नीट परीक्षेतील विद्यार्थी-पालकांच्या सोईसाठी 13 सप्टेंबर या एक दिवसासाठी ताळेबंदीमधून मुभा – जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर

15

✒️माधव शिंदे (नांदेड,जिल्हा प्रतिनिधी )मो:- 7757073260

नांदेड(दि.10सप्टेंबर):- प्रतिक्षेत असलेल्या नीट परीक्षा रविवार 13 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी 2 ते 5 या कालावधीत होत आहेत. विद्यार्थ्यांच्या सोईसाठी एकूण 62 केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येत आहे. विद्यार्थ्यांसह कोविड-19 सुरक्षिततेच्या कारणामुळे पालकही परीक्षा केंद्रांवर सोबत येण्याची शक्यता लक्षात घेऊन वेळेवर अत्यावश्यक ठरणाऱ्या उपहारगृह, ऑटोरिक्षा, जनरल स्टोअर्स व इतर अनुषंगिक व्यवहार सुरु ठेवण्यास जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी एक दिवसासाठी टाळेबंदीतून मुभा दिली आहे. तसेच आदेश आज दि. 9 सप्टेंबर 2020 रोजी निर्गमीत केले आहेत.

या आदेशातील नियमावलीसह 30 सप्टेंबर 2020 पर्यंत जिल्ह्यात नागरी, ग्रामीण व औद्यागिक क्षेत्रासाठी विविध अटी व शर्तीच्या अधिन राहून आस्थापना व दुकाने सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यत चालू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. ज्येष्ठ पत्रकार संजीव कुलकर्णी, सुनिल श्रीवास्त व भुवना बार्शिकर यांनी पालकांच्यावतीने 13 सप्टेंबर 2020 रोजी नीट (युजी) परीक्षेसाठी गैरसोय होऊ नये म्हणून उपहारगृह, ऑटोरिक्षा, जनरल स्टोअर्स, व इतर अनुषंगिक व्यवहार सुरळीत राहण्याबाबत जिल्हाधिकारी यांना विनंती केली होती. फौजदारी प्रक्रीया दंड संहिता 1973 नुसार अधिकाराचा वापर करुन जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी वस्तुस्थिती लक्षात घेऊन फौजदारी प्रक्रीया दंड संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्वये या आदेशाद्वारे संपुर्ण जिल्ह्यात नीट (युजी) 2020 ही परीक्षा 13 सप्टेंबर 2020 रोजी रविवारी या दिवशी असल्याने केवळ या एका रविवारसाठी ताळेबंदीमधून मुभा देण्यात आली आहे.

या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल.

या आदेशाची अंमलबजावनी करीत असताना सद्हेतुने केलेल्या कृत्यासाठी कुठल्याही अधिकारी व कर्मचारी यांचेवर विरुध्द कुठल्याही प्रकारची कायदेशिर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही. हे आदेश 9 सप्टेंबर 2020 रोजी माझे सही शिक्क्यानिशी निर्गमित करण्यात आली आहे.