माझे रोल मॉडेल – माझे वडील

37

माझे वडील झगाजी खोब्रागडे ह्यांचा मृत्यू दि. 23 सप्टेंबर 1981 ला झाला. चालता बोलता गेले. त्यांची जन्म तारीख माहीत नाही. आईची जन्म तारीख सुद्धा माहीत नाही. आईचे निधन दि. 31 मार्च 2009 ला झाले. वडिलांच्या निधनानंतर आम्ही सगळे एकत्र राहिलो. आई वडील दोघेही निरक्षर होते, पण शहाणे होते. वडिलांचा समाजात शहाणा माणूस म्हणून मानसन्मान होता. बौद्ध पंच कमिटीचे अध्यक्ष होते. समजुतदारपणाच्या गोष्टी सांगायचे. हे शहाणपण बुद्धाचे विचारातूनच आले असावे.

लोकं सल्ला मागायला यायचे. कामासाठी तहसील ला जायचे. संत प्रवृत्ती होती. कथा-कीर्तन ऐकायचे. भीष्माचार्य महाराज आमच्या गावी कीर्तनाला यायचे. माझे वडील सुद्धा कथा-गोष्टी सांगायचे, गाव ऐकायचा. आमच्याकडे खूप दारिद्रय, अनेक गोष्टींचा अभाव होता. प्रतिकुलता, निरक्षरता होती, तरी शेवटपर्यंत, स्वाभिमानाचे व सदाचाराचे जीवन जगत राहिले. कोणाचे काही न घेता, होईल तेवढी मदत सामाजिक दायित्व म्हणून करायचे. प्रकृतीमुळे त्यांना अंगमेहनतीचे काम फार जमत नसत. माझी आई मोलमजुरी, कष्ट करून संसार सांभाळायची. माझे शिक्षण M.Sc. पर्यंत होण्यास आई वडिलांचे कष्ट आहेत, हे विसरता येणार नाही. वडिलांचा मृत्यू होऊन 40 वर्ष होत आलेत. आज त्यांना पहिल्यांदाच जाहीरपणे विनम्र अभिवादन करतो.

2. अनेक आठवणी आहेत. एक लहानपणची आठवण सांगतो. माझे वडील चिलम प्यायचे. चिलम मध्ये तंबाखू, त्यावर निखारा व शापि लावून ओढली जायची. बरेच वेळा चिलम भरून आणायला मला सांगायचे. एकदा असे झाले की चिलम भरल्यावर, नेऊन देताना मी दम मारला. जोराचा ठसका आला. खोकलत नेऊन दिली. मला विचारलं, चिलमचा दम मारला का? मी नाही म्हणालो. परंतु, त्यांचे लक्षात आले होते, पोराने दम मारला म्हणून. पोरगा बिघडू नये, व्यसन लागू नये म्हणून त्यांनीच चिलम ओढणे सोडून दिले. तेव्हा मला ह्याचे महत्व समजले नाही पण नंतर समजले. खरं तर इतरांना आदर्श घालून देणारा हा निर्णय होता. एका घटनेवरून हा निर्णय घेणारे, माझे वडील निरक्षर असले तरी खूप शहाणे होते. इतर दुसरे कोणतेही व्यसन त्यांना नव्हतेच. साधं राहणं, आहे त्यात समाधान, दुःखाचे कारणच नाही. या संस्कारामुळेच असेल, मी 29 वर्षे सनदी अधिकारी होतो तरी कोणतेही व्यसन केले नाही, नितीमत्तेने वागलो. वडिलांनी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, शील- सदाचारी, स्वाभिमानी व्हावे यासाठी वाईट गोष्टींचा, सवयीचा त्याग करायला पाहिजे. माझे वडील, बुद्धाच्या विचाराने जगले, म्हणून माझे वडील माझे रोल मॉडेल ठरलेत.

3. सामान्यतः यूपीएससी/एमपीएससी स्पर्धा परीक्षेतून सनदी अधिकारी झालेल्या ब-याचशा अधिकाऱ्यांचे रोल मॉडेल कोणीतरी त्यांच्याच भागातील किंवा स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करणारे सनदी अधिकारी असतात. मी लग्नानंतर,1980 च्या एमपीएससीच्या परीक्षेला पहिल्यांदा बसलो. 1981-82 मध्ये अंतिम निकाल जाहीर झाला. मी उपजिल्हाधिकारी झालो, ते माझ्या वडिलांनी काही प्रश्न उपस्थित करून माझ्या पत्नीला व मला दिलेल्या सल्ल्यामुळे.

