समाज द्रॊही पुढा-यांपासुन सर्व समाजाने सावध रहायला हवे

17

धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा पुढे करून नुकतेच वंबआ ची कुस बदलून भाजपाच्या कुशीत शिरून आमदारकीची माळ गळ्यात घेतलेले गॊपीचंद पडवळकर हे पंढरपूर येथे ढॊल बजाऒ आंदॊलन छेडणार आहेत हे वाचून अजिबात आश्चर्य वाटले नाही.

कारण समाज खड्ड्यात गेला तरी चालेल पण, पक्षाच्या खाल्ल्या मिठाला जागले पाहिजे ही सर्व पक्षांकडून उपकृत झालेल्या सर्व समाजातील पुढा-यांमध्ये बळावत चाललेली लाचारी वृत्ती आता सर्व सामान्य जनतेला चांगली ठाऊक झाली आहे.
सर्व राजकीय पक्षांकडून असे मॊहरे वापरण्याची एक कुप्रथाच पडली आहे.
मराठा आणि धनगर समाज आरक्षणाच्या मागणीला आता त्यांच्याकडून फुंकर घातली जात असली तरी धनगर समाजाचा आरक्षणाचा निर्णय फडणवीस सरकारच्या काळात का झाला नाही ? फडणवीस सरकारने धनगर समाजाला आश्र्वासन देवून ही विश्वासघात का केला याचा विचार आता ‘ढॊल बजाऒ…’ आंदॊलन छेडण्यापुर्वी पडवळकरांनी करायला हवा हॊता.

सत्तेसाठी भोळ्या भाबड्या बहुजन समाजातील पुढा-यांना पदाची लालच दाखवून अख्या समाजाला फरफटत नेणा-यांनी आजपर्यंत कुठल्या समाजासाठी काय केले याचा हिशोब मांडायची वेळ आली आहे.
गेले पाच वर्षात भाजप सरकार सत्तेत असताना देवेन्द्र फडणवीस यांनी पहिल्या कॅबिनेट मिटिंग मध्ये आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले याची माहिती आधी पडळकरांनी त्यांच्याकडून घ्यायला हवी होती. तसेच आरेवाडीच्या बिरोबाची शपथ घेऊन समाजासाठी एक हजार कोटींची तरतूद आणि मंदिरासाठी 12 कोटींचा निधीची घोषणा केली गेली होती. त्याचे काय झाले हे ही विचारून घ्यायला हवे होते.

अगदी निवडणुकीच्या तोंडावर आरक्षणाचे गाजर दाखवून मराठ्यांच्या तॊंडाला पाने पुसली गेली यावरून कुणीही धडा घेतलेला दिसत नाही हे पुन्हा एकवार सिद्ध झाले आहे.*
*मराठ्यांना आरक्षण देण्याची जर प्रामाणिक इच्छा असती तर, राज्यात आणि केंद्रात असलेल्या आपल्याच पक्षाच्या हुकमी सत्तेचा वापर करून न्यायालयीन पटलावर कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेतली गेली असती.आणि आज पुन्हा एकदा एक मराठा ! लाख मराठा!! म्हणून समाजबांधवांना आंदोलनासाठी रस्त्यावर येण्याची गरज पडली नसती याचा सर्वच समाजातील जनतेने विशेषत: पुढा-यांनी अंतर्मुख होऊन विचार केले पाहिजे.

आपला भक्कम महाल बांधण्यासाठी इतरांच्या झाडांची कत्तल करणा-यांच्या हातातील कु-हाडी चा दांडा बनणे आता बहुजन समाजाने बंद केले पाहिजे. इतरांच्या राजकीय लाभासाठी स्वतः त्यांच्या पालखीचे भोई होणे टाळले पाहिजे. आपल्या अल्प लाभासाठी समाजाला वेठीस धरण्याचा उद्योग पुढा-यांनी आता बंद करायला हवा, कारण कुठलाही समाज आता अडाणी राहिलेला नाही हे ध्यानात ठेवावे इतकेच.

✒️लेखक:-विठ्ठलराव वठारे
अध्यक्ष,सॊलापुर जिल्हा वृत्तपत्र
लेखक मंच, सोलापूर