जातीव्यवस्थेत हरपलेली मानुसकी

32

भारताची उभारणी ही विषमता वादी व्यवस्थेवर झालेली असुन आजही ती कायम आहे. भारतात जेवढी विषमता बघायला मिळते तेवढी विषमता जगाच्या पाठीवर कोठेही दिसणार नाही. भारतातील विषमता एवढी भयावह आहे कि येथे समतेच्या गोष्टी कायद्याने बंधनकारक असताना देखिल त्याचे पालन होत नाही. स्वतः ला उच्च शिक्षित, राष्ट्रभक्त समाजारे लोक सुद्धा विषमतावादी व्यवस्थेचे गुलाम आहेत. हि विषमता एवढी फोफावली होती कि समतेची गोष्ट तर दुरच पण माणुसकी, मानवता या नात्याने सुद्धां माणुस माणसाजवळ येण्याची मुभा नव्हती. आजही विषमता नष्ट झाली असे मुळीच नाही.

फक्त विषतेचे थोडेफार स्वरुप बदलले आहे. आजही भारतात जात, धर्म, पंथ, गरिब, श्रीमंत, लिंग, ठिकाण ईत्यादी बाबतीत विषमता खुप मोठ्या प्रमाणात दिसुन येते. हि विषमता एवढी विदारक आहे की प्रामाणिक मन असलेल्या कोणत्याही माणसाच्या मनाला स्पर्श करून जाईल. भारतामध्ये गुन्हेगार जात बघून ठरवला जातो, गुन्हा जात बघुन ठरवला जातो, श्रेष्ठ कनिष्ठ जात पाऊन ठरवले जाते. शिक्षा जात पाहून, एखादी बातमी जात पाहून उचलली जाते, बातमी जात पाहून दिली जाते, लग्न जात पाहून केले जातात, थोडक्यात काय तर जातीच्या श्रेष्ठत्वावर गुन्हा व गुन्हेगाराचे स्वरूप अवलंबून असते. पिडीत वर्ग खालच्या जातीतील असेल आणि अत्याचार करणारा वर्ग वरच्या जातीचा असेल तर शासन प्रशासनापासुन, मिडिया, न्यायपालीका पर्यंत सर्वच जन प्रकरण दाबण्याचे प्रयत्न करतात. आणि पिडीत वर्ग वरच्या जातीतील आणि आरोपी खालच्या जातीतील असेल तर सर्व यंत्रणा कामाला लागुन आरोपीला कठोर शिक्षा मिळाली म्हणून कामाला लागतात. देशात नराधमांमुळे महिला सुरक्षित नाहीत, महिलांना संरक्षण मिळायला हवे, पिडीतेला न्याय मिळाला पाहिजे म्हणून हातात मेनबत्या घेऊन निषेध नोंदवितात.

परंतु आरोपी वरच्या जातीतील असला.की कोणालाच महिला असुरक्षित आहे अस वाटत नाही, लोक जातीचे असल्याने नराधम वाटत नाहीत, उलट त्यांना वाचविण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न सुरू असतात. प्रेमप्रकरणातुन हत्या असो, चांगले राहिले म्हणून हत्या असो, घोड्यावर बसला म्हणून हत्या, पाणी पिला म्हणून हत्या मा गोष्टी जात लक्षात घेऊन केल्या जातात. पहिल्या सारखी आता परिस्थिती राहली नाही असे म्हणणारे खूप लोक आहेत पण मनिषा प्रकरण बघितलं तर तसे म्हणणाऱ्या लोकांच्या थोबाडात मारल्या सारखे असले तरी काही लोक निर्लज्ज पणे पुन्हा बोलतीलच आता पहिल्या सारखी परिस्थिती नाही. जातीच्या उतरंडी मध्ये खालच्या मजल्यावर असलेल्या जातीतील लोकांवर अन्याय झाला कि मेनबत्याचे कारखाने बंद झालेले असतात, महिलांना रस्त्यावर उतरण्यासाठी वेळ नसतो, व्यसनाधीन तरुणींच्या बेडपर्यंत जाणार मिडीया जात बघून गुन्हा व गुन्हेगारा पर्यंत पोहचत नाहीत. बऱ्याच कारणामुळे प्रकरणाची तिव्रता कमी करून दिली जाते. हीच विषमतावादी व्यवस्था नाही तर काय आहे? गुन्हा आणि गुन्हेगार जर जात बघून ठरत असेल तर लोकशाहीची हत्या होय.

