कोरोना काळात मोठा गैरसमज – कोरोना योद्धेच धोक्यात

12

                 ▪️विशेष लेख▪️

कोरोना ही एक महामारी आहे. ते वुहान या शहरातून पूर्ण जगात पसरलंय हे आता सांगायची गरज राहिलेली नाही. व्हाट्स अँप, फेसबुक, यु ट्यूब युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून काही लोकांनी समाजामध्ये स्वतः च्या फायद्यासाठी विष पेरण्याचे काम केले आहे. त्यामुळे रुग्णाचे नातेवाईक व कोरोना योद्धे यांच्या नात्यामध्ये फार मोठी दरी निर्माण करण्याचे काम या समाजकंटकांनी केले आहे.

गैरसमज क्रमांक 1: मेल्यानंतर डॉक्टरला दीड लाख रुपये मिळतात म्हणून डॉक्टर मुद्दाम रुग्णांना मारीत आहेत.

गैरसमज क्रमांक 2: रुग्ण मेल्यानंतर लिव्हर, किडनी काढून विकतात.

त्यावर हे स्पष्टीकरण: महाराष्ट्र शासन व भारत सरकार यांच्याकडे एवढा पैसा नाही कि, ते मृत रुग्णामागे दीड लाख रूपये देतील. इथे कोरोना योद्धे यांचाच वेळेवर पगार होत नाही तर दीड लाख रुपये कुठून देणार? हा गैरसमज कोणी, कसा व का पसरवला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. एखादा कोरोना बाधित रुग्ण मेल्यानंतर त्याचे कोणतेच अवयव कामी येत नाही. कोणत्याही कोरोना बाधित रुग्णाचे शव- विच्छेदन करण्यास मनाई आहे. मृत देहापासून होणारा संसर्ग रोखण्यासाठी मृत देहाची विशिष्ट पद्धतीने पॅकिंग केली जाते. त्यांचा अंतिम विधी राज्यशासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार करण्यात येतो. कोरोना बाधित रुग्णाचे मृत देहाचे अंत्यविधी करण्याची जवाबदारी संबधित महानगर पालिकेकडे देण्यात आली आहे. परंतु लोकांनी असा गैरसमज पसरवला कि, मृतदेहाचे अवयव काढतात, ही बाब निंदनीय आहे.

सद्या वैद्यकीय क्षेत्रावर ताण वाढला आहे. कोरोना वॉर्ड मध्ये काम करणारे डॉक्टर, नर्सेस व आरोग्य कर्मचारी 6 महिन्यापासून घरी गेलेले नाही. “ना आम्ही घर बघितलं, ना आम्ही आईवडील बघितले, आम्ही कोरोना योद्धे कोरोनाशी आजही सैनिकासारखे जीवाचं रान करून लढा देत आहोत.” कोरोना वॉर्ड मध्ये काम करीत असताना पीपीई किट घातल्यानंतर दोनच मिनटात घाम यायला चालू होतो आणि डोक्यावर फेस शिल्ड घातली घातली कि 10 मिनिटांनी श्वास घ्यायचा त्रास होतो. ज्यांना विश्वास वाटत नाही त्यांनी एकदातरी पीपीई किट घालून 8 तास सेवा करुन दाखवावे. आम्ही रोज 8 -8 तास किट घालून निःस्वार्थपणे 6 महिन्यापासून रुग्ण सेवा करतो आहोत, कधी याचाही विचार करा.

सद्या चुकीच्या व अर्धवट माहितीमुळे कोरोना योद्धेच धोक्यात आले आहे. पूर्ण भारतभर 383 डॉक्टर कोरोनाच्या युद्धात शहिद झाले आहे. रोज कोणी ना कोणी कोरोना योद्धा कोरोना पॉझिटिव्ह येत आहे आणि शहिद होत आहे. पण आम्ही आमच्या जीवाची पर्वा न करता सामान्य माणसासाठी आरोग्य सेवा देत आहोत.

व्हाट्स अँप युनिव्हर्सिटीतुन बाहेर पडलेले लोक आम्हालाच आरोग्य ज्ञान शिकवतात. रुग्णाचा मृत्यू झाल्यावर त्याचे तापमान तपासायला सांगणे हे अशा व्हाट्स अँप युनिव्हर्सिटीचे ज्ञान पदवी मिळवलेल्या डॉक्टरला सांगणे कितपत योग्य आहे? अशा अर्धवट ज्ञानावर डॉक्टरांना घाणेरड्या शिव्या देऊन झुंडीने त्यांच्या अंगावर धावून जातात.

