नेपोटिझम

32

✒️लेखक : राहुल बोर्डे,पुणे
मो:;९८२२९६६५२५

अभिनेता ऋत्विक रोशनचा अभिनय असलेल्या सुपर ३० या चित्रपटात एक संवाद आहे की “राजा का बेटा राजा नही बनेगा बल्की राजा वही बनेगा जो हकदार होगा”. हा संवाद आठवण्याचे कारण म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीत सध्या नेपोटीझम या विषयावरून सुरू झालेला वाद. चित्रपटसृष्टीत नेपोटीझम शब्दावरून सुरू झालेल्या वादाचा प्रथम दर्शनी अर्थ “वंशवाद” असा निघताना दिसतो. पण नेपोटीझमचा अर्थ फक्त वंशवादापर्यंतच मर्यादित नाहीये. नेपोटीझमचे इतरही अनेक अर्थ आहेत जसे की पक्षपातीपणा, स्वतःच्या अस्तित्वासाठीचा संघर्ष, हिंदी मध्ये सांगायचे झाले तर भाई-भतिजा वाद. तसेच नेपोटीझम हे काही फक्त चित्रपटसृष्टी पर्यंतच मर्यादित नाहीये. खरे तर असे एखादेच क्षेत्र असेल ज्या क्षेत्राचा नेपोटीझमशी संबंध येत नसेल. नेपोटीझमला चांगली आणि वाईट अशा दोन्हीही किनार आहेत. पण या दोन्ही किनार सविस्तरपणे समजून घेणे गरजेचे आहे. आणि दोन्ही किनार समजून घ्यायच्या असतील तर आपल्याला वर्तमानकाळा सोबतच भूतकाळात देखील डोकावणे गरजेचे आहे.

साधारणतः १०० वर्ष आधीपर्यंत भारतीय समाज व्यवस्थेत कोणी कोणते काम करायचे याचे काही अलिखित नियम होते. कोणत्याही गावात एखादे कुटुंब जे काम करायचे पुढे त्यांच्या पिढ्यान पिढ्या देखील तेच काम करत असत. समाज व्यवस्थेच्या चाकोरीबाहेर जाऊन काही वेगळे काम करण्याचा प्रयत्न फार कमी वेळेस व्हायचा आणि असा प्रयत्न झालाच तरीही तशी संधी मिळेलच याची शाश्वती नसायची. यामुळे कोणत्याही चांगल्या किंवा वाईट स्पर्धेचा फारसा कधी प्रश्न उद्भवत नसे. राजेशाही व्यवस्थेत राजाचाच मुलगा राजा होत असे. राजघराण्या व्यतिरिक्त इतर कोणाला राजा बनता येत नसे. वंश परंपरेनुसार जरी कुटुंबात मुला ऐवजी मुलगी जन्माला आली तर एखाद्या मुलाला दत्तक घेऊन त्याला गादीवर बसवल्या जात. पण गादीवर बसवण्या आधी त्याला राजघराण्याचे नाव दिले जायचे. याच पद्धतीने कोणत्याही कुटुंबाचे कार्य त्याच्या पुढच्या पिढीला हस्तांतरित होत असे. ही समाजव्यवस्था म्हणजे एक प्रकारचा अलिखित पण समाजमान्य वंशवादच होता.

पुढे काळ बदलला. राजेशाही संपली आणि लोकशाही आली. काळातील बदल आणि विज्ञानाच्या प्रगतीनुसार नवनवीन कार्यक्षेत्रे निर्माण होऊ लागली. प्रत्येकाला स्वतःच्या आवडीचे क्षेत्र निवडण्याची संधी उपलब्ध होऊ लागली. पिढ्यान पिढ्या एकाच चाकोरीबद्ध पद्धतीने काम करण्याची विचारसरणी मागे पडू लागली. यामुळे कोणत्याही क्षेत्रातील एखाद्या ठराविक व्यक्तीची किंवा कुटुंबाची मक्तेदारी संपुष्टात येऊ लागली. प्रत्येक क्षेत्रात यामुळे चांगली आणि वाईट अशा दोन्ही प्रकारच्या स्पर्धा निर्माण होऊ लागल्या. प्रत्येक क्षेत्रातील स्पर्धेनुसार चित्रपटसृष्टीत देखील काळानुसार ही स्पर्धा निर्माण होणे स्वाभाविक होते. काळानुसार होणारे हे बदल चित्रपटसृष्टीने देखील स्वीकारायला हवे होते पण त्याचा स्वीकार होताना दिसत नाहीये म्हणून नेपोटीझमचा वाद सध्या एवढा गाजतोय. आपल्या आवडीनुसार कार्यक्षेत्र निवडण्याचे स्वातंत्र्य मिळाल्यामुळे कोणत्याही क्षेत्रात स्थान मिळवण्यासाठी निर्माण होणारी स्पर्धा चित्रपटसृष्टीने देखील पारदर्शक पद्धतीने स्वीकारणे अपेक्षित होते.

