कोरोना लढ्यात शिक्षकाची भुमिका

25

कोरोना महामारिचं आरिष्ट जगावर कोसळलं आणि एरवी वाऱ्यावर स्वार होणाऱ्या जगाला अचानक थांबावंच लागलं; नाहीतर या कोविड १९ या न दिसणाऱ्या विषाणूंने जगाच्या पायात बेड्या टाकल्या.जगाल स्तब्ध केलं.असहाय,भेकड,दरिद्री, बनवण्याचं काम या विषाणुने केलं आहे. तसं पाहिलं तर आपल्याकडे बऱ्याच उशीरा याने आगमन केलं आहे. तिकडे चिनमध्ये धुमाकूळ घालून झाल्यास हा विषाणू जगाच्या सफरीवर निघाला आहे. ते पण मोठ्या अहंकारात.तो मानवजातीलाच आव्हान देतो आहे. रोखा मला कसे रोखता?म्हणून छातीठोकपणे तो वावरतोय आणि आपण कर्मदरिद्री त्याचे आव्हान आतापर्यंत पेलू शकलो नाही हेच जगाच्या पुढचे सत्य आहे.

आपल्या देशात जेंव्हा कोरोना महामारीने आगंतुकपणे प्रवेश केला होता त्या वेळेस खरंतर या आजाराबद्दल कोणालाच काही माहित नव्हते, फक्त एवढेच माहित ते पण अर्धवट ज्ञान आणि फुटकळ channel वरील अतातायी बातम्या मुळे की कोरोना हा भयंकर आजार आहे आणि तो चिन मधून आलाय, चिन ने पाठवला आहे , ते नको त्या जनावरांचे मांस खातात म्हणून हा आजार होतो एवढेच आपले ज्ञान. त्यामुळे आपण चिनच्या नावाने शिमगा पण केला होता. पण त्यामुळे चिन्यांना तर काही झाले नाही उलट त्या कोरोनानेच आपल्या देशात तोपर्यंत हातपाय पसरायला सुरुवात केली होती.

त्यानंतर मा.पंतप्रधान आणि मा.मुख्यमंत्र्यांनी देशात आणि राज्यात अनुक्रमे लॉकडाऊन जाहीर केला.आपल्या पंतप्रधानांनी तर या कोरोनाच्या महामारीत देश एकसंध होऊन याच्याशी लढा देत आहे हे दर्शवण्यासाठी दिवे लावण्याचा,कोरोना महामारीत लढा देणाऱ्या विषयी कृतज्ञता म्हणून थाळ्या वाजवणे असे उपक्रम हाती घेतले.देशवासियांनी पण मोठ्या उत्साहाने त्यांना प्रतिसाद दिला होता.

काही लोक विस्थापित झाले, काही पायीच स्थलांतर करू लागले .काही जाग्यावरच अडकून पडले.मग यांच्या खाण्यापिण्याची सोबत य कशी करायची अशी प्रशासनासमोर मोठा अवघड प्रश्न होता. प्रशासन आणि स्वंयसेवी संस्था युद्धपातळीवर लढत होत्या.रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत.एकावरुन शंभर ,शंभरी वरुन हजार, हजाराचे दहाहजार,मग पन्नास हजार, आणि आता ऐंशी हजार आणि आता साडेतीन लाखाच्या आसपास काही दिवसातच चार पाच लाखाच्या घरात रुग्णांची संख्या जाईल हे सांगायला कोणत्या ज्योतिषाची गरज पडणार नाही.आपणच नियम मोडणार,लॉकडाऊनचे तिनतेरा वाजवणार आणि आकडे एवढे कसे वाढत आहेत म्हणून छाती बडवून घेण्याचा निर्लज्ज प्रकार सर्रासपणे चालू आहे.आपलं नशीब सध्या तरी एवढ्याच साठी बलवान म्हणावे लागेल, जगाच्या तुलनेत मृत्यूचा दर कमी आहे. या एकाच कारणाने बेडकासारखे फुगण्याचे काहिही कारण नाही.भ्रमाचा भोपळा फुटायला असा किती वेळ लागतो?

या लढ्यात शिक्षक कुठे?

खरंतर आमच्या शिक्षकांची जमातच अशी असते की,कुठलेही काम असु दे करायला मागेपुढे करणार नाही. जनगणना असो,निवडणूक असो,कुठला सर्वे असो जी जबाबदारी अंगावर पडली ती तडीस नेणारच.मग कोरोनाच्या संकटात तर एक शिक्षक म्हणून आम्ही कसे मागे राहू?प्रशासनाने जी जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करत आहोत.आमच्यातही काही अपवाद असतात.काही असतात कामचुकार, पण त्यांच्याकडे दुर्लक्षच केलेले बरे.

