म्हणून थुकावं वाटतंय मला

26

रोहित मेला निषेध करा..
सागर गेला निषेध करा..
खैरलांजी घडलं निषेध करा..
संविधान जाळलं निषेध करा..
पायलचा जीव गेला निषेध करा..
मनीषाचा बलात्कार झाला निषेध करा..

निषेध. निषेध.. निषेध…
आणि फक्त निषेध करणाऱ्या षंढ समाजा
कुठपर्यंत करणार आहेस तु
असा हतबल निषेध व्यवस्थेचा?
आता तर मलाच करावा वाटतोय
निषेध तुझ्या निषेधाचा..!

अरे मान्य करा ना तुमचाही षंढपणा
तुमची हतबलता, तुमची लाचारी
आणि तुमची बेजबाबदारी, गद्दारी..
निषेध नोंदवून न्याय मिळणार नाही
हे ठाऊक आहे तुलाही..!
सत्तेचा माज चढलेल्या
जातीयवादी गांडू भडव्यांसह,
तुझी एकी नसने
कारण आहे या अत्याचारांचं..!

तपासलंच नाही तुही कधी,
तुझ्यावरील अन्यायाच कारण
केलंच नाही मनन-चिंतन
आणि स्वतःच आत्मपरीक्षण…
म्हणून तुला करताच आलं नाही
स्वतःच्या आया बहिणीचं रक्षण..!
पुन्हा एक बळी घेतलाय तुमच्या
मत विकण्याच्या गद्दारीने..!
म्हणून थुकावं वाटतंय मला
तुझ्या निरर्थक निषेधावर..!

गटातटात विखुरलेल्या लाचार
आणि निर्लज्ज पुढाऱ्यांनो
पुन्हा नवा बळी घेतलाय
तुमच्या बेकीच्या स्वार्थी राजकारणाने

तुमचं भूलथापांनी भरलेलं भाषण
आणि तुम्हाला रखेल बनवणारं शासन
आता लपलेलं नाही…
पेटून उठले नाहीत तुम्हीही स्वाभिमानाने…
म्हणून आमचा नेता कोण?
आम्हाला सांगताच आलं नाही
अभिमानाने..!

आमचा प्रत्येक नेता फक्त भाषणातच बोलतो…
म्हणून इथला शासनकर्ता
तुला बिनधास्त कोलतो…!
विकले जातात कुत्र्यासारखे
मनुवाद्यांच्या बोलीवर…
म्हणून थुकावं वाटतंय मला
या पुढाऱ्यांच्या दलालीवर..!

कळालाच नाही भीम आम्हाला,
नाहीतर असं घडलंच नसतं…
आणि इथल्या मनुव्यवस्थेने,
अरविंद, विराजला गिळलच नसतं..!

नामदेवाच्या विद्रोही लेखणीने
पेटणार्‍या समाजाला,
दिशाहीन करतोय आज
माझ्यातीलच एक कवी…
आणि त्याला नाचावतोय डिजेवर…

आणताच आली नाही त्याला
समाजाला जाग…
आणि पेटवताच आली नाही त्याला
तशी क्रांतीची आग..!
आता कुठे मांडतोय तो चळवळीची दशा?
कुठे सांगतोय समाजाला आंदोलनाची दिशा?

त्यालाच दिसला नाही कधी,
तो संसद भवनाचा रस्ता…
या दिशाहीन समाजाची
ती वैचारिक दुरावस्था..!

चळवळ, परिवर्तन, क्रांती
माझी मलाच उमगली नाही..
म्हणून मला आता निषेध करावा वाटतोय,
माझ्याच लाचार, हतबल, निराधार पेनाचा..!
म्हणून थुकावं वाटतंय मला
आता माझ्याच तोंडावर..!

म्हणून थुकावं वाटतंय मला..!
>>>>>>>>>>><<<<<<<<<<<<<

✒️कवी:- निलेश पवार, भुसावळ ,मो:-८३०८५५८७१०

▪️संकलन:-नवनाथ पौळ
केज विशेष प्रतिनिधी
मो-८०८०९४२१८५