ऑनलाईन शिक्षणाचा लागला लळा

28

दिवाळीत केल्या जाणाऱ्या दिव्यांच्या रोषणाईने जशी घर उजळतात, तशी शाळा उजळते ते विद्यार्थी रुपी पणतीने.दिवाळीच्या सुट्टीचा मनसोक्त आनंद लुटून विद्यार्थी शाळेत येतात,ते नव्या जिद्दीने ,प्रगतीच्या नव्या आकांक्षेने आणि विविध उपक्रमाच्या अपेक्षेने.शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांसाठी उपक्रमाची जणू मेजवानीच ठेवलेली असते.क्रीडास्पर्धा,वनभोजन,बालआनंद मेळावा,सांस्कृतिक कार्यक्रम,यासारख्या उपक्रमात सहभाग घेऊन विद्यार्थी आपल्या कलागुणांची झलक दाखवतात.हे सर्व उपक्रम पार पाडत असताना यामध्ये महत्वाचा दुवा असतो पालक. नवीन शाळेत बदली होऊन सहाच महिने झाले होते पण या सहा महिन्याच्या कालावधीत शाळेत घेतल्या गेलेल्या विविध उपक्रमामुळे,मुख्याध्यापक,सहकारी शिक्षक,शाळा व्यवस्थापन समिती यांच्या सहकार्यामुळे पालक व विद्यार्थी यांच्याशी चांगलाच स्नेहबंध जुळला.महिला दिनानिमित्तशाळेत घेतलेल्या विविध उपक्रमात सात वाडीतील सर्व महिलांनी कोणताही जातीभेद न करता फक्त ‘माणूस’ या नात्याने सहभाग घेतला.

सर्व जातीधर्माच्या महिलांना एकत्र आणण्याचा हा माझा प्रयत्न,या प्रयत्नाला यश आले.शाळा व्यवस्थापन समितीकडून विशेष कौतुकही झालं.पालकांकडून मिळालेला हा प्रतिसाद पुढील प्रगतीसाठी,वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरणार अशी आशा मनात पल्लवित झाली.वसंत ऋतूत जशी झाडांना नवी पालवी फुटते,अगदी तशी.पण ………..
मार्च महिना सुरु झाला.वाडीवाडीत फिरणारी पालखी,खेळे करणारे किंवा गोमुचा नाच करणारी मुलं यांच्या उत्साहावर पाणी पडलं ते ‘कोरोना’ नावाच्या संकटांनी ‘‘कोरोना’ नावाचं नवीन सोंग आलं होतं. पण हे सोंग वाडीपुरतंच नव्हतं तर या सोंगात अख्खं विश्वच व्यापलं होतं. ‘नवीन बाईखूप छान शिकवतात’ असं म्हणत रोज शाळेत येणारे विद्यार्थी ‘कोरोनाच्या’ लक्ष्मणरेषेमुळे उंबऱ्याच्या बाहेर पडत नव्हते.शिक्षणाचे सगळेच मार्ग बंद झाले कि काय? अशी भीती सगळ्यांनाच वाटू लागली. लॉकडाऊननंतर शाळेला कुलूप लागलं. ना शाळा, ना अभ्यास, ना परीक्षा असाच प्रसंग सगळ्यांसमोर उभा ठाकला. करायचं तरी काय? एका बाजूला कोरोनाची भीती आणि दुसऱ्या बाजूला शाळा बंद झाल्याची! आम्हां शिक्षकांचादेखील नाईलाज झाला. शिक्षकांच्या बुद्धीला न पटणारी गोष्ट. त्यातूनच सतत काही पालकांचे फोन यायचे. ‘बाई, शाळा कधी सुरु होणार? मुलं घरी अजिबात अभ्यास करत नाहीत.’ हा तक्रारीचा सूर सारखाच कानावर पडू लागला. मलादेखील खंत वाटत होती. कधी कधी तर पालक वैतागून फोन लावायचे, ‘बाई, तुम्हीच मुलांना समजवून सांगा.’ मुलांशी बोलून मी अभ्यास करण्याबद्दल प्रोत्साहन द्यायचे. पण हे असं किती दिवस चालणार? फोनवरून ‘अभ्यास करा’ असं सांगून मुलं अभ्यास करतील? हा शंकेचा भुंगा सतत गुणगुणत होता. कोरोना मुलांच्या अभ्यासात गतीरोधकच काम करतोय हे लक्षात येत होतं.
आपण आताच कुठे बदली होऊन नवीन शाळेत आलोय, आपण जर या परीस्थितीत काहीच करू शकलो नाही तर कदाचित पालक, विद्यार्थी नाराज होतील कि काय? अशी भीती मनात निर्माण झाली.

