सलग दुसऱ्या दिवशीही ट्रॅक्टर पकडले – आधी अवैध दगड तर आता रेती

42

🔸मागील अनेक दिवसांपासून गोरखधंदाला ऊत कंकडालवार यांचा प्रताप

✒️अहेरी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

अहेरी(दि.23सप्टेंबर):- जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे भाऊ वैभव कंकडालवार हे जंगलातुन अवैधरित्या ट्रॅक्टरनी दगड वाहतूक करतांना काटेपल्ली येथे सोमवार रोजी सापडले तर सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवार रोजी मूदुमतुरा येथे अवैधरित्या रेती वाहतूक करतांना सापडले.

सोमवार 21 सप्टेंबर रोजी जंगलातुन अवैधरित्या दगड उत्खनन करून महिंद्रा कंपनीचे MH 31 T 9898 या क्रमांकाच्या ट्रॅक्टरनी अवैधपणे दगडाची वाहतूक करतांना काटेपल्ली या गावात अहेरीचे तहसीलदार यांनी स्वतः ट्रॅक्टर पकडून जप्त केले.

तर सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवार 22 सप्टेंबर रोजी MH 33 T 8989 या क्रमांकाच्या ट्रॅक्टरनी एका घाटावरून रेतीची चोरी करतांना मूदुमतुरा या गावी महसूल विभागाचे मंडळ अधिकारी व चम्मूनी वैभव कंकडालवार यांच्या मालकीचे ट्रॅक्टर पकडले.

मागील अनेक दिवसांपासून अवैधरित्या जंगलातून दगड उत्खनन करून वाहतूक करणे आणि रेतीची पण अवैधरित्या डूलाई करणे हे राजरोसपणे सुरू असून सातत्याने पहिल्या व दुसऱ्या दिवशी गौनखनिज अवैधपणे वाहतूक करतांना महसूल विभागाने पकडल्याने कडक कार्यवाहीची मागणी होत आहे.

स्वतः गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार असून त्यांचेच सख्ये बंधू अवैध कामाचे प्रताप करीत असल्याने व सलग दोनदा चोरी करतांना सापडल्याने प्रशासनात आश्चर्य आणि नागरिकांमध्ये रोष व्यक्त केल्या जात आहे.