✒️माधव शिंदें(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.19सप्टेंबर):- जिल्ह्यात महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, 2019″ योजनेंतर्गत 9,905 शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणिकरण करण्याची प्रक्रिया बाकी आहे. सदर शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केल्याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यात शासनामार्फत कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार नाही. त्याकरिता आधार प्रमाणिकरण शिल्लक शेतकऱ्यांनी तात्काळ जवळच्या सेतू केंद्रावर जाऊन तात्काळ आधार प्रमाणिकरण करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था नांदेड डॉ. अमोल यादव, यांनी केले आहे.

राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने “महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, 2019” अन्वये 27 डिसेंबर, 2019 च्या निर्णयान्वये कार्यन्वित केली आहे. 1 एप्रिल, 2015 ते 31 मार्च, 2019 पर्यंतच्या कालावधीसाठी अल्पमुदतीचे पीककर्ज घेतलेल्या, तसेच या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदतीच्या पीक कर्जाचे पुर्नगठन / फेरपुनर्गठन केलेल्या कर्जामधील 30 सप्टेंबर, 2019 रोजी 2 लाखापर्यंत थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना सदर कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

जिल्ह्यात सदर योजनेंतर्गत एकूण 2 लाख 14 हजार 491 शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र असुन त्यापैकी बँकांनी 1 लाख 97 हजार 141 शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड केलेली आहे. सदर बँकांनी अपलोड केलेल्या माहितीपैकी शासनाने कर्जमाफी पात्र असणाऱ्या 1 लाख 84 हजार 842 शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यापैकी 1 लाख 67 हजार 827 शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम 1154 कोटी 25 लाख रुपये जमा करण्यात आलेले आहेत. उर्वरीत आधार प्रमाणिकरण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात शासनामार्फत लवकरच कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात येणार आहे असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED