मोदींच्या मदतीला धावून जाणारी भाजपची बी टीम राष्ट्रवादी काॅंग्रेस

13

राज्यसभेत नुक्तेच पारित झालेल्या शेतकरी विरोधी तीन बीलां नंतर मोदी सरकारवर अनेक बाजूंनी टिका होत आहे. ही बिले पारित होण्यासाठी केंद्रात अनेक वर्षे कृषी मंत्री राहिलेले राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार व राष्ट्रवादी पक्षाने राज्यसभेत गैरहजर राहुन दिलेल्या अप्रत्यक्ष सहकार्या बद्दलही टीका होत आहे. आणि राष्ट्रवादी ने भाजपाला असा पाठिंबा देण्याची ही काही पहिलीच घटना नाही. असे सहकार्य राष्ट्रवादी पक्षाने मोदींना ट्रिपल तलाक, CAA, NRC बिलांच्या वेळेस, कलम 370 हटवण्याच्या वेळेस मोदी सरकारला अशी अनेक वेळा अप्रत्यक्ष मदत केलेली आहे. यावेळी त्या बदल्यात राज्यसभेत पुरेसे संख्या बळ नसतानाही राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार वंदना चव्हाण यांना उपसभापती पदाचे बक्षिस मिळाले आहे. परंतू त्याची चर्चा मात्र माध्यमांतून अनुल्लेखाने दाबून टाकण्यात आली आहे.

संसदीय लोकशाही मध्ये लढाऊ विरोधी पक्षाचे अस्तित्व आणि त्याने बजावण्याच्या जनवादी भूमिका याला खूप कळीचे महत्त्व असते. सरकारचा कारभार आणि धोरणांच्या परखड चिकित्सा करणारा विरोधी पक्ष नसेल तर संसदीय लोकशाही पोकळ व निर्जीव बनते. निवडून आलेल्या सरकारलाही मनमानी करण्याचा अधिकार नाही. ते जनतेला उत्तरदायी आहे. आणि सरकारला जनतेच्या वतीने उत्तर मागण्याची जबाबदारी विरोधी पक्षाची आहे.

शरद पवारांनी लोकसभेत सरकारला अडचणीत पकडणारा युक्तिवाद किंवा सरकारला पराभूत करणारे फ्लोअर मॅनेजमेंट शक्य असूनही कधी केले नाही. सत्ताधाऱ्यांना धडकी भरवणारे, संपूर्ण देशाला दिशा दर्शक ठरेल असे गंभिर चिंतन मांडणारे संसदेला दणाणून सोडणारे एकही अभ्यासपूर्ण भाषण शरद पवारांच्या नावावर नाही. रोखठोक निःसंदिग्ध भूमिका घेण्यापेक्षा सतत नफा तोट्यांचा हिशोब मांडत दोन दगडावर पाय ठेवून लाभ मिळेल तिथे सरकण्याची संधीसाधू भूमिका म्हणजे मुत्सद्दीपणा नव्हे तर ती तत्त्वशून्य सौदेबाजी ठरते व लोकशाही मध्ये याला नैतीक भ्रष्टाचार म्हणुनच संबोधीत केले जाते.

डॉ. लोहियांचे एक प्रसिद्ध वचन आहे ” सडकें अगर खामोश हो गयी तो संसद आवारा बन जाती है।” संसदीय लोकशाहीत रस्त्यावरच्या आंदोलनाला स्थान नसते असे मानणारी दुरुस्त नादुरुस्त वादी भूमिका वंचित बहुजनांना निर्जीव, निष्क्रिय, मुके समूह बनवते आणि निवडून आलेल्या सरकारला निरंकुश हुकूमशहा. सरकारला संसदेत व रस्त्यावर जाब विचारणे विरोधी पक्षाची जबाबदारी आहे. परंतू सत्ता नसेल तर ” जल बिन मछली ” सारखी ज्यांची अवस्था होते ते लढाऊ विरोधी पक्ष बनू शकत नाहीत.

आज आपल्या देशाची संसदीय लोकशाही कठिण संकटातून जात आहे आणि याला जबाबदार जेवढे आरएसएस, मोदी व भाजपा आहेत तेवढेच त्यांच्या समोर मान तुकवणारे, शरणागती पत्करणारे स्वतःला देशातील प्रमुख राजकीय पक्ष म्हणवून घेणाऱे काँग्रेस, राष्ट्रवादी हे पक्ष आणि त्यांचे नेतृत्व आहे. संसदीय लोकशाहीचे अवमूल्यन करून यांनी तिला बार्गेनिंग करणारा खरेदी विक्रीचा बाजार बनवला आहे.

