गुंता नात्यांचा

  41

  आयुष्यात अनेक प्रसंग येतात,निरनिराळ्या स्वभावाच्या व्यक्तींशी निरनिराळ्या प्रसंगी संपर्क येतो,काही थोड्याशाच कालावधीत मनावर अधिराज्य गाजवतात, काही मनाचा अत्यंत हळुवार कोपरा होतात,तर काही अनंत काळाच्या सहवासानंतरही खूप विश्वासघातकी/व्यवहारी स्वभावाची निघतात.

  कितीही आरडा ओरड करून,साम/दाम/दंड/भेद कुठल्याही मार्गाने समजावून ही आपलीच मनमानी करतात,आणि मग कालांतराने अशा व्यक्ती आपल्या मनापासून/हृदयापासून फार दूर अंतरावर निघून जातात.आणि मग राहतात ती फक्त नाती,नशिबाने जोडलेली,फक्त नावापुरती,मायेचा लवलेशही नसलेली.

  काही दिवसांपूर्वी भावाच्या मुलाच्या मुंजीत एक बालमैत्रीण भेटली, फार अस्वस्थ दिसत होती,बऱ्याच काळानंतर भेटली म्हणून कशी आहेस वगैरे औपचारिक विचारपूस झाली,आणि मग तिने बोलायला सुरुवात केली.

  घरातील लोक एखादी चांगली गोष्ट/सल्ला सांगितला तर मुळी ऐकतच नाहीत,
  सर्व नातेवाईकांना वाटते मीच त्यांना सुधरवण्यास असमर्थ आहे,ते चूक आहेत हे सर्वांना दिसतं, पण त्यांना सुधरवण्याची संधीच मीच मुळी देत नाही असं सगळ्यांना वाटत,मी खूप प्रयत्न केले,काहीच फरक पडला नाही.

  काहीही करा तो सुधारतच नाही,एखादे काम त्याने करावे त्याला करायला भाग पाडावे म्हणून मुद्दाम करायचे ठेवले कि ते माहिनों महिने तसेच पडून राहते,सांग ना रेणुका हि मुलं लग्नच का करतात मुळी, घरात आई वडील संभाळायला बायको आणण्यासाठी,कि मज्जा म्हणून,ना घरातल्या कामाची जबाबदारी ना मुलांची,न त्यांच्या अभ्यासाची.
  त्यातून ऑफिस च्या कामाचे टेन्शन,एकटी बाई मी काय काय करणार.

  मुंजीच्या कार्यक्रमाला मी आई वडिलांसोबत गेले होते म्हणून तिला फारसं बोलता नाही आलं,तिचे डोळे त्या पाचच मिनिटात तिची कर्मकाहाणी स्पस्ट पणे सांगून गेले,आणि उरलेले शब्द अश्रुत अस्पस्ट झाले.

  घाईघाईत तिचा नंबर घेतला आणि काळजी करू नको सगळे ठीक होईल अशे शब्दांचे औपचारिक औषध तिला पाजून तशीच लातूरला परत निघाले,एक दिवस सवडीने तिला फोन लावला,तिचं सगळं बोलणं व्यवस्थित ऐकून घेतलं,म्हटलं एखाद्या व्यक्तीला सुधारणे हे कायम आपल्या हातात नसते,सुधारण्याची ती वृत्ती त्या व्यक्तीत उपजत असायला हवी,प्रेमाने जग जिंकता येत वगैरे झाली पुस्तकी वाक्य काहींना लागू पडत असतीलही पण सगळ्यांना मुळीच नाही पडत.

  तू विचारांनी मजबूत राहा,असे समज तू एकटीच कुटुंबाचा कणा आहेस,तुझ्यासोबत तो भार उचलायला कुणीच नाही,जेवढे प्रयत्न तुला तुझ्या बाजूने करायचे होते केलेस,आता अपेक्षा ठेवू नकोस,तू एकटीच राहतेस,सर्व तुला एकटीलाच करायचेय असे मनाशी ठाम कर,अपेक्षा नसली कि अपेक्षाभंगाचे दुःख हि होत नाही,तू एकटी तुझ्या जीवनाला आकार द्यायला पुरेशी आहेस,माझा आयुष्य जगण्याचा एकदम सोपा फंडा आहे,जशास तसे,जो मायेने वागतो त्याच्याशी मायेने, व्यवहाराने वागतो त्याच्याशी व्यवहाराने,द्वेषाने वागतो त्याच्याशी द्वेषाने वागायचे. आदर द्या आदर घ्या.

  जे बोलायचे कृतीतूनच,तोंडाने बोलून आपले शब्द आणि ऊर्जा वाया कशाला घालायची,त्याला स्वतःमध्ये बदल करायचेच नसतील तर तू काहीही कितीही केलेस तरी तो त्याच्या मूळ स्वभावानुसारच वागणार. म्हणून म्हणते असेही तुला एखादे काम शेवटी करायचेच असेल तर तेच सुरुवातीलाच आनंदाने कर.

  फारसा माझा सल्ला न पटूनही बघू असं म्हणत तिने फोन ठेवला,ती थेट दोन महिन्यांच्या अंतरावर भेटली,चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आत्मविश्वास,आणी एक प्रभावी व्यक्तिमत्व,तिला भेटून मला जो आनंद झाला तो अवर्णनीय आहे.

  असच असतं नाही का नात्यांचं,नाती अन मतभेद दोघे एकमेकांच्या हातात हात घालूनच चालतात कायम,कधी ती इगो मुळे तुटतात तर कधी ती न व्यक्त केलेल्या प्रेमामुळे,ती जपायची म्हटलं की अहम भाव सोडायलाच हवा,कधी कधी क्षमा करणे हा एक उत्तम पर्याय होतो,पण वारंवार क्षमा करूनही चुकांची पुनरावृत्ती होत असल्यास जाणीव करून देणे हा एकच मार्ग उरतो.
  आणि तो ही नसेल तर निरपेक्ष वृत्तीने एकट्याने मार्गक्रमण करणे हा एकच शेवटचा मार्ग.

  कधी कधी सहवासाने माणूस पूर्णपणे सकारात्मक रित्या बदलतो,तर कधीकधी तोच माणूस समोरच्याला, त्याच्या चांगुलपणाला गृहीत धरू लागतो.

  जो बदलला आहे त्याचं आदर कौतुक करा,आणी जो अधिकच गृहीत धरू लागलाय त्याच्याकडून कसलीच अपेक्षा न करता स्वतंत्रपणे निर्णय घ्या,काय माहित आपल्यातला हा सकारात्मक बदल,स्वावलंबी वृत्ती आणी कठोर निर्णय क्षमता पाहून अपराधी भावनेने का होईना तो पुन्हा आपल्या जवळ येईल.

  ✒️लेखिका:-रेणुका व्यास,पुणे

  ▪️संकलन:-अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620