4. त्याचे असे झाले की, मी ओएनजीसी मध्ये वर्ग 1 अधिकारी, Geophysicist होतो. चांगला पगार, सुविधा, मुंबईत राहायला घर होते. जानेवारी 1980 ला मुंबईत देहराडून वरून आलो. फेब्रुवारी 1980 ला लग्न झाले. काही महिन्यांनी माझे वडील मुंबईला आले. मी जहाजावर ऑईल व गॅस exploration साठी जायचा.15 दिवस जहाजावर सारखे समुद्रात फिरणे, सर्व्हे करणे आणि 15 दिवस सुट्टी असा कार्यक्रम असायचा. मी जहाजावर ड्युटी वर असताना माझे वडिलांनी माझे पत्नीला रेखाला विचारले की, मी काय काम करतो. ती म्हणाली, ओएनजीसी मध्ये साहेब आहेत. त्यांना ONGC कळत नव्हतं. ते म्हणाले ओळखते कोण? ती म्हणाली, मित्र -सहकारी आणि माहेर-सासर कडील ओळखतात. त्यावर, माझे वडील म्हणाले, आमच्या गावच्या तलाठ्याला गाव ओळखतो, तहसीलदाराला तालुका आणि कलेक्टरला जिल्हा ओळखतो, सन्मान करतो, ते लोकांचे काम करतात. तेव्हा, एवढं शिक्षण झाल्यावर अशी नोकरी केली पाहिजे की समाज आपल्याला ओळखेल व आपण समाजाचे कामी येऊ. बापू कलेक्टर झाला पाहिजे,
त्याला समजावून सांग, असे माझ्या पत्नीला म्हणाले. मला बापू म्हणायचे. मी एकटाच मुलगा होतो. मी, वडिलांशी एकेरी शब्दातच बोलायचो. वडीलास ‘बावा’ आणि आईला ‘मा’ म्हणत असे.

5. मी जहाजावरून परतलो तेव्हा पत्नीने सांगितले. वडील मलाही तेच म्हणाले. काय करायचे एवढ्या पगाराचे, समाजासाठी काम करता येईल, समाजात ओळख होईल अशी कलेक्टरची नोकरी कर. काही दिवसात MPSC ची जाहिरात आली. अर्ज भरला. वडील म्हणाले तू कलेक्टर होणार, ही नोकरी सोडायची, समाजासाठी इमानदारीने काम करायचे. पत्नीलाही सांगायचे. मी म्हणालो, परीक्षा होईल, मुलाखत होईल, पास होऊन नंबर लागला तर. त्यावर म्हणाले, होशील. मी अभ्यास केला आणि मी पहिल्या प्रयत्नातच उपजिल्हाधिकारी झालो.1982 ची बॅच होती. MPSC, स्पर्धा परीक्षा, काय व कशा, हे काहीही माहीत नसताना, कलेक्टर हो, समाजासाठी काम कर ! हे शहाणपण माझ्या न शिकलेल्या वडिलांनी, मला दिले. त्यांच्या इच्छाशक्तीच्या बळावर मी उपजिल्हाधिकारी झालो, जिल्हाधिकारी झालो, म्हणून ते माझे रोल मॉडेल आहेत. त्यांनी मार्ग सांगितला, म्हणून हे घडले.