राशन वाटप..
सर्वात प्रथम शाळेच्या परीसरात लोकांना राशनच्या अडचणी येवू नयेत ,त्यांना शासन नियमानुसार धान्य मिळावे म्हणून प्रशासनाच्या आदेशानुसार धान्य नोंदी ठेवणे, देखरेख ठेवणे तसेच शाळेतील मुलांच्या पालकांना शाळेतील तांदूळ वाटपाचे काम या शिक्षकांनीच केले.

गावातील सर्वेक्षण
त्यानंतर गावातील लोकांना कोरोनाची काही लक्षणे आहेत का हे पाहण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार सर्वेक्षणाचे काम केले.ज्यामध्ये प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांना सर्दी, खोकला,ताप,इतर गंभीर आजार इत्यादी सारखे लक्षणे कोणात आढळतात का?गावाबाहेरुन कोणी गावात आले आहे का ? ते बाधित आहेत का?त्यांनी होम क्वारंटाईन चा कालावधी पुर्ण केले आहे का?इत्यादी बाबतीत घरोघर जाऊन सर्वेक्षणाचे काम शिक्षकांनीच केले.

जिथे एखादा कोरोना रुग्ण सापडला,अथवा कोरोना संशयित सापडला तरी कित्येकांची गाळण उडते. तिकडे कोणी फिरकायला तयार होत नाही अशा प्रशासनाने घोषित केलेल्या निषिद्ध परिसरात (रेडझोन,कंटेंनमेंन्ट एरियात) पंधरा पंधरा दिवस सर्वेक्षणाचे काम शिक्षकांनी केले आहे. त्यामध्ये प्रत्येकाच्या घरी जाणे,त्यांच्या नोंदी घेणे त्यांचे सतत पंधरा दिवस निरीक्षण करणे, काही कुठे संशयास्पद रुग्ण ,संशयित आढळले तर आरोग्य विभागास कळवण्याचे काम शिक्षकांनी केले आहे. स्वतः चा जीव धोक्यात घालून जोखमीचे काम करण्यात या कोरोनासारख्या महामारीत शिक्षक कुठेच कमी पडले नाहीत.

चेक पोस्ट वर रात्रीच्या वेळी,दिवसभर अत्यंत जोखमीची जबाबदारी अत्यंत निष्ठेने पार पाडणारा शिक्षक या लढ्यात इतर कोरोनोयोद्ध्यांइतकाच लढाऊ सैनिक आहे. त्याचे मोल इतरांपेक्षा थोडेही कमी नाही.

काही शिक्षकांनी ही जबाबदारी पार पाडताना स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिले आहे.यामध्ये बिडमधील शिरूर तालुक्यात चेकपोस्ट वरील आपली ड्यूटी संपवून घरी जाणारे प्रशांत कुलकर्णी सर, सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात नानोसो कोरे सर यांना तर स्वतःच्या प्राणास मुकावे लागले.एवढेच नाही तर दिल्ली सारख्या राजधानीचे शहर असलेल्या राज्यात एका शिक्षीकेला राशन धान्य वितरणाच्या नोंदी करताना कोरोनाची बाधा होऊन तिला तिच्या पतीसह मृत्युमुखी पडावे लागले होते.स्वतःच्या प्राणांचं मोल चुकवून या शिक्षक कोरोना योद्ध्यांनी आपली जबाबदारी पार पाडण्यात कसलीच कसर ठेवली नाही.

कोविड सेंटरवर कामे..
बऱ्याच शिक्षकांनी कोविड सेंटर वर आपला जीव धोक्यात घालून काम केले आहे आणि आजही काही जण ते काम करत आहेत.

गावजागर…
कोरोनाचे सर्वेक्षण करताना गावातील लोकांना सुरक्षित कसे रहावे? मास्क वापरलाच पाहिजे. या संकटात मूलांना घरीच अभ्यासाचे धडे दिले पाहिजेत. याचा जागर शिक्षकांनी घातला आहे.
आता जेंव्हा शाळा सुरु होतील तेंव्हा कोरोना अथवा इतर कुठल्याही संकटांना तोंड कसे द्यावे याचे धडे जीवन शिक्षण देताना नक्कीच शिक्षक देतील.

शिक्षकांच्या या कोरोना लढ्यातील योगदानाकडे समाजाचं लक्ष असावं.एवढीच माफक अपेक्षा.

✒️लेखक:-सतीश यानभुरे सर
शिक्षक,खेड तालुका,
जिल्हा पुणे
मो:-86054 52272

▪️संकलन:-नवनाथ पौळ
केज तालुका प्रतिनिधी
मो:-8080942185