चार्‍याचा ट्रक पोहचला पूरग्रस्तांच्या मदतीला

40

🔹ट्रंक कॉल द वाईल्ड लाईफ संस्थेचा उपक्रम

✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.16सप्टेंबर):- गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्याने वैनगंगेची पातळी वाढून चंद्रपूर जिल्ह्यात आलेल्या प्रचंड पुरामुळे जनावरांच्या चार्‍याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. येथील चारा प्रश्‍नाची गंभीरता ठाणे येथील मुक्या जनावराप्रती सहानुभूती ठेवणार्‍या ट्रंक कॉल द वाईल्ड लाईफ फाऊंडेशन संस्थेचे आनंद शिंदे यांच्यापर्यंत पोहचताच ते चार्‍याने भरलेला ट्रक घेऊन ब्रम्हपुरीकडे रवाना झाले. हा ट्रक शनिवार, 12 सप्टेंबर रोजी ब्रम्हपुरी येथे पोहचला. हत्ती अभ्यासक, एलीफंट व्हीसपरर, राष्ट्रीय पारितोषिक विजेते, छायाचित्र पत्रकार आनंद शिंदे यांच्या “ट्रंक कॉल द वाईल्ड लाईफ फाऊंडेशनचे” कार्य करतात.

या संस्थेने यापूर्वीसुध्दा नैसर्गिक आपत्तीत जमेल तशी मदत केली आहे. 2018 चा केरळचा पूर असो, 2019 चा कोल्हापूर-सोलापूर भागातील पूर असो, प्रत्येक वेळी ही संस्था मदतीसाठी धावून आली आहे. गोसेखुर्दच्या पाण्यामुळे वैनगंगा नदीला आलेल्या महापूराचे वृत्त सर्वदूर पोहचले. त्यामुळे या भागात जनावरांच्या चाराचा प्रश्‍न गंभीररुप धारण करणार असल्याचे लक्षात येताच या संस्थेने, ब्रम्हपुरी येथील तहसीलदार विजय पवार यांच्याशी संपर्क साधला. लवकरात लवकर चारा भरलेला ट्रक येथे पोहचावायला , यासाठी ही संस्था प्रयत्नशील होती. शनिवारी हा ट्रक ब्रम्हपुरी येथे पोहचला. 

आणि पूरग्रस्त गावांना ताबडतोब चारा पोहचवण्याच काम “ट्रंक कॉल द वाईल्ड लाईफ फाऊंडेशन” करीत आहे.