सामाजिक कार्यकर्त्या, कवियत्री, लेखिका, उत्तम साहित्यिक शारदा गायकवाड माई यांचे कोरोनामुळे निधन

5

✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

नाशिक(दि.5ऑक्टोबर):- नाशिक मधील प्रथम दर्जाच्या ज्येष्ठ साहित्यिक, तसेच विशेषतः दिव्यांग मुलांसाठी आयुष्यभर सर्वार्थाने सामाजिक काम करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्या, शारदा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा, शारदा गायकवाड, अर्थात कित्येकांच्या माई, या आज आपल्या कित्येक दिव्यांग विशेषतः दृष्टिहीन मुलांना पोरकं करून, अनंताच्या प्रवासाला निघून गेल्या.

सामाजिक सेवेच्या भावनेतून दिव्यांग लोकांना अनेक लोक मदत करतात, पण आपलं संपूर्ण जीवनच त्यांच्यासाठी समर्पित करणारे फ़ार थोडे असतात. आणि त्या पैकीच एक म्हणजे ( माई. १०९५-९६ साली माई नाशिक अंधशाळेच्या संपर्कात आल्या, आणि तेव्हापासून ते आजतागायत त्यांनी दृष्टिहीन विद्यार्थ्यांना, केवळ वाचूनच दाखवण्याचे कामच केले नाही तर त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी माईंनी काम केले.

नाशिक अंध शाळेतील दृष्टिहीन मुलांच्या सांस्कृतिक जडणघडणीत माईंचा मोठा वाटा आहे, मुलांमधी,. वक्तृत्वकौशल्य, सामान्य ज्ञान, संस्कृत श्लोकांचे पाठांतर, गायन, इत्यादी कौशल्यांचा विकास त्या करत. माई या दृष्टिहीन मुलांच्या बौद्धिक विकासा बरोबरच त्यांच्या शारीरिक स्वास्थ्य कडेही लक्ष देत, जर एखादा दिव्यांग विद्यार्थी आजारी पडला, आणि त्यास इस्पितळात दाखल करण्याची वेळ आली तर, माइ अगदी रात्र रात्र त्याच्या उशाशी बसून त्याची सुश्रुषा करत. इतकच नाही तर वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना जर कधी आर्थिक अडचण आली, तर त्यासाठी देखील माई निस्वार्थ पणे पुढे येत. आपलं कुटुंब, नोकरी, इतर कौटुंबिक जबाबदाऱ्या, हे सगळं सांभाळून माई वरील सामाजिक काम अगदी निस्वार्थी भावनेने करायच्या. आणि त्यांच्या या सामाजिक कार्याची उत्तम फळे देखील आली.

त्यांच्या संस्कारात वाढलेले कित्येक दृष्टिहीन मुलं पुढे उत्तम शासकीय सेवेत उच्च पदांवर पोहोचले, त्यापैकी वानगीदाखल ह भ प – पुंडलिक महाराज पिंपळके. सरांच नाव सांगता येईल, माईंच्या संस्कारातून आणि शिकवणीतून सरांची जडण-घडण झाली, माइ सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी नाशिकच्या अंधशाळेत स्वाध्याय वर्ग घ्यायच्या, त्यातूनच पुंडलिक सरांना संस्कृत भाषेची आणि आध्यात्मिक ज्ञानाची गोडी लागली आणि आज सर उत्तम कीर्तनकार आहेत.

