
🔹इंडियन फ़ंक्शन पॅलेस येथे भावपूर्ण सत्कार
🔸आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचीही उपस्थिती
✒️अहेरी(पुरोगामी संदेश नेटवर्क)
अहेरी(दि.2ऑक्टोबर):- संघर्षातूनच जीवनात यशाची पायरी गाठता येते असे प्रतिपादन यवतमाळ येथील अझहरुद्दीन काझी यांनी केले.ते 2019 च्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 315 व्या क्रमांकावर परीक्षा उत्तीर्ण करून भारतीय प्रशासकीय सेवा पदवी प्राप्त (I.A.S.) केल्याने गुरुवार 1ऑक्टोंबर रोजी येथील इंडियन फ़ंक्शन पॅलेस मध्ये ऑल इंडिया पयाम-ए-इंसानियत फाऊंडेशन अहेरीच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात सत्काराला उत्तर देतांना बोलत होते.
सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम होते तर मंचावर सत्कार मूर्ती म्हणून अझहरउद्दीन काझी, प्रमुख अतिथी म्हणून वन वैभव शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष बबलू भैय्या हकीम, पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे, मोहम्मद आलिम सहाब, मोहिब अफसर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे सत्काराच्या स्थानावरून बोलतांना अझहरउद्दीन काझी म्हणाले की, खरे तर जीवनाची सुरुवातच संघर्षातून सुरू होते त्यामुळे जीवनात नैराश्य व नकारात्मक विचार न करता संयम, आत्मविश्वास, जिद्द, परिश्रम व संघर्ष केले तर यश आपोआप पदरात पडत असते असे म्हणत खऱ्या अर्थाने माझ्या जीवनाची सुरुवातच अगदी शून्यातून व संघर्षातून झाली असून मेहनत व कष्टातून यशाची पायरी गाठलो असे अझहरउद्दीन काझी म्हणत बिकट परिस्थितीतही जीवनात सकारात्मक विचार करा ध्येय गाठता येते असे मोठ्या आत्मविश्वासाने सांगितले.
याप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून आमदार धर्मराव बाबा आत्राम म्हणाले की, खडतर व कठीण प्रसंगातूनच जीवनाची खरी सुरुवात होत असते शिक्षणातूनच भविष्य उज्जवल होत असते त्यामुळे युवकांनी उच्च व दर्जेदार शिक्षण घेऊन यशाची उंच भरारी घ्यावे असे म्हणत वाचनालयासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे व निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी आश्वासन दिले.
याचवेळी पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष शाहीन भाभी हकीम, ज्येष्ठ शिक्षक शफीक शेख यांनी शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी शिक्षणाचे महत्त्व दिले.तत्पूर्वी मुस्लिम समाजातून व तेही मोठ्या कठीण प्रसंगातून अझहरउद्दीन काझी भारतीय प्रशासकीय सेवेची पदवी (I.A.S.)धारण केल्याने यावेळी वन वैभव शिक्षण मंडळाच्या व मुस्लिम बांधवांच्या वतीने आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते अझहरउद्दीन काझी यांचे शाल, श्रीफळ व स्मृती चिन्ह भेट देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आले.
सोबतच कोरोना योद्धा म्हणून पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे यांचेही आयोजकांच्या वतीने शाल, श्रीफळ व स्मृती चिन्ह भेट देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आले.सत्कार समारंभ कार्यक्रमाचे प्रास्ताविक अवैस शेख यांनी तर संचालन सैय्यद आबीद अली यांनी केले. उपस्थितांचे आभार सिराज शेख यांनी मानले.