लंपी स्किन आजाराच्या निर्मूलनासाठी उपाययोजना करा – राम पाटील बोरकर

26

✒️शेख आवेज(सेनगाव,विशेष प्रतिनिधी)मो:-8308862587

वाशिम(दि.9सप्टेंबर):-संपूर्ण राज्यातील थैमान घातलेल्या लंपी स्किन आजाराने वाशिम जिल्ह्यातील अनेक जनावरे बाधित झाले असून या आजारावर आळा घालण्यासाठी तालुकास्तरावर उपाय योजना करण्यात याव्यात अशी मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने पशुसंवर्धन तालुका अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. जनावरांच्या शरीरावर गाठ येणे, ताप येणे, चारा न खाणे, नाक व डोळ्यातून पाणी येणे यासारखी लक्षणे दिसून लंपी या विषाणूजन्य आजाराच्या मोठ्या प्रमाणात जनावरांना लागण झाली आहे.

त्यामुळे पशुपालक शेतकरी मोठ्या प्रमाणात भयभीत झाले आहे. तालुक्यातील प्रत्येक उपकेंद्रावर शिबिर घेऊन शेतकऱ्यांना उपाय व माहिती काय आहे याची जाणीव करून देण्यात यावी. या आजारावर प्रतिबंध कसलेली ‘गोट फॉक्स’ ही लस मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात यावी. तालुका स्तरावर तसेच उपकेंद्रावर नियुक्तीस असलेल्या पशुधन विकास अधिकारी, कर्मचारी यांना ग्राम स्तरावर सर्वे करून उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात याव्यात यासाठी निवेदन देण्यात आले.

यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राम पाटील बोरकर, शहर संघटक राहुल डांगे, तालुका अध्यक्ष मयूर हिवाळे, तालुका उपाध्यक्ष अजय बोडखे, अभिषेक देशमुख, ऋषिकेश देशमुख, उमेश राईटकर, रवी गाडे, समाधान गाडे, सचिन गाडे, गणेश माने, ज्ञानेश्वर कांबळे, अमोल डांगे, संतोष पाटील, शुभम कदम, सतीश पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी केंद्रे मॅडम यांनी लंपी स्किन या आजारा संदर्भात घाबरून न जाता लक्षणे दिसताच प्राथमिक उपचार करावेत व तीव्र लक्षणे असल्यास जवळच्या आरोग्य केंद्रात उपचार करून घ्यावे. आजारी असलेल्या जनावरांना इतर जनावरांपासून वेगळे ठेवण्यात यावे असे सांगितले.