मानव वन्यजीव संघर्ष

8

आजचा वाढत चाललेला मानव वन्यजीव संघर्ष शहर आणी खेडी दोन्ही ठिकाणी तितकाच तीव्र आहे. दोन्ही ठिकाणी चाललेल्या विकासाच्या तीव्र पद्धती सर्वांच्याच मुळावर उठणाऱ्या आहेत. वन्यजीव व विकास यामधील दरी इतकी मोठी कधीच नव्हती जितकी आज आहे. आजच्या घडीचा हा संघर्ष निरनिराळ्या भागात निरनिराळ्या कारणामुळे आहे. प्रसारमाध्यमातिल बातम्यामधून हा संघर्ष सतत वाढताना आपण पाहत आहोत. एखादे उदाहरणं घ्यायचे तर वाघाने, बिबटयाने, अस्वलने, रानडुक्कराने ऱ्हास केल्याचा अथवा वन्यप्राण्यानी पिकाची नासधूस केल्याची घटना आपण वर्तमान पत्रात वाचतच असतो. अशाप्रकारे वन्यप्राण्यामुळे जीवित अथवा वित्तीय हानी झाली कि, मानव व वन्यप्राण्याचा संघर्ष अटळ असतो. या सर्व उदाहरणात वन्यजिवांचाच दोष आहे असे प्रथमदर्शनी कुणालाही वाटेल पण थोडा विचार केला तर लक्षात येईल कि, त्यात कुठे ना कुठे मानवाचाच दोष आहे, वन्यप्राण्याचा नाही.

वन्यजीव मानवी वस्तीत येण्यामागे दोन कारणे आहेत. एक मुख्य कारण, जे सहज समजण्यासारखे आहे ते म्हणजे मानवाने वन्यप्राण्याच्या अधिवासात केलेले अतिक्रमण आहे. वाढती लोकसंख्या व वनजमिनीवरचे अतिक्रमण यातून वनालगत अनियोजित लोकवस्ती यातूनच वन्यप्राणी व मानवाच्या संघर्षाची खरी परिस्थिती निर्माण झालेली आहे वन्यजीव अधिवास क्षेत्रात सडक नेटवर्क, वनजमिनीचा गैरवननीती जसे – उत्खनन, सडक व इतर परीयोजनात्मक वापर करणे, वाढत्या लोकसंख्येच्या गरज्यांच्या पूर्तीसाठी दरवर्षी लाखो हेक्टर वनक्षेत्र नष्ट केले जाते. परिणामी त्या ठिकाणी अधिवासात असलले वाघ, बिबट, अस्वल, रानडुक्कर ईत्यादी हिंस्त्र वन्यप्राणी कुठे जाणार ? जंगलात राहणारा एखादा वाघ, अस्वल, बिबट सुखासुखी गावात का घुसेल ? त्यांनाही स्वतःच्या जीवाची काळजी आहेच कि, किंबहुना असे जंगली प्राणी माणसापासून दोन हात दूरच राहणे पसंत करतात. तरीही त्यांचा वावर गावालगत का वाढतो ? याला अपवाद मानवच असू शकतो. वन्यप्राण्याच्या अधिवासात मानवाचा वावर असेल तर मानव व वन्यप्राणी संघर्ष अटळच आहे.

बिबटयाच्या बाबतीत बोलायचे झाले तर त्याचे खाद्य वैविध्यपुर्ण असते. अगदी उंदरापासून ते मोठया हरणापर्यंत सर्वच त्याच्या खाद्यामध्ये येते. त्यामध्ये विभिन्न आकाराचे कितीतरी इतर वन्यजीव येतात पण हे जंगली जीव आत्ता जंगलामध्ये किती प्रमाणात शिल्लक आहेत हा महत्वाचा प्रश्न आहे. वन्यजिवाच्या शिकारीवर प्रतीबंध असून तरीही अल्पशा प्रमाणात का होईना समाजकंटकाकडून शिकारी आजही सुरुच आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही. मग बिबटयासाठी खायला काहीच उरत नाही मग त्याचा मोर्चा वाढतो पाळीव प्राण्याकडे, कोंबड्या, बकऱ्या असोत व कुत्री असोत या सगळ्यांवर तो ताव मारतो. अशाप्रकारे प्राण्याच्या शोधात असताना एखादा मनुष्य अचानक मध्ये आला तर त्यावर भीतीपोटी हमला केला जातो खाद्यान म्हणून नाही.

बिबटया हर प्रकारच्या अधिवासात राहू शकतो त्याला जंगलचा हवे असे काही नाही. गवताळ राने, कडे-कपाऱ्या, खूरट्या झूडपाची राने अशा कुठल्याही अधिवासात तो राहू शकतो. वाघाचे तसे नाही त्याला लागते जंगल मग जिथे अशा जंगलात मानव अधिवासाकरिता अथवा शेतकरिता अतिक्रमण करेल अशा परिस्थितीत वन्यजिव मानव अधिवासातच राहणार त्यामुळे बऱ्याच वेळेस गाई – गुरे मारलीही जातात आणी मानवाशी संघर्ष सुरूच राहतो. यात वन्यप्राण्याचा दोष नाही.वन्यप्राणी बिचारे त्यांच्या अधिवासात टिकून राहण्याची धडपड करीत असतात आणी दुसरीकडे जंगलातला रहिवाशी माणूस स्वतःच्या कुटुंबाचे पोट भरण्याकरिता धडपडत असतो, आणी त्यासाठी वनजमिनीवर अतिक्रमण करून तूटपुंजी शेती करतो. वाढत्या गावा शहरामूळे जंगलाचे पडत चाललेले तुकडे त्याचे खापर फक्त जंगलात राहणाऱ्या समुदायावर फोडता येनार नाही. मानव वन्यजीव संघर्ष हे संस्थात्मक अपयश (System Failure) आहे. याचे कारण आहे वन आणी वन्यजिवाविषयी असलेली एकंदर अनास्था ही अनास्था मानवी संस्कृतीला खोल खाईकडे घेऊन चाललेली आहे इतके नक्की ज्याची परीनीती जैविक विविधता झपाट्याने नष्ट होण्यामध्ये होत आहे.

मानव वन्यजीव संघर्षाकडे दोन प्रकारे पाहता येईल, यातील एक आहे सक्रिय व उग्र स्वरूपाचा संघर्ष (Achive Confict) आणी दुसरा निष्क्रिय वा सुप्त स्वरूपाचा संघर्ष (Silent Confict). सक्रिय व उग्र स्वरूपाचा संघर्षात भीती अथवा हिंसेपोटी वन्यप्राण्याचा बळी जातो. निष्क्रिय वा सुप्त स्वरूपाचा संघर्षात एखादा प्राणी मारला जात नाही परंतु मानवाच्या कुठल्या ना कुठल्या कृत्यामुळे वन्यप्राण्याचा बळी जातो. जस जसे वन्यजिवाच्या अधिवासावर अतिक्रमण होईल तस तसे वन्यजीव नष्ट होत जातील यात दुमत नाही. अधिवास नष्ट होतील तसा त्याचा परिणाम परीसंस्था नष्ट होण्यामध्ये होईल. मानवी हस्तक्षेपामुळे वन्यजीव आणी पर्यावरणाचा ऱ्हास झपाट्याने होत आहे. हे थांबले नाही तर शासनाने केलेल्या पर्यावरणपूरक कामाला शून्य अर्थ आहे.
वन्यजीवाचे मृत्यू, त्यांच्यावर होणारे हल्ले अनैसर्गिक असले तरी कारणे नैसर्गिक आहेत. कारण मानव आणी वन्यजीव दोघांकरिता हा संघर्ष जगण्याचा आहे, जिंकण्याचा नव्हे !

✒️सौ. आरती ज. उके
वनपरीक्षेत्र अधिकारी
कुही वन्यजीव