वस्तू व सेवा कर (जीएसटी) आयुक्त संजीव कुमार यांच्या वाढदिवसानिमित्त पिशवीत वृक्षारोपण

15

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.1ऑक्टोबर):-शाहूवाडी तालुक्यातील पिशवी येथे राज्याचे वस्तू व सेवा कर ( जीएसटी ) आयुक्त संजीव कुमार यांच्या वाढदिवसानिमित्त झाड फोंडेशन , हरित सेना आणि ग्रामस्थांच्या वतीने माळरानावर ऑक्सिजन पार्कमध्ये वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.

जागतिक तापमानात वाढीचे संकटाचा सामना करण्यासाठी वृक्ष लागवडीशिवाय पर्याय नाही, या भुमिकेतून पर्यावरण हीतासाठी वृक्षलागवडीचा निर्धार पिशवी ग्रामस्थांनी केला आहे. राज्याचे वस्तू व सेवा कर ( जीएसटी ) आयुक्त संजीव कुमार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपणाच्या चळवळीची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. श्री.संजीवकुमार यांनी महावितरण कंपनीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) पदी असताना छापिल कागदी वीज बिलाऐवजी ग्राहकांना ई-मेलवर वीज बिल देणारी गो-ग्रीन ही मोहिम राबविली. ई-मेलवर वीजबिल घेणाऱ्या ग्राहकांना 10 रूपये सुट देण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

राज्यभरात गो ग्रीन मोहिमेस ग्राहकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सुत्रधारी कंपनीचे जनसंपर्क सल्लागार व पिशवीचे सुपुत्र श्री.पी.एस.पाटील यांनी मदतनिधी दिला. यावेळी करंज , तामन , वड , आंबा , पिंपळ, करंज , चिंच आदी वृक्षांचे रोपण करण्यात आले. याप्रसंगी वृक्ष मित्र दिनकर चौगुले, आनंदा इंगवले, हरी इंगवले , अमोल पाटील, मानसिंग पाटील , जालिंदर इंगवले, स्वाती पाटील, प्रियांका इंगवले, रोहिणी चौगुले, शरद जाधव, दिपक जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.