पाचवीच्या वर्गासाठी सिरसदेवी ग्रामस्थांनी मुख्याध्यापकाच्या कॅबिनला ठोकले टाळे

24

✒️नवनाथ आडे(गेवराई,तालुका प्रतिनिधी)मो:-9075913114

गेवराई(दि.12सप्टेंबर):-तालुक्यातील सिरसदेवी हे बाजार पेठेचे मोठे गाव असून लोकसंख्याही मोठी आहे. मात्र गावात शाळा चौथीपर्यंतच असल्याने पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना बाहेर खासगी शाळेत जावे लागते. त्यामुळे गावातच पाचवीचा वर्ग सुरू करावा, ही मागणी गावकर्‍यांनी अनेक वेळा केली. या मागणीकडे कोणी लक्ष न दिल्याने आज गावकर्‍यांनी मुख्याध्यापकाच्या कॅबिनलाच टाळे ठोकत पाचवीचा वर्ग सुरू करण्याची मागणी केली.

तालुक्यातील सिरसदेवी येथे चौथीपर्यंत जिल्हा परिषदेची शाला आहे. त्यानंतर पुढचे शिक्षण घेण्यासाठी लहान-लहान मुलांना बाहेरगावी व सिरसदेवी फाटा येथील खासगी शाळेत जावे लागते. त्यामुळे गावातच जिल्हा परिषदेने पाचवीच्या वर्गाला मान्यता देऊन वर्ग सुरू करावा, अशी मागणी सिरसदेवी येथील ग्रामस्थांनी वेळोवेळी केली आहे मात्र या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने आज गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन सिरसदेवी येथे पाचवीच्या वर्गाला मान्यता देऊन तो याच शैक्षणिक वर्षात सुरू करावा, अशी मागणी केली.

जोपर्यंत गावात जिल्हा परिषदेचा पाचवीचा वर्ग सुरू होत नाही तोपर्यंत शाळेला ठोकलेले कुलूप उघडणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. या निवेदनावर गणेश कन्हेकर, अंकुश यादव, सिद्धेश्‍वर काळे, राजेंद्र रुचके, उमेश ढवारे, राहूल शिंदे, दामोधर मोरे, ऍड. बी.एन.सातपुते, प्रभाकर भोंगे, शंकर शिंदे, शंकर रुचके, मतीन शेख यांच्यासह गावकर्‍यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.