उत्तर प्रदेशात महिलांवर वाढत असलेल्या हिंसाचाराबद्दल अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचा तीव्र संताप

25

🔺हाथरसमधील दलित युवतीच्या सामूहिक बलात्कार व हत्येचे निर्घृण कृत्य करणाऱ्यांच्या विरोधात जास्तीत जास्त कडक कारवाई करण्याची मागणी

✒️मुंबई (पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.30सप्टेंबर):-अखिल भारतीय जनवादी महिला संघटना उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील १९ वर्षांच्या दलित युवतीवर झालेल्या बलात्काराचा तीव्र निषेध करीत आहे, ज्याच्यामुळे अंतिमतः तिला आपला जीव गमवावा लागला. १४ सप्टेंबर रोजी, ती शेतात सरपण आणायला गेलेली असता तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला व तिला गळा दाबून मारून टाकण्याचा प्रयत्न केला गेला. बलात्काऱ्यांनी तिच्यावर केलेल्या पाशवी हल्ल्यामध्ये झालेल्या भयानक जखमांमुळे शेवटी तिला संफदरजंग रुग्णालयात आपले प्राण गमवावे लागले, जिथे तिला अतिशय गंभीर अवस्थेत दाखल केले गेले होते. तिची गंभीर अवस्था पाहून प्रशासनाने तिला या आधीच दिल्लीला हलवायला हवे होते. परंतु तिला तिच्या वडिलांच्या विनंतीवरून अलिगढवरून दिल्लीला नेण्यात आले, जेव्हा खूप उशीर झाला होता.

बलात्काऱ्यांनी केलेल्या पाशवी अत्याचारांमुळे पीडितेची अनेक हाडे मोडली गेली होती, तसेच तिच्या पाठीच्या कण्याला प्रचंड व कायमची हानी झाली होती. तिच्या मानेला झालेल्या दुखापतीमुळे तिचे शरीर लुळे पडले होते व तिला श्वास घेणे कठीण झाले होते. तिची जीभ देखील कापून टाकली गेली होती.

तिच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे की पोलिसांनी ४, ५ दिवस तिची तक्रारच नोंदून घेतली नव्हती.

उत्तर प्रदेश हे राज्य महिलांच्या विरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांचे साम्राज्य बनले असून, अपहरण, बलात्कार आणि हत्या हा तिथला नित्यक्रम बनला आहे. उत्तर प्रदेशात गुन्हेगारांना मिळणाऱ्या राजकीय आश्रयामुळे तिथे जंगलराज निर्माण झाले असून गुंड उघडपणे फिरत असतात.

उन्नाव प्रकरणाच्या वेळेस सीबीआयने स्पष्ट विधान केले होते की दोन आयपीएस आणि एक आयएएस अधिकारी कर्तव्यात कसूर केल्याचे दोषी असून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण उत्तर प्रदेशच्या राज्य सरकारने अजूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करून गुन्हेगारांना हा संदेशच दिला आहे की महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांना जास्त गांभिर्यांने घेण्याची गरज नाही.

अखिल भारतीय जनवादी महिला संघटना मागणी करते की अत्याचाराला बळी पडलेल्या युवतीच्या कुटुंबियांना ताबडतोब संरक्षण दिले जावे.

अखिल भारतीय जनवादी महिला संघटना आणि इतर अनेक महिला संघटनांनी देशभरात निषेध आंदोलन करण्याची हाक दिली आहे. सर्व नागरिकांनी रस्त्यावर उतरून या अमानुष कृत्याचा निषेध करावा व योगी, मोदी सरकारला जाब विचारावा असेह आम्हीमालिनी भट्टाचार्य (राष्ट्रीय अध्यक्ष), मरियम ढवळे (राष्ट्रीय महासचिव ), नसीमा शेख(राज्य अध्यक्षा) ,प्राची हातिवलेकर( राज्य महासचिव) यांनी आवाहन केले.