राष्ट्रीय नवोपक्रम पुरस्कार शिक्षक संजय जगताप यांना जाहीर

5

✒️मावळ(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मावळ(दि.7ऑक्टोबर):- तालुक्यातील टाकवे खुर्द जिल्हा परिषद आय.एस.ओ. शाळेचे मुख्याध्यापक संजय जगताप यांना नुकताच विद्यार्थी काव्यसंग्रह निर्मिती व प्रकाशन या उपक्रमास राष्ट्रीय शैक्षणिक नवोपक्रम पुरस्कार जाहीर झाला आहे.

उंच भरारी घेणाऱ्या पंखांना
आकाशाची तमा नसावी
नजरेत सदा नवी दृष्टी असावी
घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही
फक्त क्षितीजापर्यंत झेप घेण्याची जिद्द असावी.

विद्यार्थ्यांसाठी क्षितिजापलिकडे झेप घेण्याचे ध्येय उराशी असणारे शिक्षक मिळणे हे आपलं अहोभाग्यंच…!

शिक्षकाची नोकरी ही सेवा वृत्तीने करत संजय जगताप सरांनी भविष्यातील उत्तम नागरिक सर्वांगाने विद्यार्थ्यांमधून घडविण्याचा चंगच मनाशी बांधला आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रभावी अध्यापन करत असताना नवनवीन व अनोख्या उपक्रमांचे आयोजन शाळेत केले आहे. त्यापैकीच एक नवोपक्रम म्हणजे *विद्यार्थी काव्यसंग्रह निर्मिती व प्रकाशन* या उपक्रमांतर्गत सरांनी स्वतः कवी व साहित्यिक असल्यामुळे काव्यलेखनाबाबत मार्गदर्शन व आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करून त्यांच्यामधे काव्यलेखनाची जाणीव निर्माण केली आणि आणि विद्यार्थ्यांचे कवी संमेलन शाळा स्तरावर आयोजित केले यासाठी ते पिंपरी चिंचवड व पुणे येथे इथून मान्यवर कवींना शाळेमध्ये आमंत्रित केले . मावळवार्ता टिव्ही चॕनेलवर सदर कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या निवडक साठ कवितांचा अक्षरफुलं काव्यसंग्रह निर्माण करून त्याचे प्रकाशन जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्था व अर्पण ग्रुप यांच्या सौजन्याने शाळेत ग्रामस्थ व मान्यवरांसह केले तसेच या अक्षर फुलं काव्यसंग्रहाचे प्रकाशन पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच शिक्षणाधिकारी यांच्या हस्ते केले. जिल्हा परिषद सभागृहात मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित केलेल्या जिल्हास्तरावरील स्वलिखित काव्यवाचन स्पर्धेत टाकवे खुर्द शाळेच्या दोन विद्यार्थिनींनी नंबर पटकावले आहेत. तसेच पिंपरी चिंचवड व पुणे शहरातील अनेक सभागृहामधे विद्यार्थ्याना काव्यवाचनाची संधी उपलब्ध करून दिली आहे व मान्यवरांची दाद आणि जिल्हा व राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्रमाणपत्रे मिळवीली आहेत.

विद्यार्थी काव्यसंग्रह निर्मिती व प्रकाशन हा नवोपक्रम शीर्षक उद्दिष्ट प्रत्यक्ष कार्यवाही निष्कर्ष व फायदे अशा मुद्यांसह
योग्य सुत्रबध्दपणे तयारीसह राष्ट्रीय नवोपक्रम स्पर्धेसाठी त्यांनी पाठविला. यासाठी आवश्यक चित्रफित तसेच पीडीएफ आणि वर्डफाईल व इमेजस तयार करून पाठविली. देशभरातील अशा अनेक उपक्रमातून या नवोपक्रमाची निवड विजेते म्हणून झालेली आहे. या नवोपक्रमाचे सादरीकरणही जानेवारी महिन्यात राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार वितरण सोहळ्यात होणार आहे.

शिक्षककवी संजय जगताप यांची कविता व इतर विषयावरील पाच पुस्तके आणि अनेक शैक्षणिक व सामाजिक लेख प्रकाशित आहेत. त्यांच्या साहित्यिक अनुभवाचा वापर त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकास व सृजनशीलतेसाठी केला आहे.

शैक्षणिक अभ्यास दौरा सिंगापूर व आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषद इंडोनेशिया येथे त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे . कला व सांस्कृतिक मंत्रालय आयोजित राष्ट्रीय कार्यशाळा दिल्ली राजस्थान उदयपूर व जयपुर याठिकाणी त्यांची निवड झाली होती. तेथील शैक्षणिक अनुभवाचाही विद्यार्थ्यांची कौशल्ये विकसित करण्यासाठी केला आहे.

शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत तंत्रस्नेही शिक्षक म्हणून त्यांनी शिक्षण संजीवनी ब्लॉग व ॲप ची निर्मिती केली आहे . अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोदा पिंपरी-चिंचवड रत्नागिरी व यवतमाळ अशा अनेक साहित्य संमेलनामध्ये त्यांनी आपल्या कवितांचे वाचन व सुत्रसंचालन केले आहे. आकाशवाणी पुणे जनरल केंद्रावर तसेच सांगली आकाशवाणी आणि व व वसुंधरा वाहिनी यावर त्यांचे काव्यवाचनाचे कार्यक्रम झाले आहेत.

आजपर्यंत कार्यरत सर्व शाळांमधे विद्यार्थ्यांमधे रमून त्यांना अधिक प्रगल्भ व सृजनशील विद्यार्थी निर्माण करणे यात शिक्षक संजय जगताप यांचा हातखंडा आहे. त्यामुळे त्यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर अनेक स्पर्धांमधे विद्यार्थ्यांना प्रश्नमंजूषा, काव्यवाचन,काव्यलेखन, कला, गायन, वादन, नृत्य अशी अनेक व्यासपीठे उपलब्ध करून दिलेली आहेत.

जे जे आपणांसी ठावे ते इतरांशी सांगावे , शहाणे करून सोडावे सकळ जण या ओवीप्रमाणे आपल्यातील कलागुणांचा वापर त्यांनी शाळेसाठी व समाजासाठी केला आहे. त्यांच्या या कार्यकर्तृत्वाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत.

संजय जगताप यांना प्राप्त राष्ट्रीय पुरस्काराबद्दल संपुर्ण मावळ तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होऊन सर्वांनी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.