आक्रोश विनाअनुदानित शिक्षकांचा

13

मी कालच काही अपवादात्मक शिक्षकांच्या वैगुण्याकडे आपल्या सर्वांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.बऱ्याच लोकांनी तो वाचला. वाचून प्रतिक्रिया पण दिली. काही लोकांनी फोन करुन विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रश्नाबद्दल लिहा.बोला.त्याचे चटके आम्ही भोगतोय.असा मित्रवजा सल्ला दिला होता.काल दिवसभर शक्य होईल तेवढे हा प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न केला.विनाअनुदानित शिक्षकांशी संपर्क साधला.त्यांच्या कडून या प्रश्नाचे गांभीर्य समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सोबत जो संवाद साधला त्यातून जे बाहेर निघालं आहे ते आपल्या सर्वांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.

🔸महाराष्ट्रातील विनाअनुदानित शिक्षकांची संख्या….

महाराष्ट्रात जवळपास विस हजाराच्या आसपास विनाअनुदानित शिक्षक कार्यरत आहेत. याच्यापेक्षा जास्त आकडा असू शकतो.काही शिक्षकांची संस्थेच्या दफ्तरीच नोंद नाही तर सरकार दरबारी कशी नोंद होईल. संस्थाचालक तुटपुंज्या वेतनावर या शिक्षकांकरवी आपले काम निभाऊन नेतात. स्वतः विद्यार्थ्यांकडून अवाच्या सव्वा फिस आकारणी करतात.आणि शिक्षकांना मात्र वाटाण्याच्या अक्षता दाखवतात.

🔹शिक्षकांचा संयम…

विनाअनुदानित तत्वावर हे शिक्षक जवळपास पंधरा ते विस वर्षापासून कार्यरत आहेत. ते अगदीच तुटपुंज्या मानधनावर. काही शिक्षक तर विनामूल्य सेवा देत आहेत असे नाहीतर आपले आयुष्यच खर्ची घालत आहेत. फक्त एकाच आशेवर की कधीतरी शासन दरबारी आपली कैफियत मान्य होईल आणि आपल्याला न्याय मिळेल. आपल्याला रोजगार मिळेल.आपल्याला नोकरी मिळेल.आपलं आयुष्य तर तसेही निम्म्याच्या वर खर्ची झाले आहे निदान आपल्या पाल्यांस तरी उज्वल भविष्य लाभेल.या आशेने शाळेवर काम करत आहेत.
पण निर्ढावलेल्या सरकारांना आणि पैस्याच्या गादीवर लोळणाऱ्या पुढाऱ्यांना या शिक्षक बापड्यांचे प्रश्न आणि त्यांची गरिबी कशी दिसणार?कोणतेही सरकार फक्त आश्वासनाचे गाजर दाखवणार आणि आपले पाच वर्षे ढकलणार.

🔸संस्थाचालक नवे सावकार….

शिक्षणासारखे पवित्र कार्य करणारे संस्थाचालक हेच नवे.सावकार झाले आहेत. नोकरीचे आमिषे दाखवून उमेदवारांकडून लाखोने उकळायचे आणि पगार म्हटलं की सरकार कडे बोट दाखवायचे, सरकारी अनास्थेकडे बोट दाखवायचे .असा सर्रास प्रकार चालू आहे. उमेदवार पात्र असो वा नसो जवळपास पंचवीस ते तीस लाखापर्यंत डोनेशनच्या नावाखाली पैसे उकळण्याचे अनेक उदाहरणे माझ्या आजुबाजुला पाहिले आहेत. ते पैसे देऊन पण दहा दहा वर्षे फुकटात रखडणाऱ्या शिक्षकांची संख्या आज महाराष्ट्रात कमी नाही.

🔹लॉकडाऊनच्या काळातील बेरोजगार…..