कोरोना हा एक गंभीर स्वरूपाचा आजार आहे हे मागील 6 महिन्या पासून समजावून सांगून सुद्धा लोक बिनकामी फिरताना दिसत आहे. हा आजार कुणालाही होऊ शकतो ही बाब नागरिकांनी लक्षात ठेवावी. सौम्य लक्षणे असतांना रुग्णाला जास्त त्रास होत नाही. त्याच्या प्रतिकार शक्तीच्या जोरावर तो बराही होतो. परंतु मध्यम प्रकारची लक्षणे असतानाही रुग्णाला दवाखान्यात नेले जात नाही आणि त्रास वाढल्यानंतर रुग्णांना दवाखान्यात घेऊन जातो, पण त्या वेळेस रुग्ण हा मध्यम कडून गंभीर स्वरूपाकडे गेलेला असतो. परिणामी रुग्ण दगावतो. आयसीयु वॉर्ड मध्ये भरती झाल्यावर रुग्णास प्रोटोकॉलनुसार उपचार सुरु केले जातात. औषधी, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर इत्यादी लावले जाते.

चंद्रपूर येथील संपूर्ण दवाखान्यात सीसीटीव्ही कॅमेरा बसवलेले आहेत. तसेच जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेले राजपत्रित अधिकारी त्यावर 24 तास निगराणी करीत असतात. त्यामुळे डॉक्टर, सिस्टर, आरोग्य कर्मचारी हे सर्व आपली ड्युटी बरोबर करत आहेतच. परंतु एखादा रुग्ण दगावल्यावर शंभर लोकांचा समूह आमचा रुग्ण कसा मरण पावला म्हणून कोरोना योध्याच्या अंगावर धावून येतात, त्यावेळेस जीवाच्या भीतीने कोरोना योध्यावर लपून बसण्याची वेळ येते. याचा अर्थ असा नाही कि, डॉक्टर चुकीचा आहे म्हणून लपून बसला आहे किंवा शंभर लोकांचा समूह जिंकला असेही होत नाही. ही सर्वांची हार आहे. ज्यांना कोरोना झालाय ते जीवाशी हारले आणि ज्यांनी उपचार केले तेही हारले. आम्ही कोरोना योद्धे तुमच्या मधीलच एक आहोत.

आम्हालाही घरदार आहे, संसार आहे, मित्र मैत्रीण आहे, आम्हाला ही आमच्या जीवाची भीती वाटते. जर असेच हल्ले होत राहिले तर एक ,एक डॉक्टर नौकरी सोडून जाईल व पूर्ण आरोग्य व्यवस्था कोलमडून पडेल. कालच माझी आई म्हणाली, “सर्व सोडून घरी ये आम्ही तुला खाऊ घालतो सोडून दे नोकरी.” पण मला माहित आहे मी जर नोकरी सोडली तर आरोग्य व्यवस्थेवर किती मोठा परिणाम होईल, मी म्हणजे मी एकटा नाही तर हजारो, लाखो डॉक्टर. डॉक्टरांनी नोकरी सोडली तर रुग्णाची, सामान्य नागरिकांची काय अवस्था होईल याचा सुज्ञपणे विचार करा !

ज्या काळात सर्वांनी मिळून कोरोनाशी दोन हात करण्याची वेळ आहे त्याच काळात कोरोनाला न हरवताआपण कोरोना योध्याला हरवण्याचे काम करीत आहोत. कोरोना योद्धे हारले तर संपूर्ण भारत हारेल हे लक्षात ठेवा. लोकांनी कोणत्याच अफवांना बळी पडू नये. हे युद्ध सर्व मिळून जिंकू, आरोग्य व्यवस्थेवर विश्वास ठेवा. जगातल्या कोणत्याच डॉक्टरला आपला रुग्ण मरावा असे वाटत नाही. आम्ही रुग्णाच्या शेवटच्या श्वासापर्यंत रुग्णांना वाचवण्याचा प्रयत्न करीत असतो. आम्ही ही शेवटी माणूसच आहोत देव नाही आम्ही जेवढे प्रयत्न करतो तेवढा प्रतिसाद रुग्णांच्या शरीराने ही द्यायला हवा असतो हे लक्षात असू द्या. त्यामुळे सर्वांनी साथ द्यावी, कायदा कोणीही हातात घेऊ नये कोरोना योध्यांना मारहाण करू नये अशी नागरिकांना विनंती आहे. कोरोना योध्यावर हल्ला करणे हा महाराष्ट्र वैद्यकीय सेवा अधिनियम 2005 अन्वये अजामीनपात्र गुन्हा असून त्यात 3-10 वर्षापर्यंत सक्त मजुरीची शिक्षेची तरतुद आहे.

✒️लेखक:-डॉ. नितीन पोटे(निवासी वैद्यकीय अधिकारी, चंद्रपूर)