✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.29सप्टेंबर):-एफएसएसएआय अर्थात भारतीय खाद्य सुरक्षा व मानक प्राधिकरण यांनी जारी केलेल्या नवीन निर्णयानुसार, स्थानिक मिठाईच्या दुकानात मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा आणण्यासाठी केंद्र सरकाने नवीन नियम आणण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार 1 ऑक्टोंबर 2020 पासून स्थानिक मिठाईच्या दुकानांनाही विक्रीसाठी ठेवलेल्या मिठाईसाठी मुदतबाह्य तारीख प्रदर्शित करणे आवश्यक आहे, अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे अन्न व औषध प्रशासन चंद्रपूरचे सहायक आयुक्त नितीन मोहिते यांनी दिली आहे.

आतापर्यंत पॅकेटबंद खाद्यपदार्थ अथवा मिष्ठान्नांना मुदतबाह्य तारीख नमूद करणे बंधनकारक होते. मात्र अलीकडे खुल्या पध्दतीने विक्री होणाऱ्या मिष्ठान्नांतून बाधा होत असल्याचे प्रकार उजेडात आल्याने शासनाने आता बाजारात खुल्या पध्दतीने विक्री होणाऱ्या मिष्ठान्नांच्या स्ट्रेवर मुदतबाह्य तारीख प्रकर्षाने नमूद करणे बंधनकारक केले आहे.

विनापॅकिंग असणारा पदार्थ कधी बनविला आहे किंवा बनविल्यापासून तो किती दिवस खाण्यासाठी उपयुक्त आहे हे ग्राहकांना माहिती नसते. ट्रेमधील अन्न पदार्थ, विक्रीस ठेवलेल्या उघड्यावर ठेवलेली मिठाई, शिळे अन्नपदार्थ खाल्ल्याने विषबाधा होण्याचे प्रकार घडू शकतात. त्यामुळे मुदत संपत असल्याची तारीख लिहिल्यास खराब मिठाईची विक्री होणार नाही.

जिल्हयातील मिठाई उत्पादक व मिठाई विक्रेते यांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे,असे आवाहन अन्न व औषध प्रशासन चंद्रपूरचे सहायक आयुक्त नितीन मोहिते यांनी केले आहे.

खान्देश, चंद्रपूर, महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक , स्वास्थ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED