बलात्कार स्त्री वर नव्हे तर अहंकारावर होतात, तेव्हाच लोक चवताळतात

7

✒️लेखक:-दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो:-9561551006

खरेतर देशात वासनांध जनावरांचे थैमान रोजच सुरू आहे. रोज अमानुष बलात्कार होतात. रोज माय-बहिणींच्या शरिराचे लचके तोडले जातात पण एखाद्याच बलात्काराची चर्चा होते. जिथे मिडीया, जात आणि राजकारण पोहोचते तिथेच चर्चा होते. त्याच बलात्काराबाबत बोलले जाते अन्यथा रोज शेकडो महिला शिकार होतात कुणाला काही वाटत नाही. एक निर्भया ठरते, तिच्याबद्दल अनेकांना दया वाटते तर दुस-या अत्याचारित स्त्रीया समाजाला माहीतही होत नाहीत. हाथरसचे प्रकरण भयंकर आहे. नराधमांनी केलेला बलात्कार आणि त्या नंतरचे कौर्य हादरवून सोडणारे आहे. माणसाचा माणूसपणावरील विश्वास उडवणारे आहे.

स्त्रीला माणूस नव्हे तर देवता माणणारे तिथे सत्तेत आहेत. यत्र: नार्यस्तू पुज्यंते । तत्र देवत: रम्यंते । असं सांगणारेच युपीत सत्तेत आहेत. पण या भडव्यांनीही सदर अत्याचारितेवर मानसिक बलात्कार केले आहेत. न्याय देण्याचे दुरच पण तिच्या कुटूंबियांना दबावात आणि दडपणात ठेवले आहे. त्यांना ना माध्यमांशी बोलून दिले, ना कुणाला भेटून दिले. सदर अत्याचारितेला मृत्यूनंतर पोलिसांनीच जाळले कारण बलात्कार करणारे मोठे होते. प्रशासनाकडून त्यांना वाचवण्याची धडपड सुरू होती. साधूत्वाची बढाई मारणा-या योगीच्या राज्यात हा प्रकार घडतो. मुळात तिथे हा पहिला प्रकार नाही. सातत्याने तिकडे असेच घडते आणि ते घडल्यावर सरकार, तिथले पोलिस असेच बेशरम वागत असते. अतिशय संतापजनक प्रकार असूनसुध्दा आर एस एस कडे आणि भाजपाकडे वैचारिक अंग गहाण टाकलेले लोक काही बोलायला तयार नाहीत. सदर अत्याचारितेची जी अवस्था केलीय ती पाहता योगीला तिथे मुख्यमंत्रीपदावर बसण्याचा अधिकारच नाही पण बोलणार कोण ? राजिनामा मागणार कोण आणि देणार कोण ? सगळेच नंगेपुंगे आहेत. एका नंग्याने दुस-या नंग्याला काय सांगावे ? मोदींना राजधर्माची आठवण करून देण्याची नैतिकता असलेले अटलजी आज हयात नाहीत. तिथे सगळेच लाचार, चमचे आणि हुजरे आहेत. मग हुजरे काय राजधर्माची आठवण करून देणार ? ते काय खडे बोल सुनावणार ? भागवतांना धर्माच्या गपड्यांशिवाय राजधर्म, मानवता धर्म आठवला तर ते बोलतील. बाकी मोदी-शहा आणि योगीच्या झुंडशाहीसमोर बोलण्याची त्यांची तरी औकाद आहे का ? हा खरा प्रश्न आहे. भाजपच्याच एका नेत्याने मागे बलात्कार करून एका मुलीला व तिच्या बापाला संपवले होते.

हे सतत घडत असते. नैतिकतेच्या गप्पा मारणा-या भाजपवाल्यांची नैतिकता हलकट आहे. या हलकटांना त्याचे काहीही देणेघेणे नसते. ते सोईने नैतिकतेच्या गपड्या ठोकत असतात आणि साळसुदपणाचा आव आणत असतात.

बलात्काराचे सोईने राजकारण केले जाते. कॉग्रेसची सत्ता असली की भाजपवाले नैतिकच्या आभाळभर गप्पा मारतात. भाजपशासीत राज्यात बलात्कार झाला की कॉंग्रेसवाले आणि इतर पक्ष तशाच गप्पा मारतात. बलात्कार करणारे नराधम स्वत:ची वासना शमवून घेतात त्याचप्रमाणे हे नालायकही तेच करतात. पिडीतेच्या, अत्याचारितेच्या व तिच्या कुटूंबियांच्या मनाचे कुणाला काही पडलेले नसते. प्रत्येक जण या प्रकारात आप-आपले सुप्त हिशोब आणि हेतू साकार करून घेत असतो. उत्तरप्रदेशमधील हातरस प्रकरणी सध्या हेच सुरू आहे. जेवढी भयंकर बलात्काराची घटना आहे तेवढीच भयंकर ही विकृती आहे. बलात्कार होवूच नये यासाठी गंभीरपणे काही होत नाही. हाय फ्रोफाईल समाजातल्या कुणावर बलात्कार झाले की तेवढ्याच आरोळ्या आणि किंकाळ्या ऐकू येतात. तेव्हाच मिडीयातले दलाल घटनास्थळी पळतात. एरव्ही या कानाचा त्या कानाला मागमुस लागत नाही. कित्येक कळ्या अशाच दबल्या जातात.

काही महिन्यापुर्वी सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातल्या एका बारा वर्षाच्या पोरीवर दोन सख्ख्या भावांनी बलात्कार केला होता. त्या दोन्ही नराधमांनी वयाची साठी पार केलेली होती. बारा वर्षाच्या पोरीला भिती दाखवून तिच्यावर अत्याचार केले होते. दोघे भाऊ सतत तीन महिने हे कृत्य करत होते. सदर प्रकरणात ती चिमुरडी गर्भवती राहिली होती. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार समोर आला. तिचा गर्भ खाली करायची प्रोसेस सुरू होती. त्यात ती चिमुरडी जगेल का नाही ? याचीच शाश्वती नव्हती. अनेकवेळा हा विषय लिहायला घेतला पण लिहायची हिम्मत नाही झाली. मनातला संतापाचा आवेग निघत नव्हता आणि लिहायची हिम्मत होत नव्हती. असे वाटत होते की जणू तो बलात्कार आपल्या संवेदनशिल मनावरच झालाय. सदरचा प्रकार पाहून, ऐकून डोळे भरून येत होते. कमालीचा संताप येत होता. पण या समाज व्यवस्थेत त्याला काही अर्थ नाही.

जेव्हा त्या मुलीच्या घरी जायचा प्रसंग आला तेव्हा तोंडातून शब्दच फुटत नव्हता. आपेलच कुणीतरी थोबाड फोडल्यासारखे वाटत होते. त्या मुलीच्या आईशी काय बोलणार ? कसे बोलणार ? हा प्रश्न पडला होता. त्या कुटूंबियांना भेटून आल्यावर आपल्या पोटाला मुलगी आली आहे याचे सर्वात आधी भय वाटले. आपण एका मुलीचे बाप आहोत. तिला या सैतानांच्या गर्दीत वावरावे लागणार आहे याचीच भिती वाटली. अवघ्या बारा वर्षाच्या पोरीवर असला वाईट व अघोरी प्रसंग ओढवू शकतो. समाजातली वासनांध जनावरं कुणालाही सोडत नाहीत. मग ती लहान मुलगी असो, तरूणी असो किंवा एखादी वयोवृध्द स्त्री असो. पण योगीच्या आणि भागवताच्या कळपातले लोक बोंबलताना अंगप्रदर्शन, तोकडे कपडे यावर बोंबलतात. बारा वर्षाच्या पोरीने कसले अंगप्रदर्शन केले असेल ? जिचे अंगच अजून स्त्री म्हणून तयार नव्हते ती निरागस चिमुरडी कशाचे अंगप्रदर्शन करणार आहे ? तरीही तिच्यावर बलात्कार झालाच. नेहमी बलात्कार झाला की महिलांना सभ्यतेचे सल्ले देणारे नालायक लोक या पिसाळलेल्या पुरूषी जनावरांना मोकाट सोडतात आणि महिलांना सभ्यतेच्या फुटपट्ट्या लावतात. ही पिसाळलेली पिसाट जनावरं वासनेपोटी कुणाचीही शिकार करतात. हे रोज घडतय, सतत घडतय आणि सर्वत्र घडतय. याला कुठलेच राज्य अपवाद नाही, कुठली सत्ता अपवाद नाही. प्रत्येकाच्या बुडाखाली हिच बचबच आहे. फक्त सगळेच सोईचे सोवळे नेसतात. अत्याचारितेला न्याय देण्यापेक्षा आपले हिशोब कसे चुकते करता येतील ? याचीच चिंता असते या लोकांना.

