🔺अंबाजोगाई येथुन आरोपीस अटक

🔺गुन्ह्यात वापरलेली पिस्टल (बंदूक) व एक जीवंत काडतूसही जप्त

✒️पाथरी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पाथरी(दि.10सप्टेंबर):- येथील गोळीबार प्रकरणातील आरोपीस पिस्टल (बंदूक) व एका जीवंत काडतुससह स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचार्‍यांनी अंबाजोगाई येथून ताब्यात घेतले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी दिली.

पाथरी येथील अजीज मोहल्ला भागात मंगळवारी रात्री ११:३० च्या सुमारास गाडी लावण्याच्या कारणावरून मोहमद बिन सईद बिन किलेब (रा. अजीज मोहल्ला, पाथरी) याने स्वतः जवळील रिव्हॉल्वरमधुन सालन बिन सालेबीन हवेल यास जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केला होता. गोंधळी व शिविगाळ करीत फिर्यादी सालन बिन सालेबीन हवेल यास धमकावत तेथून फरार झाला होता. गोळीबाराच्या या घटनेने मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी पाथरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनास्थळास जिल्हा पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अतिरीक्त पोलिस अधीक्षक रागसुधा आर, सहाय्यक पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांच्यासह पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी भेट देत घटनेची माहिती घेतली. पोलिस अधीक्षक श्री.उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीच्या शोधार्थ पथके रवाना करण्यात आली होती.
पोलिस अधीक्षक श्री. उपाध्याय, स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रवाना करण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी – कर्मचार्‍यांनी त्याचा शोध सुरू केला होता. अंबाजोगाई येथे असल्याची माहिती पथकास समजताच पथकाने तेथे जाऊन त्यास मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याजवळून गुन्ह्यात वापरलेली पिस्टल (बंदूक) व एक जीवंत काडतूसही जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्री. मोरे यांनी दिली.

दरम्यान, घटना घडल्यापासून अवघ्या 24 तासात आरोपीस ताब्यात घेत स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी पाथरी पोलिसांच्या स्वाधीन केले.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक शरद विपट, कर्मचारी सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, मधुकर चट्टे, शंकर गायकवाड, जमीर फारोकी, परमेश्वर शिंदे, दिलावर पठाण, शेख अजहर, संजय घुगे,अरुण कांबळे आदींनी केली.

Breaking News, क्राईम खबर , महाराष्ट्र

©️ALL RIGHT RESERVED