शरद पवार हे देशातील काही मोजक्या परंतु प्रमुख नेत्यांपैकी एक मानले जातात. अतिशय चाणाक्ष आणि मुत्सद्दी राजकारणी मानले जातात. हे गुण राजकारणात महत्त्वाचे असले तरी त्याला प्रामाणिकता, पारदर्शकता आणि जनहित व देशहिताच्या बांधिलकीची जोड नसेल तर कितीही ताकदवान आणि चतुर नेता जनसामान्यांच्या व देशाच्यासाठी बिनकामाचा असतो हे वारंवार शरद पवार हे मोदी व भाजपा बरोबर करत असलेल्या तत्त्वशून्य तडजोडी वरून सिद्ध होत आहे. स्वतः, स्वतःचे नातेवाईक व स्वतःचे घराणे केंद्र स्थानी ठेवून केलेले कोणतीही वैचारिक वा सामाजिक बांधिलकी नसलेले नितीशून्य, जन विरोधी राजकारण हे आपल्या राजकारणाचे मॉडेल बनले आहे. या मॉडेल मध्ये जनकेंद्री, कल्याणकारी, लोकहिताच्या कारभारासाठी सत्ता असे समीकरण नसून भ्रष्टाचाराच्या माध्यमातून प्रचंड पैसा मिळवायचा आणि या पैशाच्या जोरावर व सामाजिक वर्चस्वाच्या भांडवलावर निवडणुका जिंकायच्या, आकडे कमी असतील तर घोडे बाजारा प्रमाणे लोकप्रतिनिधींची खरेदी विक्री करून बहुमत मिळवायचे, सत्ता मिळवायची हे या राजकारणाचे सूत्र बनलेले आहे. आणि शरद पवार हे या मॉडेल चे एक उदाहरण आहेत.

शरद पवारांच्या नावाने असेच दुसरे एक माॅडेल प्रसिध्द आहे ते म्हणजे बेरजेचे राजकारण व ही जी बेरीज आहे ती स्वपक्षातील नवख्या कार्यकर्त्यांना घडवायची नसून इतर पक्षातील घडवलेल्या चांगल्या व निवडणुक जिंकण्याचे मेरीट असलेल्या कार्यकर्त्यांना साम-दाम-दंड-भेद वापरुन फोडायचे व आपल्या पक्षात आणून निवडणुक जिंकायचे किंवा दुसऱ्या पक्षातील नेत्यांना उपकृत करून त्यांचा पक्षच वापरण्याचे तंत्र होय. शरद पवारांच्या या वृत्तीने डाव्या समाजवादी व लोकशाहीवादी अनेक पक्षांना खिळखिळे करुन पक्षच संपवण्याचे पाप केले आहे म्हणुन हे पॅटर्न सुध्दा नैतीकता गहाण ठेवुन धनतंत्राने केलेली जनतंत्राची हत्याच असते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही

भ्रष्ट आणि सौदेबाज माणसे लढाऊ राजकारण करुच शकत नाहीत त्यांना सतत सत्ताधाऱ्यांना भिऊन वागावे लागते कारण त्यांच्या मुसक्या सरकारच्या हातात असतात. परंतू त्यांना संपूर्ण नागडे पाडणे सरकारच्या फायद्याचे नसते त्यामुळे जनतेची दिशाभूल करण्यासाठी अधूनमधून उंदीर मांजराचा खेळ दोघेही खेळत रहातात. तू मारल्या सारखे कर मी रडल्यासारखे करतो ह्याच नाटकाचा भाग म्हणून ईडीच्या नोटीसा येत रहातात आणि राज्य सभेत सभात्याग करुन बील पास करण्यास सहकार्य केल्या नंतरही सरकारवर टीका व उपोषणाची नाटके करावी लागतात. महाराष्ट्रातील जनतेला मोदींच्या या बी टीमची खरी ओळख पटवून देण्याचे काम वंचित बहुजन आघाडीला करावे लागेल.

✒️लेखिका:-श्रीमती.रेखाताई ठाकूर
( सामाजिक कार्यकर्त्या, वंचित बहुजन आघाडी च्या महिला प्रदेशाध्यक्षा)
मो-98195 84554

संकलन:-नवनाथ पौळ
(केज,पुरोगामी संदेश नेटवर्क, बीड )
मो-8080942185