गांधीजी म्हणजे अहिंसेच्या माध्यमातून जगाला प्रेम शिकवणारा महात्मा – ना. विजय वडेट्टीवार

  36

  ?150 व्या जयंती महोत्सवात पालकमंत्री यांच्याकडून अभिवादन

  ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

  चंद्रपूर(दि.2ऑक्टोंबर):-अहिंसेच्या माध्यमातून संपूर्ण जगाला प्रेम करायला शिकवणारा महात्मा म्हणून महात्मा गांधींची ओळख आहे. विसाव्या शतकातील सर्वात लोकप्रिय व जगावर प्रभाव टाकणारे व्यक्तिमत्व म्हणून महात्मा गांधींची नोंद संपूर्ण जगाने घेतली आहे. महात्मा गांधी एक विचार असून तो कायम आमच्यात राहणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन आपत्तीव्यवस्थापन इतर मागास बहुजन कल्याणमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी आज येथे केले.

  चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन केले.

  यावेळी ते म्हणाले, भारतातच नाही तर जगभरात या दोन्ही महान नेत्यांची जयंती साजरी केली जात आहे. केंद्र व राज्य सरकार हे वर्ष महात्मा गांधींचे 150 वी जयंती वर्ष म्हणून साजरे करीत असून या आमच्या आधीची पिढी या महामानवाच्या परीस स्पर्शाने पावन झाली आहे. त्यांची शिकवण ही कायम प्रेरणादायी असून मानवतेच्या इतिहासात अहिंसेच्या मार्गाने त्यांनी दिलेला स्वातंत्र्याचा लढा अजरामर झाला आहे.

  यावेळी पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या समवेत, खासदार सुरेश उपाख्य बाळू धानोरकर, माजी प्रधान सचिव किशोर गजभिये, प्रकाश देवतळे, रामू तिवारी प्राधान्याने उपस्थित होते.

  2 ऑक्टोबर हा दिवस जगभरात जागतिक अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो. अहिंसेचा मार्ग अनुसरून स्वातंत्र्य मिळवता येऊ शकते असे महात्मा गांधी यांनी जगाला शिकवले. जेव्हा आपण अहिंसेबाबत बोलतो तेव्हा सर्वप्रथम आपल्याला ‘बापू’ हे नाव आठवते. महात्मा गांधी यांनी केवळ भारतालाच नव्हे, तर संपूर्ण जगाला अहिंसेचा अर्थ समजावून सांगितला. अहिंसा ही एक व्यक्तीगत सवय असून कोणत्याही परिस्थितीत स्वत:ला किंवा दुसऱ्याला नुकसान पोहोचवले जाऊ नये असा यामागचा उद्देश आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. खासदार बाळू धानोरकर यांनी देखील या वेळी महात्मा गांधी यांना आदरांजली व्यक्त केली.