पालकत्व

32

मुलांचे संगोपन जेवढे मनोरंजक व आनंददायी आहे त्याहून अधिक ते आव्हानानी भरलेले आहे.एकवेळ आईबाबा होणं सोप पण मुलांचे पालक होणं अधिक अवघड आणि आव्हानात्मक आहे. उत्तम पालक होण्याचे कुठलेही विशिष्ट नियम अथवा पध्दती नाहीत त्यामुळे प्रत्येक पालक आणि त्यांचे मुलं हे एक स्वतंत्र आणि वैशिष्टयपूर्ण व्यक्तीमत्व आहे.

नव्याने पालकत्व अनुभवणाऱ्या,माझ्या सारख्याच,नुकतेच आई बाबा झालेल्या पालकांसाठी माझा हा विशेष लेख

मुलांचे संगोपन हा एक सखोल विषय,त्यांच्या जन्मापासून ते आयुष्यभराच्या एकंदरीत प्रवासात पालकांचा मोलाचा वाटा असतो, त्यांच्या सर्वांगीण विकास व जडणघडणी दरम्यान ,आपणही नावीन्यपूर्ण गोष्टींचा अनुभव घेत असतो,ते क्षण जगत असतो, बऱ्याचदा त्या अनुभवातून कळत नकळतपणे शिकतही असतो.

ऑफिस मध्ये आयोजित केलेल्या पेरेंटिंग अर्थात पालकत्व या विषयावरील सदराचा भाग होण्याचा परवा योग आला,आणी आवर्जून या विषयवार लिहावे अशी इच्छा मनात निर्माण झाली.

संवाद/अनुभव/शब्दसाठा

सदराच्या सुरुवातीला दोन पालकांना समोर बोलावून एक खेळ खेळण्यास सांगण्यात आला,दोघांना एकमेकांच्या विरुद्ध दिशेला तोंड करून बसविण्यात आले,दोन्ही पालकांना काही ठोकळे देण्यात आले,त्यातील एका जोडीदारासमोर विशिष्ठ पद्धतीने ठोकळ्याची मांडणी करुण एक आराखडा ठेवण्यात आला,व ती मांडणी फक्त संवादाच्या स्वरूपात त्याने दुसऱ्याला सांगायची,व त्याने दिलेल्या सूचने नुसार दुसऱ्या व्यक्तीने ती मांडणी करायचा प्रयत्न करायचा,असे खेळाचे नियम.

खेळ पूर्ण करण्याकरिता पाच मिनिटांचा अवधी देण्यात आला.

अशा प्रत्येकी दोन जोड्यांनी तो खेळ प्रत्यक्षपणे खेळला,पहिल्या जोडी पेक्षा दुसऱ्या जोडीतील स्पर्धकांनी ठोकळ्याची ती जडण घडण अधिक सुयोग्य प्रकारे करण्याचा प्रयत्न केला.

त्याची कारणमीमांसा खालील प्रमाणे करता येईल

पहिल्या जोडीपेक्षा दुसऱ्या जोडितील स्पर्धकांचे संवाद हे अधिक सुयोग्य,मोजके,आणी अर्थपूर्ण ठरणारे होते.

पहिल्या जोडीच्या अनुभवावरून आपण कोणत्या चुका टाळायच्या आहेत,व आपल्या संवादाला कोणती दिशा दाखवायची आहे याचा अनुभव/अंदाज दुसऱ्या जोडीला आधीच आलेला होता, आणी त्या आधारे दुसऱ्या जोडीने खेळा आधीच वेळेचे व्यवस्थित नियोजन करून मग तो खेळ खेळला.

मग मी थोडा विचार केला,हाच खेळ मी माझ्या जोडीदारासोबत खेळायचा झाला, तर कोणते प्रयत्न केल्यावर माझा आराखडा पूर्ण होईल,तर त्याची उत्तरे अशी आहेत.

*संवाद – मला माझ्या जोडीदाराला समजेल अशा भाषेत संवाद साधता आला,तर माझे म्हणणे त्याच्या लवकर लक्षात येईल

*आखणी – खेळ सुरू करण्या आधी, ठोकळ्यांचे आकार,रंग,यांचे काही ठोकताळे बांधण्यात आले तर मी सांगितलेल्या सूचनांप्रमाणे आराखडा तयार करणे जोडीदाराला अधिक सोपे होईल.

*वेळेचे नियोजन – खेळ मला मिळालेल्या वेळेच्या आत यशस्वी रित्या पूर्ण करण्यासाठी मी योग्य,मोजका व अर्थबद्ध संवाद करणे अत्यंत आवश्यक आहे

अर्थात हे मुद्दे फक्त खेळा पुरते मर्यादित न राहता,माझ्या वयक्तिक आयुष्यातही मला मार्ग दाखवणारे आहेत.

मुलांसोबत योग्य संवाद ठेवणे आवश्यक आहे,शिवाय काही गोष्टी त्यांना अनुभवाने ही शिकणे भाग पडते,सर्व गोष्टी न मागता आयत्या मिळत गेल्या,तर त्यांच्या आवश्यक व नेमक्या गरजा आपल्याला कळणार नाहीत, आणी त्या पूर्णत्वाकडे नेण्यासाठी आपण केलेल्या प्रयत्नांची/धडपडीची जाणही त्यांना होणार नाही.

शिवाय आपले मत,सल्ला,अनुभव हा त्याला किंवा तिला समजेल अशा भाषेत सांगणे अनिवार्य आहे,अन्यथा तो सांगण्याचा काहीही उपयोग होणार नाही.

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्या जवळ असलेला कमी वेळ आपण क्वालिटी टाइम म्हणून कसा उपयोगात आणतो ह्यावर पालकत्वाची कौशल्ये अवलंबून आहेत.

✒️लेखिका-रेणुका व्यास
                 पुणे

▪️संकलन:-प्रा.रावसाहेब राशिनकर(साहेब)
(अहमदनगर विशेष प्रतिनिधी)
      मो:-9404322931