सायकल स्नेही मंडळातर्फे विलासराव निंबोरकर यांचा सत्कार

27

🔸मानवी जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विवेकवादी असावा – बंडोपंत बोढेकर

✒️गडचिरोली(पुरोगामी संदेश नेटवर्क)

गडचिरोली(दि.13ऑक्टोबर):-समाजसेवी व्यक्तीमत्व विलासराव निंबोरकर यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने सेवाकार्याचा गौरव म्हणून सायकल स्नेही मंडळातर्फे परिश्रम भवनात सपत्निक सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते . प्रमुख अतिथी म्हणून सायकल स्नेही मंडळाचे कार्याध्यक्ष तथा सर्पमित्र प्रा. विलासराव पारखी , लोकमित्र विठ्ठल कोठारे , सौ. महानंदा निंबोरकर , मातोश्री श्रीमती शांताबाई निंबोरकर , धम्म अभ्यासक कवी भोजराज कान्हेकर उपस्थित होते . प्रास्तविक प्रा. पारखी यांनी करून त्यांच्या कार्य संबंधाने विचार व्यक्त केले. सत्कारमूर्ती विलासराव निंबोरकर यांनी सायकल स्नेही मंडळाना धन्यवाद देऊन सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य सामाजिक आणि प्रबोधन सेवा कार्यात व्यतीत करणार असल्याचे मत व्यक्त केले.

पारलौकिक प्रश्नांपेक्षा वास्तव लक्षात घेऊन मानवी जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विवेकवादी असणे गरजेचे आहे. जनप्रबोधनाच्या माध्यमातून विवेकवादी समाजनिर्मितीसाठी सातत्याने झटणारे व्यक्तीमत्व म्हणून निंबोरकर गुरूजीची अलिकडे वेगळी ओळख निर्माण झाल्याचे प्रतिपादन यावेळी बंडोपंत बोढेकर यांनी केले.

याप्रसंगी चाळीसगाव ( जळगाव ) येथील ग्लोबल बंजारा अस्तित्व फाऊंडेशन ह्या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार ग्रामगीताचार्य बोढेकर यांच्या हस्ते विलासराव निंबोरकर यांना प्रदान करण्यात आला.

ह्या छोटेखानी कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन तथा आभार सायकलमित्र अरविंद खारकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कु. पूजा निंबोरकर, आदित्य कोहळे , सौ. प्रिती (निंबोरकर )कोहळे , आराध्य कोहळे , प्रियंका निंबोरकर यांनी सहयोग दिला. शासनाच्या निर्देशाचे पालन करून छोटया स्वरूपात मोजक्या पदाधिका-यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला.