हाथरस प्रकरणाचे पडसाद महाबळेश्वर येथे बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुपच्या वतीने तीव्र निदर्शने

24

✒️महाबळेश्वर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

महाबळेश्वर(दि.6ऑक्टोबर):-हाथरस येथील निंदनीय घटनेचे पडसाद शांत असलेल्या थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर येथे देखील उमटले आहेत.महाबळेश्वर येथे बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप या सामाजिक व धार्मिक राज्यव्यापी संघटनेच्या वतीने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासमोर तीव्र निषेध नोंदविण्यात आला.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला उपनगराध्यक्ष अफजल सुतार, माजी नगराध्यक्ष किसन शिंदे,जेष्ठ नगरसेवक संदीप साळुंखे, नगरसेवक संजय पिसाळ, माजी नगराध्यक्षा छायाताई शिंदे, संस्थापक अध्यक्ष किरण गोरखनाथ शिंदे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी दोन मिनिटे शांत उभे राहून हाथरस येथील पीडितेला व देशातील अन्य अत्याचारात मृत्युमुखी पडलेल्या महिलांना श्रद्धांजली वाहिली. मेणबत्ती पेटवून आपल्या सद्भावना व्यक्त केल्या.

उपनगराध्यक्ष अफजल सुतार यांनी निषेधपर मत व्यक्त केले यावेळी हाथरस घटनेचा महाबळेश्वरच्या सर्व नागरिकांचे वतीने तीव्र निषेध करीत असून दोषींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आग्रही मागणी त्यांनी केली.नगरसेवक संदीप साळुंखे, नगरसेवक संजय पिसाळ,सामाजिक कार्यकर्ते गोपाळ लालबेग, यांनी निषेधपर मते व्यक्त केली.बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे यांनी यावेळी योगी सरकारवर सडकून टीका केली असून महिलांवरील अत्याचार रोखण्यात योगी सरकार अपयशी ठरले असून उत्तर प्रदेश मध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी.

अनुसूचित जाती जमातीच्या सर्व नागरिकांना आत्मसंरक्षणासाठी शस्त्र परवाने देण्यात यावेत, हाथरस प्रकरणाची चौकशी सिबीआय कडे सोपवावी, हाथरस प्रकरणी कुचराई करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना कायम स्वरूपी सेवेतून बडतर्फ करावे, या प्रकरणात त्यांना सहआरोपी बनवून त्यांचेवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटले चालवावेत व दोषींना कठोरात कठोर शिक्षा करावी अशा मागण्या केल्या आहेत.या मागण्यांचे निवेदन आंदोलनकर्त्यांनी तहसील कार्यालय पर्यंत पायी चालत जाऊन तहसीलदार सुषमा पाटील यांना दिले आहे.

यावेळी आंदोलन कर्त्यांनी निषेधपर घोषणांनी डॉ. आंबेडकर चौक दणाणून सोडला.व हाथरस प्रकरणी कारवाईची मागणी केली. या निषेध कार्यक्रमास किरण गोरखनाथ शिंदे,उपनगराध्यक्ष अफजल सुतार,नगरसेवक किसन शिंदे,संदीप साळुंखे, संजय पिसाळ, शिवसेनेचे सचिन वागदरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष रोहित ढेबे, सामाजिक कार्यकर्ते तौफिक पटवेकर, संजय जेधे, गोपाळ लालबेग,तालुकाध्यक्ष सुमित कांबळे, शुभम खरे, अमोल काकडे, विजय गायकवाड, अनिल चव्हाण, सागर कांबळे, संगीता कांबळे, अरुणा काकडे,शीतल ईटे यांचेसह भीमसैनिक उपस्थित होते. आंदोलनाचे नेतृत्व किरण शिंदे यांनी केले. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य खबरदारी बाळगण्यात आली होती.