माई दृष्टिहीन विद्यार्थ्यांना विविध महापुरुषांच्या जीवनावर वक्तृत्व करायला प्रेरित करायच्या, त्यातून पुढे अनेक वक्ते निर्माण झाले त्यापैकीच पुंडलिक सर हे महाराष्ट्रातले सध्याचे सुप्रसिद्ध वक्ते.माईनने असंख्य दृष्टिहीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात त्यांच्यासाठी वाचकांची भूमिका बजावली. त्या भाग्यवंत मुलांमध्ये मीही एक होतो, त्या दिवसातलईच एक – आठवण. ते माझं दहावीचं वर्ष होतं, रात्रीचे ९:३० झाले होते मी आता झोपण्याच्या तयारीत होतो, तेवढ्यात मोबाईल वाजला मी जरा अनिच्छेने च फोन उचलला, पलीकडून फोनवर माई होत्या. माई : सुरज बाळा माई बोलते आहे, मी : बोला माई. माई : तुझे हिंदीचे 4 चाप्टर कम्प्लिट झालेत का? म्हणजे आपल्याला उद्या पाचवा चाप्टर चा अभ्यास करता येईल, मी उद्या ८.३० वा तुला वाचून दाखवायला येईल, बाळा अभ्यास कर खूप मोठा हो, तुझे इतर मोठे भाऊ जसे यशस्वी झाले तसं तुही यशस्वी हो. माईंच्या या फोन नि माझी झोप कुठे च्या कुठे गेली अभ्यासाला अधिक बळ मिळालं आणि खरंच सांगतो त्यांच्या आशीर्वादाने दहावीला उत्तम मार्क देखील मिळाले.

माई अगदी असच मार्गदर्शन प्रत्येक दृष्टिहीन विद्यार्थ्यांना करत, त्यामुळेच प्रत्येक जण त्यांना अगदी ममतेने, * माई अशी हाक मारत. मला चांगलं आठवतंय माझा मित्र योगेश ज्यावेळी दहावीला होता, त्यावेळी त्याचा दहावीचा अभ्यासक्रम बदललेला होता, त्यामुळे या बदललेल्या दहावीच्या अभ्यासक्रमाची ध्वनिमुद्रित पुस्तके त्याला लगेच उपलब्ध होणं शक्यच नव्हतं. अशा वेळी आपलं घर नोकरी सांभाळून आपला जास्तीत जास्त वेळ त्याला वाचून दाखवण्यासाठी माई राखून ठेवायच्या, जेव्हा ध्वनिमुद्रणआची साधने अतिशय अल्प होती आणि सर्वसामान्यांना ती परवडणारी नव्हती त्या काळात माई दृष्टिहीन मुलांना अगदी पुन्हा पुन्हा वाचून दाखवायच्या.

माईंनी त्यांच्या शारदा बहुउद्देशीय विकास या सामाजिक संस्थेच्या मार्फत देखील भरपूर सामाजिक सेवा केली आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, दिव्यांग साहित्यिकांचं नाशिकमध्ये साहित्य संमेलन, शिवाय या स्वतः साहित्यिक असल्यामुळे त्यांचे देखील अनेक काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. अगदी हिरोजी इंदुलकर यांच्याप्रमाणेच, अखंड सेवेचे ठाई तत्पर. माई शारदा गायकवाड असं म्हणता येईल.

अशा या अनेकांच्या माईंना अदृश्य शत्रूने अर्थात covid-19 च्या आजाराने गाठलं, मागील पंधरा दिवसांपासून माई या अदृश्य शत्रु सोबत नाशिकच्या एका खासगी इस्पितळात झुंज घेत होत्या, पण त्यात त्या अपयशी ठरल्या आणि आज रविवार दि ४.१०.२०२० रोजी त्यांना देवाज्ञा झाली.

माझ्यासारख्या कित्तेक दृष्टिहीन विद्यार्थ्यांच्या अंधकारमय जीवनात ज्ञानरूपी दीप प्रज्वलित करणाऱ्या माउलीने अखेरीस जगाचा निरोप घेतला, ही आमच्या जीवनात कधीच निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. अशा या ममत्वाने भरलेल्या ज्ञानज्योती ला अर्थात – शारदा गायकवाड ) माई. तुम्हाला शत शत नमन, आणि साश्रू नयनांनी भावपूर्ण आदरांजली..