सहाव्या वर्ल्ड पार्लमेंटेमध्ये ‘एमआयटी डब्ल्यूपीयू वर्ल्ड पीस फेलोशिपचा’ शुभारंभ

276

🔹प्रेमाने अहंकार कमी करून शांतता प्रस्थापित होते

🔸केंद्रीय संसदीय कार्य राज्य मंत्री अर्जुन राम मेघवाल यांचे विचार

✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पुणे(दि.4ऑक्टोबर):-“ समाजातील अशांतता कमी करण्यासाठी प्रेम हाच एकमेव मार्ग आहे. त्यातून समाजात शांतता प्रस्थापित होईल. त्याकरीता योग प्राणायाम आणि स्वाध्याय हे महत्वाचे साधन आहे.” असे विचार केंद्रीय संसदीय कार्य राज्य मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे ऑनलाइन जागतिक विज्ञान, धर्म आणि तत्त्वज्ञानावर आधारित सहाव्या वर्ल्ड पार्लमेंटच्या आठव्या सत्रात ‘एमआयटी डब्ल्यूपीयू वर्ल्ड पीस फेलोशिप’ चा शुभारंभ मेघवाल यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

यावेळी द युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सॉसचे अध्यक्ष डॉ. विस्ताप कारभारी, द चॅरिटेबल फाउंडेशनचे अ‍ॅण्ड इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अ‍ॅण्ड पीसचे संस्थापक व कार्यकारी अध्यक्ष स्टिव किलीला, युएस येथील रोटरी अ‍ॅक्शन ग्रूप फॉर पीसच्या कार्यकारी संचालिका श्रीमती रीम गुनामी, साजी प्रिलिस हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.

तसेच, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ.एन.टी.राव, प्र कुलगुरू प्रा.डॉ. मिलिंद पांडे, प्रा.डी.पी. आपटे, प्रा.डॉ. आर.एम. चिटणीस, डॉ. राजीव ठाकूर व वर्ल्ड पीस डोमचे संचालक दर्शन मुंदडा उपस्थित होते.
अर्जुन राम मेघवाल म्हणाले,“ वर्तमान काळात कोविड 19 मुळे निसर्गात मोठ्या प्रमाणात चांगले बदल दिसून आले आहेत. यामुळे पर्यावरणात मोठी सुधारणा झाली. आता याला चांगले ठेवणे हे आमच्या हातात असून ती एक जवाबदारी आहे. सध्याच्या काळात वैद्यकीय विज्ञानात मोठी प्रगती होतांना दिसत आहे.”

“ शरीर, मन, बुद्धि आणि आत्मा यांचे तत्व मिळून मानव निर्माण झाला आहे. मानवाजवळ 5 कर्मेद्रिंय आणि 5 ज्ञानेद्रिय आहेत. या सर्व गोष्टींचा योग्य उपयोग न करता मानव मत्सरच्या आहरी गेल्याने त्यात मोठ्या प्रमाणात ईर्ष्या निर्माण होतांना दिसते. त्यातूनच तो विनाशाला कारणीभूत बनत आहे. एकीकडे अमेरिका, कोरिया या सारख्या देशांना वाटते की आम्हीच सूपर पॉवर आहोत, परंतू तेथे ही शांती नाही. प्रेमानेच जग जिंकता येते. त्यातूनच विश्वात शांती निर्माण होईल. तत्वज्ञान आणि धर्म हे एकच आहे, त्यांनी दिलेला मार्ग हा शांतीचाच असल्याने त्या गोष्टी धारण कराव्या.”

जोशुआ प्रुडॉस्की म्हणाले,“ जागतिक पीस इंडेक्स मध्ये 163 देशांमध्ये भारताचा 139 वा नंबर लागाते. येथे युवकांची संख्या सर्वाधिक आहे. येथे 10 ते 24 वर्षाच्या युवकांची सर्वाधिक संख्या असली तरी 29 टक्के महिला आणि 38 टक्के पुरूष यांनी शिक्षण घेतले आहे. अशावेळेस शिक्षणाचा प्रसार होणे गरजेचे आहे. एमआयटी वर्ल्ड पीस फेलोशिप हे युवांच्या प्रगतीसाठी आणि भविष्यासाठी असल्याने त्यातून समाजउन्नती होईल.”

डॉ. विस्ताप कारभारी म्हणाले,“ विज्ञान आणि अध्यात्म हे मानव उत्थानासाठी महत्वाचे आहे. तसेच, धर्म हा जीवनाचा मुख्य धागा आहे. विज्ञान हे मानवाच्या शारिरीक प्रगतीसाठी तर अध्यात्माने मन मजबूत बनते. आपल्याला जीवनात कसे वागावे कसे वागू नये या जीवन दर्शनाचे ज्ञान हे तत्वज्ञान सांगत असते. या पार्लमेंटच्या आधारे मानवाच्या मनात शांतीची ज्योत पेटविण्याचे कार्य होत आहे.”

डॉ . विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“भारत हा विश्व गुरू बनण्याची वेळ आली आहे. संत ज्ञानेश्वर यांनी 730 वर्षापूर्वी सांगितले होते की मानव कल्याणासाठी अध्यात्माच्या मार्गावर चालून शांती मिळवावी. भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञानात मातृ, पितृ, आचार्य आणि अतिथीं चा सम्मान केला पाहिजे ही आपली परंपरा आहे. भारताने संपूर्ण जगाला वसुधैव कुटुम्बकमचा संदेश दिला आहे. त्यातूनच 21 व्या शतकात भारत जगाचे नेतृत्व करेल आणि विश्व गुरू म्हणून उदयास येईल.”
त्यानंतर रीम ग्रुमीन, साजी प्रिरीस व क्रिस्टन सिटो किलीला यांनी आपल्या विचारातून आज मानवाला शांतीची गरज का आहे हे स्पष्ट केले.
डॉ. एन.टी.राव यांनी स्वागत केले.
प्रा.गौतम बापट यांनी सूत्रसंचालन व प्रा.डी.पी. आपटे यांनी आभार मानले.