

✒️नवनाथ आडे(गेवराई,तालुका प्रतिनिधी)मो:-9075913114
गेवराई(दि.10सप्टेंबर):- तालुक्यातील तलवाडा येथील एका शेतक-याच्या शेतात असलेल्या खदाणीत बुधवारी अनोळखी इसमाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आल्याने खळबळ उडाली असून उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. तलवाडा पोलिस ठाण्याचे सपोनि सुरेश उणवने, जमादार मारोती माने, पो.काॅ.वढकर यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली व मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी तलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला आहे.
मृत व्यक्तीचे अंदाजे वय ६० वर्षे इतके असून पोलिसांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. मृत इसमाला कुणीतरी जिवे मारून त्याचे हात-पाय दोरीने बांधून त्याला सदरील खदाणीत टाकले असावे अशी चर्चा ऐकावयास मिळत आहे. या इसमाच्या अंगात पांढरा शर्ट व धोतर नेसलेले असा पेहराव असून तो अंगाने जाडजूड असल्याचे दिसत आहे. हा इसम अनोळखी असून त्याच्या नातेवाईकांनी तलवाडा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन जमादार मारोती माने यांनी केले आहे.