संतांनी आपल्याला काय दिले ?

41

 माझा मराठाचे बोलू कौतुके

परी अमृतातेही पैजा जिंके
ऐसी अक्षरे रसिके मेळविन||

महाराष्ट्रातील संतांनी विश्वरूप देवाला गवसणी घातली आणि जोडीला मराठी भाषेचे कौतुक ही सांगितले आहे.’ महाराष्ट्राचा मान व मातृभाषेची शान’ वाढविण्याचे काम संतांनी आणि संत साहित्याने केले आहे. ज्ञानेश्वरी लिहिणारे संत ज्ञानेश्वर यांनी भागवत धर्माचा पाया घातला व त्याचेच रुपांतर वारकरी पंथात झाले. त्यामुळे हा पंथ सर्वसामान्य लोकांना खूपच भावला. ज्ञानेश्वरां- पाठोपाठ नामदेव ,एकनाथ, तुकाराम, गोराकुंभार, रामदास या संतांनी आपल्या लेखणीतून समाजाला उपदेश दिला पण ‘डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी’ असे म्हणत श्री संत जनाबाई,’ मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सुर्याशी’ असे उपदेशणारी मुक्ताई, संत सखुबाई, कान्होपात्रा यांनी ही वारकरी पंथांचा झेंडा पंढरपुरात नेऊन रोवला. संतांचे उपकार मज निरंतर जागवीतो.

म्हणूनच संत तुकाराम संतांची ओळख करून देताना सांगतात ‘तुका म्हणे तोचि संत सोशी जगाचे आघात ‘या न्यायाने जगाच्या उद्धारासाठी समाजातील अनिष्ट चालीरीती मोडताना प्रसंगी त्यांचे आघात सोसूनही आपल्या कार्यापासून हटत नाहीत. म्हणूनच संत चोखोबा पासून तुकोबा पर्यंत नि राजाराममोहन रॉय पासून महात्मा फुले पर्यंत, शिवाजीराजांपासून शाहू आंबेडकरांपर्यंत तसेच सानेगुरुजीपासून बाबा आमटे पर्यंत, संत जनाबाई पासून सर्व संतच.’ ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा’ असे म्हणत चोखामेळा यांनी सर्वप्रथम जातीभेदातील विषमतेस आव्हान दिले.

‘परमेश्वर सर्वांचा मायबाप असून स्त्री आणि पुरुष याच दोन जाती आणि मानवता हाच खरा धर्म’ त्यामुळे देव रंग व जात न पाहता अंतःकरणातील प्रेम पाहतो. म्हणूनच पंढरीचा विठ्ठल विठू महार होतो. ‘दळिता कांडिता’ संत जनाबाई विठ्ठलाला आळवते तेव्हा विठ्ठल तिची सर्व मदत करतो. आपल्या रेशमी शेल्याने तिचा घाम पुसतो.’ हे विश्वची माझे घर, आत आत्मा परमेश्वर किंबहुना चराचर आपणचि झाला’ या ओवीतून सगळी पृथ्वी आपले घर असल्यामुळे या घरात राहणारी माणसे वेगवेगळ्या जाती-धर्माची कशी असतील असा प्रश्न ज्ञानोबा विचारतात. दिवसभर खराट्याने गाव स्वच्छ करून रात्री देवळात दगडाचे टाळ करून कीर्तन करत लोकांची मने साफ करत. संत गाडगेबाबा म्हणतात,” रक्त एक मांस एक, एक देह एकसारखेच दात मग कुठून आणली माणसाने भिन्न जात’. ‘तीर्थे धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी’ असे म्हणत सर्व पुरुषांना बरोबर स्त्रियांनासुद्धा संतांनी समतेच्या प्रवासात सामावून घेतले. आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते कार्य करत आहेत ते संतांनी सोळाव्या शतकात केले.’ ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुनी म्हणती साधू’ या अभंगातून भोंदुंचे सोंग उघडे पाडणारे तुकोबा भगव्या वस्त्रांखाली दडलेले ठग पकडून देतात. समाजातील अनिष्ट रूढी, प्रथा, कल्पना यांच्यावर उपदेशात्मक कोरडे ओढतात.

म्हणूनच संतांचे मानवजातीवर असंख्य उपकार आहेत.’ वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ,पक्षीही सुस्वरे आळविती’ असे म्हणत पर्यावरण वाचविण्याचा संदेश देणाऱ्या तुकाराम महाराजांना त्या काळातील पर्यावरणतज्ञ म्हणता येईल पण सिमेंट काँक्रिटच्या जंगलात राहणारे विज्ञानाची कास धरून रोज नवी शिखरे पादाक्रांत करणाऱ्या आम्हांस संतांचे निसर्गाशी असलेले नाते जपणे कसे पटणार? पण दृष्टीच्या पलीकडील विज्ञान ज्ञानेश्वरांनी बाराशेच्या काळात सांगितले. ‘भक्ती त्याची ऐसी, पर्जन्याची सुटीका जैसी, धरा वाचुनी अनारसी गतीची नेणे’ याचाच अर्थ पावसाची धार आकाशातून सुटली की ती सूर्यावर किंवा चंद्रावर न जाता थेट पृथ्वीवर येते, कारण तिला गती देण्याचे काम धरती करते. त्या थेंबांना आकर्षित करण्याची शक्ती फक्त पृथ्वीकडेच आहे म्हणजे पृथ्वीकडे गुरुत्वाकर्षण शक्ती आहे हे ज्ञानोबांनी सांगितले.

आज सर्वांनी संतवाड्मयामध्ये विज्ञानाचा ठेवा वेचून काढावा. जे भलेभले संशोधक आता संशोधन करत आहेत, तेथे संतानी पूर्वीच लिहून ठेवले आहे, त्यामुळे संतांबद्दल एवढेच म्हणावेसे वाटते,’ काय द्यावे त्याची व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा’

✒️लेखिका:-सौ.भारती सावंत
                        मुंबई
            मो:-9653445835

▪️संकलन:-प्रा.रावसाहेब राशिनकर
अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
मो:-9404322931