भूक नावाच्या रांडंचा
जर खून करता आला असता तर……
तर…तर…
माझी आई कितीतरी वेळा
गुन्हेगार झाली असती….
निवद खायला आलेल्या
कावळ्यांनो…
पोटभर खावा
पण माझ्या आईचं पोट
भरलेला एकतरी पुरावा द्या…..
नाहीतर इथंच तुमची कत्तल करीन….
जिंदगीभर तिच्या आतड्यात थयथय नाचलात तेव्हा,
हिच भूक उकिरड्यावर
कुत्र्यांशी भांडत राहिली….
जिवंत देहाला घास
भरवणारा पंधरवडा कुठल्या धर्माने निर्माण केला?
हे तरी सांगा मला एकदा
नाहीतर कुणाच्याच पिंडाला शिवायला,
एकही कावळा मी जिवंत ठेवणार नाही….

पण फक्त कावळे संपतील भूक मात्र जिवंतच राहणार आहे…..
आणि भूक जिवंतच ठेवावी लागेल मला…
कारण एकदा तो दिवस उगवणार आहे…
सगळेच कावळे बोलणार आहेत माझ्या कवितेत
कि,आम्ही फक्त कावळे आहोत…
कुणाचे पूर्वज नाही…..
तोपर्यंत कविते तू अशीच
सळसळत राहा….
————
✒️लेखक/कवी:-दंगलकार-नितीन चंदनशिवे
कवठेमहांकाळ.सांगली
मो:-7020909521

▪️संकलन:-नवनाथ पौळ
केज तालुका प्रतिनिधी
मो:-8080942185

महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED