परभणीला कापूस विद्यापीठ तथा कापूस प्रक्रिया उद्योग स्थापन करा

  46

  ?खासदार संजय जाधव यांची लोकसभेत मागणी

  ✒️अतुल उनवणे(विशेष प्रतिनिधी)मो:-9881292081

  परभणी(दि.17सप्टेंबर):-राज्यात कापसासाठी मराठवाडा प्रसिद्ध असून येथील शेतकर्‍यांचे अर्थकारण केवळ कापसावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत परभणी येथे कापूस प्रक्रिया उद्योग नसल्याने अन्य राज्यांवर अवलंबून राहावे लागते. म्हणून परभणी येथे कापूस विद्यापीठ तथा कापूस प्रक्रिया उद्योग स्थापन करण्यात यावा, अशी मागणी खासदार संजय जाधव यांनी लोकसभेत केली.

  या भागातील शेतकर्‍यांचे जीवनमान सुधारण्यासाठी कापूस या पिकावर आधारित प्रक्रिया उद्योगांना चालना मिळणे आवश्यक आहे. येथील शेतकर्‍यांचे सर्व अर्थकारण कापसावर अवलंबून असतानाही केवळ परभणी येथे कापसावर प्रक्रिया करणारे महत्त्वाकांक्षी प्रकल्प नसल्याने येथील शेतकर्‍यांना तामिळनाडूसह अन्य राज्यावर अवलंबून राहावे लागते. परिणामी या भागातील कापूस उत्पादक परावलंबी आहेत. त्यांचा खर्च होतो पण फायदा मात्र होत नाही. अशा परिस्थितीत परभणी लोकसभा मतदारसंघात कापूस विद्यापीठ तथा कापूस प्रक्रिया उद्योग निर्माण करण्यात यावा.

  जर या भागात कापसावर प्रक्रिया करणारे उद्योग उभे राहिले तर शेतकर्‍यांना अन्य राज्यांवर अवलंबून राहावे लागणार नाही आणि त्यांचा खर्चही वाचेल. तसेच कापूस प्रक्रिया उद्योगामुळे या भागातील बेरोजगारी दूर होईल. कापसावरील प्रक्रिया उद्योगामुळे केंद्र व राज्य सरकारला महसूलही मिळेल. त्यामुळे परभणी येथे कापूस विद्यापीठ तथा कापूस प्रक्रिया उद्योग स्थापन करण्यात यावा, अशी मागणी खा. जाधव यांनी लोकसभेत केली.