दहा गावात उभारणार सुसज्ज पशुवैद्यकीय दवाखाने- कृषी व पशुसंवर्धन सभापती सविताताई बाळासाहेब मस्के

51

✒️गोपाल भैया चव्हाण(बिड प्रतिनिधी)मो:-9665667764

बीड(दि.5सप्टेंबर ):-जिल्ह्यातील दहा गावात सुसज्ज पशुवैद्यकीय दवाखाना उभारण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या माध्यमातून 3 कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या सुचनेप्रमाणे व मा.आ.अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनानुसार सदरील इमारत प्रति ३० लक्ष रुपये याप्रमाणे दहा गावातील पशुवैद्यकीय दवाखाना इमारतीस मंजूरी देण्यात आली आहे. मंजुरी देण्यात आलेली दवाखान्याची कामे लवकरच सुरु करुन ती दर्जेदार करण्यात येतील असे बीड जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती सविताताई बाळासाहेब मस्के यांनी सांगितले.

बीड जिल्ह्यातील अनेक गावातील पशुवैद्यकीय दवाखाण्याची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झालेली आहे. या इमारती मोडकळीस आल्याने पशुपालकांची गैरसोय होत होती, शिवाय पशुवैद्यकीय अधिकारी यांना देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. दरम्यान याठिकाणी नवीन पशुवैद्यकीय दवाखाना इमारत कामासाठी जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यासाठी बीड जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती सविताताई बाळासाहेब मस्के यांनी प्रयत्न केले होते. त्यानुसार बीड जिल्ह्यातील दहा गावातील पशुवैद्यकीय दवाखाना इमारत बांधकामास जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या माध्यमातून तब्बल तीन कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. दरम्यान बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री मा.धनंजय मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी काँग्रेसचे मा.आ.अमरसिंह पंडित यांच्या सुचनेनुसार दहा गावातील पशुवैद्यकीय दवाखाना इमारतीला मंजूरी देखील देण्यात आली आहे.

यामध्ये गेवराई तालुक्यातील कोळगाव, उमापुर, चकलांबा, माजलगाव तालुक्यातील माजलगाव, गंगामसला, अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर, केज तालुक्यातील भोपळा, लहुरी, परळी तालुक्यातील धर्मापुरी व वडवणी तालुक्यातील कुप्पा येथील गावांचा समावेश आहे. या दहा दवाखाण्यासाठी प्रति 30 लक्ष प्रमाणे एकुण तीन कोटी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तर एकाच वेळी बीड जिल्ह्यात तब्बल दहा दवाखान्यांसाठी 3 कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्याची हि पहिलीच वेळ आहे. सदरील मंजुरी देण्यात आलेल्या गावात हि सुसज्ज पशुवैद्यकीय दवाखाने दर्जेदार पध्दतीने बांधून ती पशुधनाच्या सेवेत सुरु करण्यात येतील. या नवीन पशुवैद्यकीय दवाखान्यामुळे पशुपालकांना उत्कृष्ट व दर्जेदार पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहे. तसेच जिल्ह्यातील अन्य मोडकळीस आलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी देखील निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बीड जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती सविताताई बाळासाहेब मस्के यांनी सांगितले.