यात सगळ्यात वाईट वाटणारी गोष्ट म्हणजे बलात्कार स्त्रीवर होतो पण समाज त्याच्याकडे पाहताना अत्याचारीत स्त्री म्हणून पहात नाही. ती आपल्या जातीची आहे का ? हे प्रथम तपासले जाते. आपल्या जातीची असेल तर निषेध केला जातो. जातीची असेल किंवा जिथे बलात्कार झालाय तिथे स्वपक्षाचे सरकार नसेल तरच बलात्काराबाबत संताप व्यक्त केला जातो. सरकारवर तोफा डागल्या जातात. अन्यथा या कोडग्या लोकांची नपुंसक मने साधी प्रतिक्रीया सुध्दा देत नाहीत. बलात्कार करणारे नराधम जेवढे विकृत आणि हलकट असतात त्या पेक्षा हे भडवे जास्त वाईट आणि विकृत असतात. बलात्कार करणारे वासनेने अंध झालेले असतात पण हे जातीच्या व स्वपक्षिय सरकारच्या प्रेमात पडलेले अंध नसतात.

त्यांचा विवेक शाबूत असतो, जीवंत असतो. ते जेव्हा सोईने भूमिका घेतात तेव्हा संताप येतो. बाईवर बलात्कार झाला तर कुणाला काहीच वाटत नाही कारण या सगळ्या नालायकांच्या दृष्टीने बाई भोगवस्तू आहे. पण ज्या बाईवर बलात्कार होतो ती जर स्वपक्षीय आणि स्व जातीय असेल तर सगळे चवताळून उठतात. कारण तो बलात्कार बाईवर नव्हे तर त्यांच्या अहंकारावर होतो म्हणूनच वाईट वाटते. जोवर जातीचा, पक्षाचा काही संबंध येत नाही तेव्हा कुणी त्याची दखलही घेत नाही. तसे तर या देशात दर दिवसाला किमान १०० बलात्कार होतात. पण त्या बाबत कुणाचा चकार शब्द निघत नाही. या सगळ्या घाणीत अत्याचारित महिलेला व तिच्या कुटूंबाला काय वाटत असेल ? त्यांची मानसिकता काय असेल ? याचा विचारही केला जात नाही. बलात्कार झालेली अत्याचारिता माणूस आहे, तिलाही भावना आहेत. तिलाही मन आहे. याचा मानवतेच्या दृष्टीने, न्यायाच्या दृष्टीने कुणी विचार करत नाही. देशात कॉंग्रेस सरकार होते आणि दिल्लीत बलात्कार झाला तेव्हा भाजपवाले सरसकट बोंबलत होते.

आज केंद्रात भाजपा सरकार आहे, युपीत भाजपा सरकार आहे म्हणून इतरांना कंठ फुटला आहे. भाजपच्या राज्यात घडलय म्हणून हे जागे झालेत बाकी त्या अत्याचारितेशी किती जणांना देणेघेणे आहे ? हा प्रश्न पडतो. बलात्कार झालेल्या विविध घटनांचे हिशोब मांडले तर त्याचे राजकारण करणा-या आणि सोईने जात व पक्ष पाहून व्यक्त होणा-या या हरामखोरांचा तिरस्कार वाटल्याशिवाय रहात नाही.