6. माझे यश त्यांना पाहता आले नाही. मृत्यू 23 सप्टेंबर 1981 ला झाला. MPSC चा अंतिम निकाल नंतर 1982 मध्ये आला. त्यांनी जी अपेक्षा व्यक्त केली ती पूर्ण करण्यासाठी, उपजिल्हाधिकारी या पदावर सरकारी सेवेत रुजू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून तर सेवनिवृत्तीच्या शेवटच्या दिवसापर्यंत, स्वाभिमान व सचोटीने होईल तेवढे समाजातील शोषित वंचितासाठी काम करण्याचा प्रयत्न केला. चांगल्या साठी करीत असताना, कार्यवाहीला तोंड दिले, 29 वर्षात 21 बदल्या झाल्यात . समाज हिताचे काम करतांना, माझेवर अन्याय झाला हे माहीत असूनही समाजातील नेते , उच्च पदस्थ, प्रभावशाली व्यक्ती, कुणीही मदतीला आले नाहीत. माझी तक्रार नाही . अशावेळी, माझी पत्नी व मुलींनी मला खूप आधार दिला व वडीलांच्या अपेक्षांची नेहमीच आठवण करून देत राहिल्या. मी बिघडू नये ह्याची काळजी-देखरेख माझी पत्नी रेखा हिने घेतली. माझं पुस्तक, “आणखी, एक पाऊल” हे मी पत्नी रेखा व मुलींना अर्पण केले. कुटुंबाच्या नीतिमत्तेच्या बळात अफाट शक्ति असते. हे मी अनुभवले. जवळ संपत्ती नसते पण स्वाभिमान व समाधानाचे आणि सन्मानाचे जगणे जरूर असते. ही शाश्वत नीतिमूल्ये आहेत. परंतु हल्ली ह्याचे कोणाला फार देणेघेणे नाही. सत्ता-संपत्ती प्राप्तीच्या शर्यतीत, नीतिमूल्यांचा ऱ्हास झपाट्याने होवू लागला आहे. यामुळेही संविधानाला धोका निर्माण झाला आहे. संविधान सभेतील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दि. 25 नोव्हेंबर 1949 चे भाषण व त्यातील इशारे लक्षात घेण्याची गरज आहे.

7. सर्व कळत असताना सुद्धा, पदाची, बदलीची वा सत्ताधाऱ्यांच्या नाराजीची चिंता न करता, मी माझ्या सीईओ या पदाचा व अधिकाराचा हिंमतीने वापर करून, 2005 मध्ये नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळांमधून “भारताच्या संविधानाच्या प्रास्ताविकेचे” रोज वाचन सुरू केले. 26 नोव्हेंबरला संविधान दिवस, नागपूरला 2005 मध्ये साजरा केला. या दोन्ही संकल्पना, देशात सर्वप्रथम 2005 मध्ये नागपूर येथे राबविल्यात. संविधान ओळख हा उपक्रम देशभर व्हावा यासाठी प्रयत्न केलेत. आता, 2015 पासून देशभर संविधान दिवस 26 नोव्हेंबर ला, दरवर्षी साजरा केला जातो, प्रास्ताविका म्हटली जाते. यामुळे सुद्धा काही नाराज झालेत. चांगले घडणे आणि ते ही आमच्या सारख्याकडून घडणे काहींना पसंद नसते. असे होत असते, आपण मात्र चांगलं व्हावं यासाठीचे प्रयत्न व मार्ग सोडू नये. सनदी अधिकारी म्हणून, देशाच्या संविधान जागृतीचे अभियान सुरू करण्याची संधी मिळाली, ह्याचा आनंद आहे. यामुळे, समाजात थोडी ओळख निर्माण झाली. बाबासाहेबांचा संदेश आणि वडिलांच्या अपेक्षेनुसार, प्रशासकीय सेवा म्हणजेच समाजसेवा समजून काम केले. हे खूप चांगलं क्षेत्र आहे आणि संधी ही आहे, देशासाठी चांगलं योगदान देण्याची. माझी दोन पुस्तकं आहेत, “आणखी, एक पाऊल” व ” प्रशासनातील समाजशास्त्र”, यात अनुभव लिहिले आहेत. समाजात अनेक अधिकारी घडले व घडत आहेत, प्रतिकुलतेत यश मिळवीत आहेत, त्यांचेवर मोठी जबाबदारी आहे.