विद्यार्थ्यांना शिक्षण तर द्यायचं होतं, पण परिस्थितीमुळे त्यांचापर्यंत पोहोचता येत नव्हतं. फोनवरून संवाद साधून अभ्यास कसा करायचा, काय करायचं या बाबत मार्गदर्शन चालू होतं. एप्रिल, मे दोन महिन्यात पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त चित्रकला,पाढेपाठांतर,निसर्गातील वनस्पती ची यादी करणे असे उपक्रम घेतले.सुट्टीच्या काळातील वेळेचा असा सदुपयोग केला. जूनमध्ये विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप केली. पुस्तके नेण्यासाठी सर्व पालक उपस्थित होते. तिथेही पुन्हा तीच चर्चा, ‘पुस्तकं मिळाली पण शाळा कधी सुरु होणार?’ आम्ही पुन्हा निरुत्तर. पालकांच्या मनातील शाळेविषयीची ओढ, कोरोना काळातील शिक्षणाची गरज या गोष्टी लक्षात घेऊन काहीही करून मुलांनाशिक्षण द्यायचंच ही खुणगाठ मनाशी बांधली.
ग्रामीण भाग असूनदेखील बऱ्याच पालकांकडे स्मार्टफोन आहेत याची खात्री केली पण ज्यांच्याकडे फोन नसेल त्यांच काय? ‘सर्वाना समान शिक्षण’,हाच उद्देश डोळ्यापुढे ठेऊन काम करायचं होतं. रेशन दुकानावर ड्युटीच्या निमित्ताने जाण्याचा योग आला. योगायोगाने काही पालकांची भेट झाली. ‘इच्छा असेल तर मार्ग सापडतो’ असंच काहीसं झाल होतं. त्यांच्याशी संवाद साधल्यावर असे लक्षात आले कि महाविद्यालयात शिकणारी भावंडं, मुंबईतून आलेले नातलग, लॉकडाऊनमुळे घरीच असल्याने त्यांच्या फोनचा ऑनलाईन शिक्षणासाठी नक्कीच उपयोग होईल, ही बाब खूपच महत्वाची ठरली.

माझ्याकडे असणाऱ्या इयत्ता दुसरी,पाचवी या नवीन वर्गाचे ग्रुप तयार केले. या ग्रुप वर दररोज गणित,मराठी,इंग्रजी व इतर विषयांचा अभ्यास दिला जातो.कधी कधी एखादी लिंक पाठवली जाते.पालक व स्वयंसेवक यांच्या मदतीने विद्यार्थी अभ्यास पूर्ण करत आहेत.
‘तारे जमिनीवर देखील आहेत ते शोधता आले पाहिजेत’,असेच तारे आम्ही शोधले.पेणेवाडी,तेलीवाडी,मधलीवाडी,गावकारवाडी या वाडीतून हेमलता रामचंद्र इंगळे,सिद्धेश श्रीकृष्ण इंगळे,अजय विजय इंगळे असे तारे आहेत जे आमच्या मुलांना ज्ञानाचा प्रकाश देत आहेत.शिक्षकदूत बनून तारेरूपी स्वयंसेवक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचले आहेत. ग्रुपवर नियमितपणे पाठ्यपुस्तकावरआधारित अभ्यास पाठवला जातो.तो अभ्यास कोणत्याही मोबदल्याशिवाय हे स्वयंसेवक पूर्ण करून घेत आहेत.युटूब वर शैक्षणिक विडीओ,कविता दाखवत आहेत .शिक्षकांकडून अभ्यास तपासून मार्गदर्शनकेले जाते.स्वयंसेवक आजच्या परिस्थितीत शिक्षकाची भूमिका पार पाडत आहेत.टाळे बंदीच्या काळात शाळा बंद असलीतरी या स्वयंसेवकांनी आपल्या घराची दारे आमच्या चिमुकल्यांसाठी खुली केली आहेत.आम्हांशिक्षकांसाठी ही नक्कीच अभिमानाची बाब आहे.टाळेबंदिचे सर्व नियम पाळून आमचे स्वयंसेवक ज्ञानदानाच काम करत आहेत आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचे ऋण फेडण्याची संधी मिळाली आहे अशी भावना मनात ठेऊन निरपेक्ष भावनेने शैक्षणिक कार्य करत आहेत.पालकसुद्धा खूप छान सहकार्य करत आहेत,त्यामुळे आम्ही ऑनलाईन शिक्षणाच्या उद्दिष्टपर्यंत पोचू शकलो.आमच्या मुलांना तंत्रज्ञानात साक्षर करू शकलो.

समुद्र खवळला की समजावं
जहाजाचं काही खर नाही ,
पण वादळ लाटांना घाबरून
माघार घेणंही बर नाही’

कोरोनासारख्या संकटाला न घाबरता मोबाईलरुपी पणतीने आम्ही ऑनलाईनशिक्षणाचा प्रकाश विद्यार्थ्यांच्या घराघरात पोचण्यात यशस्वी ठरलो आहोत.

शाळा सुरु होईल तेंव्हा विद्यार्थी प्रत्यक्ष भेटतील, तो आनंद काही वेगळाच असेल पण आताच्या कोरोनाच्या परिस्थितीत विद्यार्थी आणि शिक्षक फोन,मेसेज याद्वारे एकमेकांच्या संपर्कात आहेत.प्रत्यक्ष भेट होत नाही म्हणून ‘विडीओ कॉल’च्या माध्यमातून विद्यार्थी व शिक्षक एकमेकांना पाहत आहेत.विद्यार्थ्यांचे हसरे चेहरे पाहून आकाश ठेंगणे होते. टाळेबंदीच्या काळात कोरोनाने धास्तावलेल्या आम्हां शिक्षकांना आनंद देणाऱ्या आमच्या चिमुकल्या बालकांना,स्वयंसेवकांना ,पालकांना मनापासून धन्यवाद.शेवटी मी एवढच म्हणेन

असा बदलत गेला फळा ,
अशी बदलत गेली शाळा ,
ऑनलाईन शिक्षणाचा,
सर्वांना लागलाय लळा!’

✒️लेखक:-गजानन गोपेवाड राज्य समन्वयक
अग्निपंख फाउंडेशन महाराष्ट्र राज्य