मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी घेतली पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट

25

🔸मराठा आरक्षणाला माझा पूर्णपणे पाठींबा- मंञी छगन भुजबळ

✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

नाशिक(दि.21सप्टेंबर):- महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. त्यामुळे मराठा समाज बांधवाना मोठा दिलासा मिळाला. मात्र नुकताच मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे ही लढाई आता पूर्णपणे न्यायालयीन झाली आहे. त्यामुळे मी जरी ओबीसी नेता असलो तरी मराठा आरक्षणाला माझा पूर्णपणे पाठींबा असून माझा पक्ष, राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सर्वेसर्वा खासदार शरदचंद्रजी पवार साहेब आणि राज्यशासन यांचा देखील मराठा आरक्षणास १०० टक्के पाठींबा असून राज्यशासनाच्या वतीने न्यायालयात हा लढा पूर्ण ताकदीने लढला जाईल. तसेच मराठा मोर्चा समन्वयकांवरील गुन्हे मागे घेणे, सारथी पूर्ण क्षमतेने सुरु करणे, मराठा मुलीसाठी वसतिगृह या सर्व मागण्या आपण शासन दरबारी मांडून त्या पूर्ण करू असे आश्वासन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना.छगन भुजबळ यांनी दिले.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, माजी खासदार देविदास पिंगळे, माजी आमदार जयवंतराव जाधव, नाना महाले, सुनील बागुल, निवृत्ती अरिंगळे, रंजन ठाकरे, ज्येष्ठ नगरसेविका वत्सला खैरे, करण गायकर, तुषार जगताप, गणेश कदम, शरद तुंगार, शिवा तेलंग, बंटी भागवत, आशिष हिरे, चेतन शेलार, शिवाजी मोरे, संदीप शितोळे, बाळा निगळ, नीलेश शेलार, निलेश मोरे, किरण पानकर, योगेश गांगुर्डे यांच्यासह मराठा मोर्चा समन्वयक उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, गेल्या दोन दिवसांपूर्वी कांद्याच्या प्रश्नावर शरदचंद्र पवार साहेब यांच्या समवेत दिल्लीत बैठक आयोजित केल्याने मी दिल्लीला जात असल्याने सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे समन्वयकांना कळविले होते. तसेच हा दौरा अचानकपणे रद्द झाल्याने पुन्हा मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांना नियोजित सार्वजनिक कार्यक्रमांच्या नुसार चर्चा करून सकाळी १०.३० वाजता तसेच दुपारी १.३० वाजता भेटण्याची वेळ दिलेली होती. तसेच मोर्चेकऱ्यांची सर्व व्यवस्था करण्यात आलेली होती. मात्र भेटण्यासाठी कार्यालयात पोहचण्याच्या आधीच मोर्चा समन्वयकांनी माझ्या विरोधात प्रक्षोभक भाषणे व घोषणाबाजी करत तिथून काढता पाय घेतला. समन्वयकांना भेटायला वेळ दिलेली असतांना देखील समाजात द्वेष पसरविण्याचे काम केले. याचं तीव्र दु:ख होत असल्याचे ते म्हणाले.

ते म्हणाले की, हा सर्व प्रकार घडल्यानंतरही आपण मराठा मोर्चा समन्वयकांना भेटण्यासाठी तयार आहोत असे कळविले होते. त्यानुसार आपण आज आला त्याबद्दल मी आपला आभारी असल्याचे सांगत. कुठलाही मोर्चा करतांना त्या मोर्चाचे नेतृत्व करण्याची कुणाएका नेत्याची जबाबदारी असते. त्यामुळे हा मोर्चा पार पडत असतांना याठिकाणी होत असलेल्या चुकीच्या प्रकाराबद्दल मोर्चेकऱ्यांना समजाविण्याची कुठल्यातरी नेत्याची जबाबदारी होती ती पार पाडली गेली नाही. ते म्हणाले की, केंद्र सरकारने आपले आरक्षण ५० टक्क्यांहून ६० टक्क्यांवर नेत आरक्षणात १० टक्के वाढ केली. त्यावेळी मात्र स्थगिती मिळाली नाही. मात्र महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षण दिल्यानंतर आरक्षणाला स्थगिती कशी काय मिळाली असा सवाल उपस्थित करत यामध्ये केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्याची गरज होती असे त्यांनी सांगीतले. ते म्हणाले की, मी मराठा आरक्षणाचा विरोधक नाही या आरक्षणाला आपला पूर्ण पाठिंबा असून आपण आजवर मंत्रीमंडळात तसेच माध्यमांसमोर आपली भूमिका खुल्या पद्धतीने मांडली आहे. मात्र तरी देखील केवळ छगन भुजबळ बद्दल आकस निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे हे योग्य नसल्याचे ते म्हणाले.

ते म्हणाले की, आजवर माझाकडे आलेल्या कुठल्याही व्यक्तीची जात, धर्म मी बघितली नाही तर त्याचे काम काय आहे ते करण्यास प्राधान्य दिले. ओबीसींना आरक्षण देण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार, विलासराव देशमुख यांनी घेतला. त्यांनी आरक्षण दिलं याचा सर्वांचा विचार करावा. ओबीसीला आरक्षण मिळालं तेव्हा ९ न्यायाधीशांच्या पुढे लढाई झाली तेव्हा आरक्षण मिळालं त्यामुळे ही लढाई इतकी सोपी नाही. आज आमदार मंत्र्यांशी लढाई राहिलेली नाही तर ही लढाई सुप्रीम कोर्टात असून ती लढाई आपण जिंकली पाहिजे यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील. खासदार शरदचंद्र पवार साहेब हे यामध्ये विशेष लक्ष देत असून त्यांनी आपला पाठींबा देखील जाहीर केलेला आहे. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन जात असतांना तरी कुणाच्याही मनात द्वेष भावना नसावी. मराठा आरक्षणा संदर्भात आपण यापुढील काळातही लोकभावना शासनापर्यंत पोचवू असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

पालकमंञी छगन भुजबळ यांच्याविषयी क्रांती मोर्चाच्या मनात कुठलाही आकस नाही. शुक्रवारी घडलेला प्रकार असमन्वयातून झालेल्या गैरसमजाचा परिणाम असला तरी दुर्दैवी होता याची जाणीव झाली आहे. जिल्ह्याचे पालक म्हणून भुजबळ साहेबांनी आमच्या भावना समजून घ्याव्यात असे मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर यांनी स्पष्ट केले. तसेच जेष्ठ नेते सुनील बागुल यांनी नाशिक जिल्ह्याच्या विकासात छगन भुजबळ यांचे योगदान मोठे असल्याचे सांगत आपली भूमिका स्पष्ट केली.