मुलांशी मोकळा संवाद साधावा

26

लॉकडाऊन चा काळ 

आहे मोठा अवघड
नात्यांची, मनाची
होऊ नका देवू पडझड”

आजकाल सगळीकडे वाचनात येतेय, शाळकरी मुलाने डिप्रेशन मध्ये येऊन आत्महत्या केली, डिप्रेशन मध्ये आल्याने शालेय मुलीवर हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट सुरू…अश्या बातम्या वाचल्या की मन सुन्न होते, कुठे चाललोय आपण? आपल्या माणसांना समजून घेण्यासाठी आपल्या कडे वेळ नाहीये? लहान मुलांचे वय आहे का डिप्रेशन मध्ये जाण्याचे?लहान मूल प्रसार माध्यमांच्या आहारी जातात, चुकीच्या जाळ्यात सापडतात, खेळायच्या बागडायच्या वयात मूल आत्महत्या करतात!! आपल्या समाजाची हि शोकांतिका आहे.

आई वडील दोघे नौकरी करतात, किंवा स्वतः मध्ये एवढे बिझी असतात की कोवळ्या मुलांसाठी वेळ नसतो. स्वतंत्र कुटुंब पद्धतीत मुलं एकटी पडायला लागलीत, शहरात तर हे चित्र अधिक विदारक आहे. खेडयांना आंगण तरी आहे, शहरात खिडकीतच विश्व! एकाकीपणा खायला उठतो, सध्याच्या लॉकडावूनच्या काळात तर मित्र परिवार पण लांब झाला आहे, मोठी माणसं जिथे अस्वस्थ होत आहेत तिथे या चिमुकल्यांचे काय हाल होत असतील?
पण हे बदलायला हवं, “मुलं ही देवाघरची फ़ुलं” त्यांना जपायला हवं, आपली मुलं ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे, आपले कर्तव्य आहे, आणि मगच दुसऱ्या गोष्टी! फार वेळ घेत नाहीत तीआपला, पण त्यांना जाणवलं पाहिजे की आपण फक्त त्यांच्यासाठी आहोत, आपली मुलं आपला सगळ्यात मोठा खजिना आहे, हे जेव्हा त्यांना जाणवेल तेव्हाच त्यांच्या चेहऱ्यावरच तेज वेगळंच असणार! आपल्या वर त्यांचा उदंड विश्वास बसतो, आणि प्रत्येक सदृढ नात्याचा पाया भक्कम विश्वास असतो. मुलांशी सतत बोलत रहा, मुलं बोलायला शिकतात तेव्हा सुरवातच “का?” ने असते, प्रत्येक गोष्टीत “का?” विचारतात, तेव्हा पासूनच त्यांच्या “का” चे समर्थन करावे. प्रश्न कोणताही असो, अगदी वेड्यासारखा अर्थहीन असला तरी त्याचे उत्तर द्यावे आणि तेंव्हाच द्यावे, परत तो विसरून जाऊ शकतो. पालकांसाठी बावळट गटात मोडणारा प्रश्न हा त्याच्यासाठी अवघड आणि महत्वाचा प्रश्न असतो. प्रसार माध्यमांमुळे कमी वयात मुलांच्या अनेक गोष्टींशी ओळख होत आहे.

अनेक अवघड प्रश्न त्यांच्या मनात तयार होतात, त्यांच्या “त्या” अवघड प्रश्नांची उत्तरे देण्यास ही आपण तयार असलो पाहिजे, आपण जर संकोच बाळगला आणी उत्तर देण्यास टाळाटाळ केली तर मुलं त्यांच्या परीने उत्तर मिळवायचा प्रयत्न करतात, आणि चुकीच्या माहितीला, चुकीच्या लोकांच्या संपर्कात येतात. आपल्या टाळाटाळ मुळे मुलं आपल्या पासून दूर जातात, आपल्या वरचा त्यांचा विश्वास कमी झालेला असतो. त्यांच्या मनातल्या दुविधा ते व्यक्त करत नाहीत, मुलांच्या मनात अकारण अविश्वासातून पालकां बद्दल भीती निर्माण झालेली असते. आणि आपल्याला कुणी समजून घेत नाही, आपलं कुणी नाही या घरात, अश्या वैमनस्यातुन छोटी छोटी मुले सुद्धा चुकीचे पाऊल उचलतात. वेळ गेल्यानंतर रडण्यात अर्थ नसतो. त्यांच्यावरती ओरडण्या पेक्षा त्यांच्याशी बोलले पाहिजे. मुलांशी बोला, रोज मिळून जेवण करा, जेवतांना गप्पा मारा, मुलांच्या भावविश्वात रमा, त्यांच्याशी खेळत चला, तुमच्यातल् लहान मूल जिवंत ठेवा. त्यांच्या मित्रांच्या, शाळेच्या विषयावर बोला, त्यांना जाणून घ्या, समजून घ्या. फक्त पोलिसी माहिती जमा करू नका, टोमणे, रागावणे, टाळाटाळ करणे यामुळे आपली मुलं आपल्यापासुन दूर जाणार.

मुलांना मित्र बनवा, त्यांचे सर्वात जवळचे मित्र बना, आयुष्यभराचा ठेवा आहेत ही, त्यांना फुलासारख जपावं.
मुलांसोबत पावसात भिजाव, अंगणात पळाव, जोर्याने सुरात सूर टाकून ओरडावे , घरघर खेळावे, बोर्ड गेम खेळावे, मोबाईल पण खेळा, मुलं मोठी असतील तर त्यांच्याशी चर्चा करा, त्यांच्या आवडीच्या विषयावर गप्पा मारा, कॉफी बडी बना, शॉपिंगला जावा, त्यांना हवं तसं राहण्याचं स्वातंत्र्य द्या, त्यांच्यासारखे होऊन त्यांच्यासोबत जगा. त्यांच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे द्या, जर आजूबाजूला माणसं असतील तर घरी आल्यावर, किंवा निवांत एकांतात समजावून सांगा, पण दुर्लक्ष कधीच करू नका. “आई बाबा तुम्ही मला खूप आवडतात, तुम्ही माझे बेस्ट फ्रेंड आहात”, हे ऐकायला कुणाला नाही, आवडणार. आणि हे आतून हृदयातून असणार, पॅरेन्ट्स डे पुरत नसणार ह! मुलांना पालकांची भीती नाही विश्वास वाटला पाहिजे, मी कितीही चुकलो तरी शेवटी माझे आई बाबा मला नाही रागवणार, तेच समजून घेणार हा विश्वास मुलांच्या मनात रोवला पाहिजे, मग डिप्रेशन जवळ ही फिरकणार नाही.

इंद्रधनुचे रंग “ती”
फुलातला मकरंद “ती”
मोगऱ्याच्या सुगंध “ती”
पावसाच्या सरीचा पहिला गंध ती
अलगद चांदण उचलून देवाने ओंजळीत ठेवलीत “ती” मुलं आहेत आपली.

✒️लेखिका:-प्रिती पाटील
खारघर, नवी मुंबई
मो:-9930944882

▪️संकलन:-प्रा.रावसाहेब राशिनकर
अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
मो:-9404322931