पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम

27

🔹युवक-युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.8ऑक्टोबर):-सुशिक्षित बेरोजगार युवक- युवतींकरिता स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम सन 2020-21 या वर्षाकरिता जिल्हा उद्योग केंद्र चंद्रपूर मार्फत ग्रामीण व शहरी भागात राबविण्यात येत आहे. तरी इच्छुक बेरोजगार युवक-युवतींनी सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्नील राठोड यांनी केले आहे.

अशी आहेत योजनेची वैशिष्ट्ये:-

या योजनेअंतर्गत उद्योगाकरिता प्रकल्प मर्यादा रुपये 25 लक्ष रुपये असून, सेवा उद्योगाकरिता प्रकल्पाची मर्यादा 10 लक्ष रुपये आहे. अर्जदाराची शैक्षणिक पात्रता कमीत कमी 8वा वर्ग उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे. या योजनेअंतर्गत कर्ज प्रकरण तयार करण्याकरिता उत्पन्नाची अट नाही. सदर योजना फक्त नवीन उद्योग, सेवा उद्योग सुरू करणार असलेल्या व्यक्तींनाच लागू आहे. तसेच स्वतःचे भाग भांडवल सर्वसाधारण अर्जदाराकरिता 10 टक्के व अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग, अल्पसंख्यांक, स्त्री लाभार्थी, माजी सैनिक व अपंग यांच्याकरिता 5 टक्के राहील, तसेच अनुदानाचे दर सर्वसाधारण अर्जदाराकरिता शहरी भागात 15 टक्के व ग्रामीण भागात 25 टक्के राहील. व अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग, अल्पसंख्यांक, स्त्री लाभार्थी, माजी सैनिक व अपंगांकरिता शहरी भागात 25 टक्के तर ग्रामीण भागात 35 टक्के अनुदान राहील.

या योजनेअंतर्गत www.kviconline.gov.in/pmegp portal या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने कर्ज प्रकरणे सादर करावे. कर्ज प्रकरण सादर करताना अर्जदाराने स्वतःचे आधार कार्ड, पासपोर्ट फोटो, जातीचा दाखला, प्रकल्प अहवाल, शाळा सोडल्याचा दाखला, ग्रामीण भागातील उद्योग घटक असेल तर ग्रामीण लोकसंख्यांचा दाखला घेणे आवश्यक आहे.