भारतातील जातीवाद बघायचा असेल तर आपण फक्त बलात्काराचे जरी उदाहरणे घेतले तर लक्षात येईल. कोणत्याही बलात्कार किंवा अत्याचाराचे समर्थन ज्याचा डोक्यात मेंदु आहे त्यांनी करूच नाही. पण भारतातील बलात्कार बघितले तर आपल्या लक्षात येईल बलात्काराला न्याय देण्यासाठी सुद्धा जात बघितली जाते. दिल्ली ला बलात्कार होतो पिडीतेचे नाव गुपीत ठेवले जाते, मेनबत्या जाळल्या जातात, महिला रस्त्यावर उतरून आंदोलने करतात, मिडीयाला महिला सुरक्षित दिसत नाहीत, कायदे कठोर करण्याची मागणी केली जाते. कारण तेथे सुद्धा जात बघितली जाते. बलात्कारीत पिडीतेचे नाव, फोटो वा कोणतीही ओळख दाखवण्याची परवानगी नसताना मुलीचे फोटो, नाव मिडीया जाहीर करते पण बाजु उचलून धरत नाही. उलटपक्षी दिल्ली सारख्या वरच्या जातीत बलात्कार झाले तर निर्भया, दामिनी सारखे नाव दिले जातात. दिल्लीला वेगळा न्याय, खैरलांजी, कोपर्डी आणि हाथरस ला वेगळा न्याय कसा असु शकतो.

याचे उत्तर आहे डोक्यात भिनलेला जातीवादी मानसिकता. हाथसर हे प्रकरण फक्त बलात्कारा पुरते मर्यादित नाही तर जातीवादी व्यवस्था विषमता कायम ठेवून आपला आवाज बंद करून मारण्याचा हा संकेत आहे. मिडीया लाचार, वरच्या जातीतील महिला संघटना लाचार. एका एकोणीस वर्षाच्या मुलीवर सामुहीक बलात्कार होतो, बलात्कारा नंतर मुलीची जिभ छाटली जाते, तीची बरगडी मोडली जाते, नुसतं प्रसंग ऐकला तर डोळ्यात पाणी आणि मन हेलावून जाते. एवढी क्रुर वागणूक देऊन तिची हत्या केली जाते. तरी फक्त खालच्या जातीची आहे म्हणून मिडीया आवाज उठवत नाही, कँडल मार्च नाही. का? वरच्या जातीतील असली, राजकीय दबाव असला तरच बलात्काराला न्याय द्यायचा. बेवड्या महिलेच्या अतिक्रमणात असलेल्या घराला धक्का लावला तर मिडीयाने पंधरा दिवस राज्य सरकारला झोपु दिले नाही. जोरजोरात ओरडून अतिक्रमणाचे समर्थन करून व्यवसनाधीन तरुणीला सुरक्षा दिल्या गेली. आणि येथे एका मुलीच्या शरिराचे लचके तोडून, तिला फुलण्या अगोदरच खुडून टाकले याचे काहीच वाटत नाही.