8. दरवर्षी, दर दिवशी वडिलांची आठवण होते. यापूर्वी, त्यांच्या मृत्यूदिनी काही लिहिले नाही. कठीण परिस्थिती, अभाव, दारिद्रय, प्रतिकुलता असताना, पोरा-पोरींनी साहेब व्हावे व समाजासाठी इमानदारीने काम करण्याचा मार्ग सांगणारे, आई-वडील हेच खरे आपले रोल मॉडेल आहेत. ते अपार कष्ट करतात, मुलामुलींनी शिक्षण घेऊन, साहेब व्हावे, स्वतःचे व इतरांचे जीवन सुखी करावे, ही अपेक्षा बाळगतात. दुसरे कोणी आपले रोल मॉडेल कसे होतील? ज्या संविधानाने संधी व सन्मान दिला, त्या संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समस्त भारतीयांचे प्रेरणा स्त्रोत आहेत. त्यांचेशी बेईमानी नाही करता येत, करूही नये. पण हा सल्ला हल्ली आजच्या बऱ्याचशा सनदी अधिकारी यांना नकोसा वाटतो. पदांवर नवीन अधिकारी रुजू झाले की त्यांचे खूप कौतुक केले जाते. काही हरकत नाही, केले पाहिजे .परंतु, हे सगळे सनदी अधिकारी इमानदार व कर्तृत्ववान आहेत तर मग भ्रष्टाचार , शोषण , अन्याय अत्याचार का थांबत नाही ? सामान्य माणसाचे रोजच्या जगण्याचे प्रश्न का सुटत नाहीत? संविधानिक मूल्यांवर आधारित काम निःपक्षपणे का होत नाही? आतातर, असे प्रश्न उपस्थित करणे सुद्धा कोणास पसंद नाही. अलीकडे तर अशी फॅशन झाली आहे की इमानदारासही बेईमान व बेईमानासही इमानदार म्हणायचे.

9. सनदी अधिकाऱ्यांचे संविधानात्मक उत्तरदायित्व लोकांप्रति आहे.तेव्हा, सनदी अधिकारी यांचे सोशल ऑडिट करण्याची गरज आहे. येथे काही शब्दांचा सारखा उल्लेख यासाठी करतो, कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन व कार्य हेच सांगते. विद्या, शील व स्वाभिमान हे बाबासाहेबांचे दैवत तेच आमचेही दैवत असले पाहिजे. आम्ही मनापासून स्वीकारले. काम करताना चुकलो असेन पण स्वतःच्या स्वार्थासाठी वा व्यक्तिगत फायद्यासाठी चुकलो नाही. प्रशासनात वेगवेगळ्या पदांवर काम केले, अनुभवातून शिकत गेलो. जशी जशी सेवेत वर्षांची भर पडत गेली, तेव्हा कळायला लागायचे की हे ही करायला पाहिजे, लक्ष दिले पाहिजे, तसतसे करण्याचा प्रयत्न केला . पण त्या पदावर कार्यकाळ अल्प मिळाला. अशातच सेवानिवृत्ती जवळ आली आणि फेब्रुवारी 2012 ला सेवानिवृत्त झालो. बरेचसे राहून गेले. खरं तर सुरुवातीपासूनच अधिकाऱ्यांचे सामाजीकरण झाले पाहिजे. सामाजिक न्यायाचे प्रशासन कसे करायचे हे सुरुवातीलाच समजले तर खूप काही होऊ शकते. खरं तर, आम्ही, आमचे वेगळेपण कृतीने दाखवून दिले पाहिजे, फक्त रुटीन काम करून भागणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बुध्द यांचे विचार सांगणाऱ्या सनदी अधिकारी आणि इतर सर्व यांचे स्वतःचे वर्तन व काम सामाजिक न्यायाचे दिसले पाहिजे, तसा अनुभव सर्वसामान्य माणसाला आला पाहिजे. खूप फरक पडेल . आपण सगळेच भारतीय संविधानाचे लाभार्थी आहोत. तेव्हा, संविधानमूल्ये व संविधान निर्माता, “बाबासाहेब”, यांचे विचार व संदेशानुसार ,आम्ही वागलो पाहिजे. त्यासाठी, संविधान समजून घेणे महत्वाचे आहे. मोठ्या पगाराची ONGC ची नोकरी सोड व कलेक्टर हो, हा सन्मार्ग 1980 मध्ये माझे वडिलांनी मला दाखविला म्हणून संविधान ओळख हा उपक्रम सुरू करण्याची संधी मला मिळाली.

वडीलास विनम्र अभिवादन.

✒️लेखक:-इ. झेड. खोब्रागडे,भाप्रसे (नि.)
मो:-9923756900
दि. 23 सप्टेंबर, 2020