जेव्हा कोणत्याही क्षेत्रात अशी स्पर्धा निर्माण होऊ लागते तेव्हा मिळणारी संधी आणि स्पर्धेचा अंतिम निकाल याचे निकष नैतिक दृष्ट्या फक्त आणि फक्त गुणवत्ता असणे अपेक्षित आहे. पण बरेच वेळेस अशा स्पर्धेत नैतिकता बाजूला ठेवून आणि गुणवत्ता डावलून आपल्या जवळच्या व्यक्तीला संधी देण्याचा प्रयत्न केला जातो किंवा गुणवत्ता असणार्‍या व्यक्तीच्या मार्गात अडथळे निर्माण करण्याचा, डावलण्याचा प्रयत्न केला जातो. यालाच नेपोटीझम असे म्हणतात. इतर कोणत्याही क्षेत्रापेक्षा चित्रपटसृष्टीतील नेपोटीझम ठळकपणे जाणवण्याचे कारण म्हणजे या क्षेत्राचा बाहेरून दिसणारा झगमगाट. या क्षेत्रात संधी आणि यश मिळाले तर मिळणारा पैसा आणि प्रसिद्धी हा डोळे दिपावून टाकणारा असतो.

जसे कोणतेही पालक किंवा कुटुंब आपल्या पुढील पिढीसाठी चांगली स्वप्न बघतात याच नियमानुसार चित्रपट सृष्टीतील यश मिळवलेल्या प्रस्थापितांनी आपल्या पुढील पिढीसाठी स्वप्न बघण्यात गैर काहीच नाही. तसेच त्यांना संधी मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यातही काही चूक नाही. पण आपल्या पुढील पिढीला ही संधी निर्माण करून देताना आपण इतरांच्या संधीचे दरवाजे बंद करत आहोत का? आपल्या पुढील पिढीला याच क्षेत्रामध्ये रस आहे का? आपली पुढील पिढी संधी मिळण्याएवढी गुणवत्ता अंगी बाळगते का? असे काही नैतिक प्रश्न स्वतःला विचारणे गरजेचे आहे. या प्रश्नांच्या योग्य उत्तरावर नेपोटीझमचा चांगला किंवा वाईट अर्थ अवलंबून आहे. आपल्या पुढील पिढीला किंवा जवळच्या व्यक्तीला संधी मिळवून देण्यासाठी होणारे हे प्रयत्न मग ते चित्रपटसृष्टीत, राजकारणात किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात जर नैतिकतेच्या कसोटीवर टिकणारे असतील, पक्षपातीपणा करणारे नसतील तर नेपोटिझमला आपण सरसकट वाईट म्हणायचे का? तसेच ज्या व्यक्तीस त्याच्या आधीच्या पिढीकडून संधी मिळाली आहे तो व्यक्ती त्या क्षेत्रामध्ये पुढे जर स्वतःच्या गुणवत्तेवर टिकून असेल तर त्याचे यश सतत त्याच्या आधीच्या पिढी सोबत जोडून बघायचे का? आणि यामुळेच मला असे वाटते की, नेपोटीझमला चांगले किंवा वाईट ठरविण्यापूर्वी, त्या विशिष्ट परिस्थितीच्या नैतिकतेचे आधी विश्लेषण व्हावे आणि मगच समर्थन किंवा विरोध व्हावा.

सांगायचा मुद्दा एवढाच की “राजा का बेटा भी राजा बन सकता है अगर वाे सही मे राजा बनने का हकदार हो तो”.