मृत्युंजय कार शिवाजी सावंत यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन

44

ज्यांच्या सुवर्ण लेखणीने इतिहासाच्या पानांवर सूर्यपूत्र कर्णाला अजरामर केले ते अलौकिक, असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे दिग्गज लेखक कैलासवासी शिवाजी सावंत . वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी त्यांनी मृत्यूंजय ही कादंबरी लिहिली . ही कादंबरी म्हणजे मराठी कादंबऱ्यात मानदंड मानली जाते . या कादंबरीमुळे त्यांची ओळखच मृत्यूंजयकार सावंत अशी झाली.

कै. शिवाजी गोविंदराव सावंत यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९४० रोजी कोल्हापूरमधील आजरा या गावी एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला . सावंत शालेय वयात उत्कृष्ट कबड्डीपटू होते . त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण आजरा येथे झाले . त्यांनी कोल्हापूरात बी .ए चे प्रथम वर्ष पूर्ण केले . त्यानंतर वाणिज्य शाखेतील GSD पदविका घेतली . टायपिंग , शॉर्ट हॅन्डचा कोर्स करुन कोर्टात कारकून म्हणून नोकरी केली . त्यानंतर कोल्हापूरातील राजाराम प्रशालेत१९६२—१९७४ या कालावधीत शिक्षक म्हणून काम केले . पूण्यात स्थायिक झाल्यानंतर १९७४ ते १९८० ही सहा वर्षे महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या लोकशिक्षण या मासिकाचे सहसंपादक म्हणून व त्यानंतर संपादक म्हणून काम केले .१९८३ मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली व पुढील आयुष्यात फक्त लिखाणावरच लक्ष केंद्रीत केले .

शिवाजी सावंत हे १९९५ पासून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे काही वर्षे उपाध्यक्ष होते .१९८३ मध्ये बडोदा येथील बडोदा मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष होते .मृत्यूंजय च्या लेखनासाठी त्यांनी थेट कुरुक्षेत्रात मुक्काम ठोकला होता . प्रदीर्घ संशोधन , चिंतन, मनन यातून रसाळ ,वास्तववादी अशा कादंबरीचा जन्म झाला . प्रत्येक वाचकाला कुरुक्षेत्रावर घेऊन जाण्याची शब्दांची अफाट ताकद यामधून सावंत यांनी पणास लावली आहे . ‘ मृत्यूंजयकार ‘ शिवाजी सावंत हे नाव महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या वाचकवर्गापर्यंत सर्वत्र अत्यंत जलदमार्गाने सुप्रसिद्ध झाले . त्यांच्या या कथेची कन्नड, गुजराती ,बंगाली, तेलगु ,उडीया अशा विविध भाषांमध्ये भाषांतरे झाली . स्थल ,काल ,भाषेच्या मर्यादा ओलांडून गेलेली ही मराठीतील पहिली कादंबरी त्यांनी लिहिली .सामान्यतः खलनायक म्हणून परिचित असलेल्या महावीर कर्णाच्या असामान्य सकारात्मक व्यक्तिमत्वाचा मागोवा घेणारी , धर्म -अधर्मात अडकलेले कर्णाचे शापित जीवन यांचे कोडे उलगडवून दाखवणारी ही अजरामर कादंबरी मराठी साहित्यातील अत्युत्कृष्ट रचना होती .

त्यानंतर युगंधर ही अजरामर कादंबरी त्यांनी लिहिली . देवाचा अवतार, राधेचा कन्हैय्या अर्जुनाचा सारथी या पलिकडे जाऊन श्रीकृष्ण एक मनुष्य म्हणून कसे होते ? विज्ञानयुगात श्रीकृष्णाला डोळसपणे बघण्याची अनुभवण्याची शब्दरूपी दृष्टी सावंतांनी या कादंबरीतून दिली आहे .
छावा ही त्पांची अत्यंत भावस्पर्शी ऐतिहासिक कादंबरी . छ्त्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरची चरीत्रात्मक कहाणी . संभाजी महाराजांचे इतिहासातून साकारलेले तामसी, अविचारी, चैनी रुप पुसून टाकून अत्यंत पराक्रमी , हळवे ,देशप्रेमी , धर्मप्रेमी ,जाज्वल्यतेचे , स्वराज्य अस्मितेचे रूप छावामधून वाचकांसमोर मांडले आणि एका अत्यंत लढवय्या स्वाभिमानी बाण्याच्या वीर पुरूषास खऱ्या अर्थाने न्याय दिला.

संभाजीराजे खरंच व्यसनांध असते तर शेवटच्या क्षणी ढासळले असते . कारण औरंगजेबाने दिलेली ती शिक्षाच क्षणाक्षणाला वेदनेची लहर अन रक्ताच्या चिळकांड्या उडवून मरणयातना देणारी होती .४२ दिवस मृत्यूला कित्येक घायाळ अवयवांवीना सामोरा जाणारा शिवबांचा छावा तामसी चैनी कसा असू शकेल ? तो शिवबांसारखाच अत्यंत तेजस्वी व स्वाभिमानी बाण्याचा सक्षम राजा होता हे त्यांनी शब्दांशब्दांतून मांडले आहे .
वाचकाची उत्कंठा वाढवणारी, वाचकाला खिळवून ठेवणारी, डोळयांसमोर झर्रकन सारा प्रसंग, पात्रे उभी करणारी , संवादात्मक नवरसांनी परिपूर्ण भाषा ही त्यांच्या भाषेची वैशिट्ये होत .

पद्मश्री विखे पाटलांची चरीत्रकहाणी लढत, मनोहर कोतवालांचा संघर्ष, क्रांतिसिंहांची गावरान बोली, शेलका साज , मोरावळा , अशीमने असे नमुने, ही त्यांची अन्य ग्रंथसंपदा मराठी भाषेत प्रकाशित झालेली आहे .
१८ सप्टेंबर २००२ साली आपल्या उमेदवारीच्या प्रसारासाठी ते गोवा येथील मडगांव या ठिकाणी गेले असता तीव्र हदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले .
मराठी साहित्य क्षेत्रातील एक अनमोल हिरा हरपला . मृत्यूनंतरही मृत्यूंजयकार म्हणून अनंत काळापर्यंत ते अमर राहतील यात शंकाच नाही .
आज त्यांच्या स्मृतिदिनी मी नतमस्तक होऊन विनम्रतेने अभिवादन करते.

✒️लेखिका:-सौ शामल शंकर मांजरेकर
वेगुर्ला सिंधुदुर्ग
मो:-९४०४४४७५५०

▪️संकलन:-प्रा.रावसाहेब राशिनकर(साहेब)
(अहमदनगर विशेष प्रतिनिधी)
मो:-९४०४३२२९३१