक्षर असूनही भारताने प्रशिक्षित इंजिनिर्स आणि शास्त्रज्ञांची फौज निर्माण केली…
गरिबी मागासपणा आणि इतर अनेक अडचणी असूनही इतर कोणत्याही देशापेक्षा अधिक अद्ययावत सॉफ्टवेअर्स निर्माण केले…!
महत्तम अन्वयार्थ आणि भारताच्या अस्मितेचं प्रतीक असलेल्या तिरंग्यांचा मान ठेवत तो तिरंगा भारतवासीयांनी सार्थ केला ..! त्याग , शौर्य आणि साहसाची परिसीमा दाखवून केशरी….सत्य आणि पावित्र्याचा पंढरा रंग सार्थ करत जगासमोर शांतिदूत म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण केली….तर हिरव्या रंगाच अनुसरण करत समृद्धी आणली अन्नधान्य आणि इतर अनेक बाबतीत स्वयंपूर्णता सिद्ध केली….परंतू प्रगतीचं प्रतीक असलेल्या अशोकचक्राचं अनुसरण करत असताना मात्र भारताच्या प्रगतीचा वेग जरा कमी पडला..!
एक छोटंसं उदाहरण पहा नं….
भारताच्या तुलनेने अतिशय कमी आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात 117 व्या क्रमांकावर असलेला ..तरीही लोकसंखेच्या घनतेच्या दृष्टीने 3ऱ्या क्रमांकावर …. नैसर्गिक साधन संपत्तीचा अभाव …अगदी पाणीही आयात करणारा एक देश सिंगापूर…!
आज जीडीपी पर कॅपिटा च्या दृष्टिकोनातून सिंगापूर जगात 7व्या क्रमांकावर आहे आणि तिथला प्रत्येक सहावा व्यक्ती करोडपती..!
साठाव्या दशकात सिंगापूर हा झोपडपट्टयांनी भरलेला एक कसबा आणि गुंडागर्दी, गरिबी आणि बेरोजगरीनं ग्रासलेला एक देश होता..!
1965 साली सिंगापूर स्वतंत्र झाल्यानंतर 1970 पासून खऱ्या अर्थाने आर्थिक विकास साधत या देशाने विकसित राष्ट्र होण्याकडे आपली वाटचाल सुरु केली आणि त्या प्रगतीतील सर्वात मोठा वाटा होता तिथल्या सरकारचा त्यांनी राबवलेल्या योजनेचा आणि एक अनोख्या करप्रणालीचा …!
आज सिंगापूर सर्वात विकसित राष्ट्रपैकी एक आहे…. जिथे बेरोजगारी “न” च्या बरोबरीने…आणि भ्रष्टाचार मुक्त…!
ह्याच पार्श्वभूमीवर 18 वर्षे अगोदर स्वतंत्र झालेला , क्षेत्रफळाने कैक पटीने मोठा..नैसर्गिक साधन संपत्तीच्या आणि मनुष्यबळाच्या, बुद्धिमत्तेच्या दृष्टीनेही समृद्ध असलेला भारत देश अजूनही विकसनशील का…?
ह्याचा विचार का होऊ नये..?
नेमक्या कोणत्या गोष्टी भारताला विकसित होण्यात बाधक आहे या दृष्टीने विचार होणे नक्कीच गरजेचे आहे….!
याचे गूढ नक्की सरकारी धोरणात …करप्रणालीत …की देशवासीयांच्या मानसिकतेत..???
जेंव्हा या गोष्टीचा फक्त विचार नव्हे .. तर .. अंमलबजावणी होईल तेव्हा ….आणि तेव्हाच..
अमरत्वाच्या वाटेवर आपल्या पावलांचे ठसे उमटवून भारताचा स्वातंत्र्य सूर्य खऱ्या अर्थाने डौलात चालेल…!

✒️लेखिका:-सौ. सायली कस्तुरे-बोर्डे

▪️संकलन:-अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620