एवढी जातीवादी मानसिकता असायला पाहिजे? अरे बाकीच्या गोष्टी सोडून फक्त ती एक मुलगी आहे, तिच्या वर एवढे अत्याचार झालेत, नेमकीच वयात आलेली मुलगी, स्वतः चे आई वडीलांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी आकाशात झेप घेण्याच्या वयात तिला मातीत गाडले. आणि मिडीया चुप, मेनबत्या वाले चुप, बेटी पढाओ बेटी बचाओ वाले चुप. का तर फक्त जाती साठी.जी जात सत्य स्विकारू शकत नाही ती जात मातीत गाडायला पाहिजे. धर्माचा तर विचार न केलेलाच बरा. हाथरस मधील पिडीता आणि आरोपी दोन्ही हिंदु. हिंदु असले तरी हिंदुत्वाला डोक्यावर घेणारे लोक हाथरस प्रकरणाला न्याय देण्यासाठी समोर येत नसतील तर नेमके कोणते हिंदुत्व पाहिजे. जाती धर्माच्या नावाखाली मानवता व माणुसकी मारण्याचा कट या व्यवस्थेने रचलेला आहे.
गाईला संरक्षण करण्याची निघालेले लोक बाईच्या रक्षणाच्या वेळी नेमके असतात तरी कुठे? गाईला भाकर देणे हि संस्कृती शिकवणारे लोक महिलांवर बलात्कार झाल्यानंतर उच्च जातीतील बलात्कारी आरोपींना वाचवावे हि विकृती शिकली तरी कोठे? बलात्कार झाला, अमानुष पणे हाल केले, जिवनाशी लढता लढता तिने आपले जिवन संपविले. तरी कोणी जात म्हणून समोर आले नाही. अरे पण जिच्यावर एवढे अमानुष अत्याचार झाले, दवाखान्यात मृत्युशी झुंझ देणाऱ्या तरुणीने प्राण सोडले तर कमीत कमी तीची बॉडी तर तिच्या घरच्या लोकांना द्यावी. पिडीत मुलिची बॉडी घरच्या कडे न सोपवता परस्पर अंत्यविधी केला जातो तरी कोणीही काहीच बोलत नसेल तर याचा अर्थ आहे सर्वच जण व्यवस्थेचे गुलाम आहेत. पिडीतेची बॉडी सगळे झोपलेले असताना रात्री तिन वाजता जाळण्यात येते.

रात्री तिन वाजता पिडीतेची बॉडी जाळण्यामागचा नेमका उद्देश काय? बॉडी जाळताना तिथे कोणाला जाण्याची सुद्धा परवानगी नव्हती. पण का? एका निष्पाप मुलीची हत्या होते तिला जाळले जाते आणि तीचा चेहरा सुद्धा बघु दिला जात नाही. एक महिला पत्रकार बंदोबस्ता साठी असलेल्या पोलीसांना प्रश्न विचारण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्यामध्ये ती त्या पोलीसाला विचारते तुम्ही नेमके काय जाळत आहात? तेव्हा तो पोलीस म्हणतो मी काहीच बोलु शकत नाही. जर पोलीस काहीच बोलु शकत नाही याचा मागचे खुप मोठे षडयंत्र समजून घेणे गरजेचे आहे. संबंधित बॉडी पिडीतेचीच होती का? कि पिडीतेचे अवयवाची तस्करी करून डमी जाळण्यात आली असे अनेक प्रश्न मनात निर्माण झाले तरी मिडीया, महिला संघटना पाहिजे त्या प्रमाणात हाथरस सोबत नाहीत याचे कारण फक्त जात आणि जातीवादी मानसिकता आहे. खालच्या जातीतील मुलींवर अत्याचार, बलात्कार झाला काय आणि नाही झाला काय कोणाला काही फरक पडत नाही कारण जातीच्या गर्वाने माणुसकीची हत्या केलेली आहे. आज बघितलं तर महिला सुरक्षित आहे पण जाती व्यवस्थेने जात सुरक्षित ठेवली नाही.

वरच्या जातीतील मुलींवर बलात्कार झाला तर मुली सुरक्षित नाहीत अशा बातम्या डोक्यात जातीचे शेण असलेला मिडीया देते. आणि खालच्या जातीतील मुलीवर बलात्कार झाला तर दलित मुलीवर बलात्कार झाला म्हणून बातमी दाखवते, मुळात प्रश्न हा आहे बलात्कार हा बलात्कार असतात दोन्ही ठिकाणची बातमी दाखवताना तिव्रता का कमी जास्त? आपण जातीची गुलामी करताना माणुसकीची हत्या तर केली नाही असा विचार कोणाच्याच डोक्यात येत नाही.
*************************************
✒️लेखक:-विनोद पंजाबराव सदावर्ते
रा. आरेगांव ता. मेहकर
मोबा: ९१३०९७९३००