असाच असावा शिक्षक

33

आर्य संस्कृतीत गुरूंची लक्षणे सांगितली आहेत:
शान्तो, दान्तो, कुलीनश्च, विनीत, शुद्धवेषवान|
शुद्धाचार:, सुप्रतिष्ठ:, शुचिर्दक्ष, सुबुद्धीमान||

५ सप्टेंबर, शिक्षकदिन. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो. अनादी काळापासून आपल्या देशात शिक्षकांना मानाचे स्थान दिले जाते. त्याचे स्मरण समाजाला व्हावे, शिक्षकांच्या कार्याचा गौरव व्हावा,त्यांच्याकडून समाजाला मिळत असलेल्या ज्ञानदानाची परतफेड करण्याचा थोडासा तरी प्रयत्न व्हावा या उद्देशाने शिक्षकदिन साजरा करावयाचा असतो.

शिक्षक हे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत असतात. शिकविणे हा शिक्षकांच्या बाबतीत आनंदाचा ठेवा असतो. ज्ञान देणे हे गुरूचे काम व ज्ञान ग्रहण करणे हे शिष्याचे कर्तव्य असते. गुरुशिष्य हे नाते दृढ ऋणानुबंधाचे असते. जसा शिक्षक तसे विद्यार्थी घडत असतात. विद्यार्थी म्हणजे पुढे मोठ्या होणाऱ्या वृक्षाची मुळे असतात. मुळांना खतपाणी घातल्यावर जसे ते सर्व झाडाला पोहचते तसे चांगल्या संस्काराचे खतपाणी मुलांना मिळाले तर उत्तम भावी नागरिक मिळतील, देशाचे आधारस्तंभ तयार होतील.

शिक्षकाने शिक्षकी पेशा ही एक जबाबदारी किंवा ओझे न समजता ती एक संधी आहे हा दृष्टिकोन ठेवावा. शिक्षकाने आपण एका सामाजिक अभियंत्याचे (social engineer) काम करत आहोत याचा अभिमान बाळगला पाहिजे.
विद्यार्थ्यावर निखळ, निरंतर प्रेम करणे हे शिक्षकाचे आद्य कर्तव्य आहे. त्यांच्यातील सुप्त कला आणि कौशल्य विकसित करण्याचा छंद शिक्षकाला हवा. विद्यार्थ्यांची गरज काय आहे हे शिक्षकाचे उद्दिष्ट असावे. विद्यार्थ्यामध्ये मानवतावाद रुजवणे हा शिक्षकाचा धर्म असावा. मनुष्य आणि पशू यातील अंतर शिकवणे हे त्याचे सांस्कृतिक कर्म असावे. विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम निर्माण करणे हे शिक्षकाच्या आनंदाच स्वरूप असावं. सत्य शोधायला शिकवणे ही शिक्षकाची विज्ञान दिशा असावी. विद्यार्थ्यांना नवनवीन ज्ञान देणे हे शिक्षकाच्या जिवंतपणाचे लक्षण असावे.

शिक्षक हा विद्यार्थ्यांमध्ये लपलेला राजहंस शोधणारा, अनुभवाची शिदोरी देणारा, मुल्यांची रुजवण करणारा, आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक असणारा, विद्यार्थ्याचा प्रगतीत इतिकर्तव्यतता मानणारा असावा. शिक्षक हा मुलांमध्ये देव पाहणारा, त्याचा आत्मविश्वास जागृत करणारा, विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व फुलवणारा असावा. अंगी प्रयोगशीलता असणारा, प्रसंगी कठोर, शिस्तप्रिय, कठोर नजर ठेवणारा पण कोमल अंतकरणाचा, कोवळ्या कळ्याना अलगत फुलवणारा आणि फोफावले वृक्ष पाडून मनोमन आनंदित होणारा असावा.
शिक्षकासमोर चैतन्याने रसरसलेली कोंब दिवसागणिक फुलत असतात. शिक्षणाचा आत्मा म्हणजे सुसंस्कार. हे संस्कार प्राथमिक शाळेपासूनच व्ह्यायला हवेत. ही करणाऱ्या शिक्षकाने समाजाच्या लाटांमध्ये वाहत न जाता आदर्श शिक्षकाचेच जीवन जगले पाहिजे. शिक्षकाने नेहमी ज्ञानाचा पाठपुरावा केला पाहिजे . नवनवीन ज्ञान आत्मसात केले पाहिजे. अवांतर वाचन, चिंतन, मनन केले पाहिजे. शिक्षकाची आपल्या कामावर निष्ठा असायला हवी. आपल्या कामाचा अभिमान वाटायला हवा.

महाराष्ट्राच्या अनेक शाळेत असे धडपडणारे शिक्षक आहेत. धडपडणारा शिक्षक हा विद्यार्थीभिमुख असतो. अंतर्मुख बनतो. हसतमुख असतो. त्याच्याजवळ बुद्धीची कल्पकता असते. कृतीमध्ये निर्भयता असते. वाणीत ऋतुजा दिसते. त्याची प्रत्येक कृती विद्यार्थी हिताची असते. असे शिक्षक विद्यार्थी वेडे असतात.

अशा प्रकारे शिक्षकाचे समाजातील स्थान अतिशय महत्वाचे असते.बका पिढीतील ज्ञान दुसऱ्या पिढीपर्यंत पोहाचावणारा तो दुवा असतो. संस्कृतीचा दीप शिक्षकांमुळेच तेवत राहतो. शिक्षक हे राष्ट्राचे भविष्य ठरवतात. शिक्षकाच्या स्वस्थावरा राष्ट्राचे स्वास्थ अवलंबून असते. शिक्षकाच्या मानसन्मानाच्या बऱ्याचवेळा आपण करतो पण आपले शब्द आणि कृती यात मेळ नसतो. समाजाने शिक्षिकी पेशाचा योग्य आदर राखला पाहिजे. शिक्षकाच्या सुसंस्कारित मनातूनच देशाला महासत्ता बनविणारे, उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहणारे तरुण निर्माण होतील. यासाठी गरज आहे शिक्षक पालक आणि समाज यांच्यातील सुसंवादाची…

✒️लेखिका:-श्रीम. शांता मरकड/दहातोंडे(प्राथ. शिक्षिका), चांदा, ता- नेवासा,जि. अहमदनगर