कोरोना महामारीचे संकट आले आणि राज्यासह देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. सरकारने सर्वांनाच पगार द्या असे निर्देश दिले होते. पण विनाअनुदानित शिक्षकांना मात्र त्यांच्या संस्थाचालकांनी वाऱ्यावर सोडले. काही अपवादात्मक संस्थाचालकांनी या आपल्या कर्मचाऱ्यांना सांभाळले पण जादातर कर्मचाऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला,बेरोजगारीला सामोरे जावे लागले.
माझे एक जवळचे मित्र आहेत. पुण्यात एका संस्थेवर जवळपास पंधरा वर्षापासून काम करत आहेत.मी पण.सहा महिने तिथे अडीच हजार रुपयावर काम केले होते. मी २००८ साली जिल्हा परिषद वर नोकरीत लागलो. ते तेंव्हापासून तिथेच आहेत. आणि आज ८००० रु.वर माध्यमिक वर्गांवर अध्यापनाचे काम करतात. आज मार्केट ची म्हणजेच महागाई २००८ च्या तुलनेत कुठे आहे आणि या शिक्षकांचा पगार कुठे आहे?याचा विचार ना सरकार करत आहे ना संस्थाचालक.त्यांना लॉकडाऊनच्या अगोदरच्या काळातील चार महिन्यांचा पगार आणखी भेटला नाही. तर या लॉकडाऊनच्या काळातील तर लांबच राहिला.
गुणवत्तेच्या बाबतीत पण ही शाळा कुठे कमी नाही. दहावीचा सेमी मिडीयम असो,मराठी माध्यम असो वा इंग्रजी माध्यम सर्वांचा निकाल १००℅आणि गुण पण चांगले.९५%च्या वर जवळपास २०%मुले या वर्षी आहेत. पण त्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांना पगार मात्र कित्येक महिने मिळालाच नाही. हे फक्त एक उदाहरण आहे. असे अनेक उदाहरणे गावागावात सापडतील.
माझे दुसरे एक मित्र आहेत. पाच वर्षापूर्वी नोकरीसाठी एका नामांकित संस्थेकडे २५००००० रु.भरलेत.पण आजतागायत त्यांना एकही रु.पगार मिळाला नाही.आजही ते तिथे काम होईल या अपेक्षेने काम करत आहेत. याला जबाबदार शिक्षक, संस्थाचालक, सरकार, प्रशासन जिम्मेवार नाही का?

🔸आंदोलने…
या शिक्षकांनी स्वतः ला न्याय मिळवून देण्यासाठी अनेक आंदोलने केली आहेत.काही शिक्षकांनी स्वत:चे जीवन या लढ्यात कामी आणले आहे.आमरण उपोषण, भिकमांगो आंदोलन, विधानसभेवर मोर्चे, घेराव, घंटानाद अशा अनेक आंदोलनातुन आपला आवाज सरकार पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण जेंव्हा सरकरेच बहिरे होतात त्यांच्या पर्यंत आवाज तरी कसा पोहचणार?पण म्हणून हातावर हात ठेवून गप्प बसता येणार नाही. सरकारच्या कानठाळ्या बसेपर्यंत आवाज केला पाहिजे. तरच या शिक्षकांना न्याय भेटू शकेल.

🔹पर्याय..
या लॉकडाऊनच्या काळात घर चालवण्यासाठी अनेक शिक्षकांना रोजंदारीवर काम करावे लागत आहे. ते मग कोणी भाजी विकण्याचे, कोणी लोकांच्या शेतात शेतमजूर म्हणून तर कोणी मजुर म्हणून लागेल ते काम करत आहेत. पण यांच्या कडे कोणाचेच लक्ष जात नाही. सरकारचे लक्ष असले तरी ते जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. खुपच जर या शिक्षकांनी आवाज उठवला तर आश्वासन देउन त्यांना गप्प केले जात आहे.

शिक्षक हा शिक्षक असावा,तो अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनूदानित,२०%अनुदानित असता कामा नये. ज्या खांद्यावर राष्ट्र निर्माणाची जबाबदारी आहे तेच खांदे आर्थिक विंवचनेत गुरफटून जाऊ नयेत एवढीच अपेक्षा.
सरकारने या शिक्षकांना जलद न्याय द्यावा हीच अपेक्षा.

✒️लेखक:-सतिश यानभुरे सर
शिक्षक-जि.प.प्रा.शाळा जऊळके खु.खेड,पुणे
मो:-८६०५४५२२७२

▪️संकलन:;नवनाथ पौळ
केज तालुका प्रतिनिधी
मो:-8080942185