✒️नवनाथ आडे(गेवराई,तालुका प्रतिनिधी)मो:-9075913114

गेवराई(दि.9सप्टेंबर):-जायकवाडी धरणाचे 12 दरवाजे उघडून गोदावरी पात्रात 14 हजार 165 क्युसेस पाणी सोडण्यात आले आहे. नगर आणि नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु असून तेथील धरणे पूर्ण भरली आहेत. त्यामुळे जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरु झाली आहे. जायकवाडी प्रशासनाने सोमवारी रात्री धरणाचे 12 दरवाजे अर्धा फूट वर करुन 14 हजार 165 क्युसेस पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात केला आहे. गोदावरीत सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे गेवराई तालुक्यातील मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. गेवराई तालुक्यातील पांचाळेश्वर येथील दत्त मंदिर, श्री क्षेत्र राक्षसभुवन येथील शनी मंदिर यांना पाण्याचा वेढा पडला आहे.

पांचाळेश्वर येथील दत्त मंदिर पूर्ण पाण्याखाली गेले आहे. गेवराई तालुक्यातील गोदाकाठच्या 32 गावांना सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. तसेच गोदाकाठच्या ग्रामस्थांनी नदीपात्रात जाऊ नये, जनावरे बांधून ठेवावी, आपली काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. महसूल प्रशासन गावकऱ्यांच्या संपर्कात असून चिंता करण्यासारखी परिस्थिती नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

गोदाकाठच्या 32 गावातील नागरिकांच्या संपर्कात राहण्यासाठी गेवराई महसुलच्या वतीने व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला असून गावकऱ्यांना पूराबाबत किंवा इतर काही समस्या उदभवल्यास या ग्रुपवर मेसेज केल्यास लगेच महसूल पथक मदतीसाठी सज्ज असणार आहे. यासाठी तलाठी, मंडल अधिकारी आदी कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आल्याची माहिती प्रभारी तहसीलदार सुहास हजारे यांनी दिली.

पर्यावरण, महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED