🔸विभागीय रेल्वे ग्राहक सल्लागार समितीचे सदस्य आशिष देरकर यांची मागणी

✒️संतोष मडावी(कोरपना,विशेष प्रतिनिधी)मो:-8698639446

कोरपना(दि.13ऑक्टोबर):-राज्य शासन आणि रेल्वे मंत्रालयाच्या संयुक्त भागीदारीतून स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत सुविधा महामंडळाच्या (महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड) माध्यमातून पहिल्या टप्प्यात ९ रेल्वेमार्ग पूर्ण करण्यात येणार होते. यामध्ये सिकंदराबाद विभागाच्या गडचांदूर-आदिलाबाद लोहमार्गाचा देखील समावेश आहे.

मात्र या रेल्वेमार्गाच्या बांधकामाला अजूनही गती प्राप्त झाली नसून गडचांदूर- आदिलाबाद लोहमार्गाचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे अशी मागणी सिकंदराबाद विभागीय ग्राहक सल्लागार समितीचे सदस्य आशिष देरकर यांनी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड (एमआरआयडीसी) यांचेकडे केली आहे.

      २८ जुन २०१५ रोजी राज्य सरकार व रेल्वे मंत्रालय यांच्यात सामंजस्य करार करून महाराष्ट्रातील रेल्वे मार्गाच्या विकासासाठी एमआरआयडीसी स्थापन करण्यात आली. एमआरआयडीसीने गडचांदूर-आदिलाबाद दरम्यान प्रस्तावित नवीन मार्गाला मान्यता दिल्याला जवळपास ५ वर्ष पूर्ण होत आली  आहे. असे असताना देखील त्यामध्ये कसल्याही प्रकारे पुढे चालना मिळाली नाही. गडचांदूर-आदिलाबाद रेल्वेमार्ग हा आंध्र प्रदेश राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यात आणि महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यात येतो. रेल्वे लाईनचा विचार केल्यास हा मार्ग सिकंदराबाद आणि नांदेड विभागात येतो.

एमआरआयडीसीने गडचांदूर-आदिलाबादला संभाव्य कॉरीडोर म्हणून ओळखले आहे. ज्यात मालाची मोठी वाहतूक असते. तरी सुद्धा कामाला सुरुवात न झाल्याने जनतेमध्ये रोष आहे.
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेडचे (एमआरआयडीसी) महाराष्ट्र राज्यातील रेल इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांना चालना देण्याचे उद्दीष्ट आहे. महाराष्ट्र राज्यातील गडचांदूर व आंध्रप्रदेश राज्यातील आदिलाबाद ही स्थानके जोडल्या गेल्यास येथील शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, किरकोळ विक्रेते अशा अनेक नागरिकांना अनेक व्यवहार करण्याची संधी मिळेल. गडचांदूर-आदिलाबाद नवीन रेल्वे मार्गाच्या बांधकामाची प्रलंबित मागणी आहेत. या कामाला त्वरित सुरुवात करणे गरजेचे आहे. या भागातील लोकांची कनेक्टिव्हिटी आणि क्षमता वाढीसाठी रेल्वेच्या या मार्गाला त्वरित पूर्णत्वास नेणे गरजेचे असल्याचे आशिष देरकर यांनी म्हटले आहे.

               राज्यशासन व रेल्वे मंत्रालयाची मंजुरी असताना कामाला उशीर व्हायला नको होता. गडचांदूर हे माणिकगड, अल्ट्राटेक, अंबुजा व मुरली अग्रो असे चार सिमेंट कंपन्या असलेले राज्यातील महत्वाचे शहर आहे. या परिसरात लोकसंख्या सुद्धा मोठी आहे. मात्र नागरिकांना रेल्वेसेवा उपलब्ध नसल्याने कमालीची नाराजी लोकांमध्ये आहे. याकडे त्वरित लक्ष देऊन कामाला सुरुवात करावी. अशी मागणी आशिष देरकर यांनी केली आहे.
निवेदनाच्या प्रती रेल्वे मंत्री पियुष गोयल, पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळूभाऊ धानोरकर, आमदार सुभाष धोटे यांना दिल्या आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED