✒️माधव शिंदे(विशेष प्रतिनिधी)मो:-7757073260

मुंबई(दि.30सप्टेंबर):-भोकर ते रहाटी रस्त्याचे काम बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित आहे. या रस्त्याची लांबी 23 कि.मी. असून राष्ट्रीय महामार्गमार्फत या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करुन हे काम तातडीने पूर्ण करावे, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. अशोक चव्हाण यांनी दिले.

मंत्रालयात भोकर ते रहाटी रस्त्याबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री.चव्हाण बोलत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव उ.प्र. देबडवार, राज्य रस्ते विकास महामंडळाचे उप व्यवस्थापकीय संचालक राधेशाम मोपलवार, राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता विनय देशपांडे, सार्वजनिक बांधकाम विभाग (कोकण) मुख्य अभियंता त.की. इंगोले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसचिव श्री.जंजाळ, श्री.रहाणे, अधीक्षक अभियंता श्री.औटी यावेळी उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.चव्हाण म्हणाले, भोकर ते रहाटी रस्त्याचे काम प्रलंबित असल्यामुळे याबाबत जनक्षोभ निर्माण होऊन अनेक तक्रारी, निवेदने माझ्याकडे आली होती. नांदेड ते भोकर रस्त्याची परिस्थिती बिकट असून या कामासाठी बराच कालावधी गेला आहे. या कामामध्ये लक्ष घालून काम केल्यास ते लवकर पूर्ण होण्यास मदत होईल. या रस्त्याचे संपूर्ण सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

या कामाला पुन्हा मंजुरी देऊन निविदा काढण्यात यावी. कामास जानेवारीपर्यंत सुरुवात करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

नांदेड शहरातील उड्डाणपुलाचे काम एमएसआरडीसीच्या बजेटमधून करण्यात यावे

नांदेड शहरातील एमएसआरडीसीमार्फत बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाबाबत मंत्रालयात आढावा घेण्यात आला. नांदेड शहरातील उड्डाणपुलाचे काम एमएसआरडीसीकडे हस्तांतरीत करण्यात आले. याबाबत पायाभूत समितीची मान्यता घेण्यात येणार असून या प्रकल्पाचा अहवाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून घेण्यात येणार आहे, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

हिंगोली गेट ते बाफना चौक या संपूर्ण रस्त्याची लांबी 4.5 किमी असून यावर अनेक जंक्शन आहेत. या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या असल्याने हिंगोली गेटपासून ते धनेगाव जंक्शनपर्यंत 14 मीटर रुंदीचा उड्डाणपुल प्रस्तावित करण्यात आला आहे.

गोदावरी नदीवरील अस्तित्वातील पुलाच्या दोन्ही बाजूने तीन पदरी पूल प्रस्तावित करण्यात आला आहे. या पुलाच्या एका बाजूने 1.50 मी. पदपथ प्रस्तावित करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रस्तावित लांबीमध्ये सिमेंट काँक्रीटचा रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी उड्डाणपुल आहे त्या ठिकाणी प्रस्तावित काट-छेद प्रमाणे सिमेंट काँक्रीट पृष्ठभागाचे रस्ते प्रस्तावित करण्यात आले आहे. महापालिकेकडील तांत्रिक मनुष्यबळ व निधीअभावी या प्रकल्पाचे बांधकाम करणे शक्य नसल्याने पालकमंत्री श्री.चव्हाण यांनी या प्रकल्पाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्यामार्फत करण्याबाबत सूचना केली आहे. याबाबत पायाभूत समितीची मान्यता घेण्यात यावी तसेच याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

रेवस ते रेड्डी बंदर महामार्गाच्या कामाचे सादरीकरण

रेवस खाडीपासून रेडी बंदरापर्यंत सागरी महामार्गाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी याविषयी माहिती दिली. या महामार्गावर सात ठिकाणी खाड्या असून पर्यटनस्थळ याला जोडण्यात आली आहे. सागरी महामार्गाचे हे काम एमएसआरडीसीकडे हस्तांतरित करण्यात यावे. या प्रकल्पास कार्योत्तर मंजुरी त्वरित घेण्यात यावी, असे श्री.चव्हाण यांनी सांगितले.

नांदेड, महाराष्ट्र, मुंबई, लाइफस्टाइल, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED